ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

दिल्ली निवडणुकांमधील स्थानिक आणि सार्वत्रिक

नैतिकदृष्ट्या सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी राजकारणातील संदिग्धता आवश्यक असली, तरी ती पुरेशी पूर्वअट नव्हे.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

अलीकडे झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला (आप) विजय मिळाला. या संदर्भात विविध भाष्यकारांनी भिन्न प्रकारची मांडणी केल्याचं दिसतं; मुख्यत्वे टीकेच्या भूमिकेतून या विजयाच मूल्यमापन केलं गेल्याचं दिसतं. उदाहरणार्थ, स्वतःला ‘जहाल इहवादी’ म्हणवणाऱ्यांनी या निकालाबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत; हा विजय ‘राजकीय अस्वस्थता’ वाढवणारा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इहवादाशी निगडित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरील ‘आप’ची भूमिका या आक्षेपांना कारणीभूत ठरली आहे. शाहीन बागेतील निदर्शनांच्या बाजूने निःसंदिग्ध भूमिका घेणं ‘आप’ला जमलेलं नाही, याकडे हे टीकाकार लक्ष वेधतात. राजकीय पक्षांनी अधिक सुस्पष्ट व निःसंदिग्ध राजकारण करणं गरजेचं आहे, असं यातील काही भाष्यकार सुचवतात.

या दृष्टिकोनाचं उपप्रमेय म्हणून, काही टीकाकारांनी ‘आप’च्या निवडणुकीय व्यूहरचनेवर टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारामधून धार्मिक मुद्दा बाजूला ठेवणं किंवा इहवादाच्या मुद्द्यावर कमी स्पष्टपणे बोलणं, याबाबत टीकाकारांनी भीती व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रभाव कमी करण्यासाठी त्यांचीच भाषा वापरण्याचा ‘आप’चा प्रयत्न जोखमीचा आहे, अशी भीती आणि साशंकता जहाल इहवाद्यांनी व्यक्त केली आहे. ‘आप’च्या विरोधकांनी वापरलेल्या अशा भाषेमधील राजकीय अर्थपूर्णतेला छेद देण्याची योजना ‘आप’च्या नेत्यांनी आखली होती. पण अखेरीस ‘आप’च अशा भाषेवर प्रभुत्व प्रस्थापित करण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा पक्ष स्वतःच्याच व्यूहरचनेला बळी पडण्याची शक्यता निर्माण होते. ‘आप’ सौम्य हिंदुत्वाकडे वळला आहे, असं या घडामोडींचं अर्थनिर्णयन काही इहवाद्यांनी केलं आहे. निवडणूक प्रचारामध्ये हिंदू प्रतीकं वापरण्याची ‘आप’ची व्यूहरचना पक्षनेत्यांच्या मनातील चिंतेच्या संदर्भात समजून घ्यायला हवी. मतदारांचं जमातवादी पातळीवर धृवीकरण करू पाहणाऱ्या प्रचाराला भारतीय मतदारवर्गातील एक घटक अजूनही बळी पडतो, असा, बहुधा रास्त, विचार ‘आप’ने केला. या चिंतेला दिल्ली विधानसभेच्या ताज्या निवडणुकांनी पाठबळ पुरवलं; या निवडणुकीत ‘भाजप’च्या मतांच्या टक्केवारीत थोडी वाढ झाली. पण ‘आप’ला अधिक मतदारांनी पाठिंबा दिला, परिणामी ‘आप’च्या अधिक जागा मिळाल्या. परंतु, ‘आप’च्या विजयाद्वारे झालेल्या इतर परिणामांचीही दखल घ्यायला हवी. ‘आप’च्या नेत्यांना दहशतवादी संबोधणं किंवा ‘गोली मारो’सारख्या स्फोटक घोषणा देणं, अशी अत्यंत चिथावणीखोर भाषा वापरून पक्षाने चूक केली, हे कबूल करणं ‘भाजप’च्या प्रमुख नेत्यांना कधी नव्हे ते भाग पडलं. दुसऱ्या बाजूला, ‘आप’चा संयमी प्रचार निवडणुकीत लाभदायक ठरला. ‘आप’ने आखलेली प्रचाराची व्यूहरचना आणि त्यांना मिळालेलं यश, यांमुळे भाजपला हे न्य करावं लागलं की, स्फोटक भाषा उलटा परिणाम करू शकते. याचा अर्थ, इथून पुढे ‘भाजप’ काळजीपूर्वक वागेल, असा आहे का? सध्या तरी, या प्रश्नाचं उत्तर फक्त ‘भाजप’च देऊ शकतो. निवडणुकीय राजकारणात हा पक्ष भविष्यामध्ये कोणती पद्धत अवलंबतो, यावरून हे स्पष्ट होईल.

‘आप’च्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं, तरी त्यांनी संदिग्धतेची पद्धत वापरली, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत पाठिंबा मिळवता येईल. हा अर्थातच व्यूहरचनात्मक वापर होता, पण ‘आप’चे नेते इतर धर्मांपेक्षा एका विशिष्ट धर्माला प्राधान्य देऊन त्याची प्रतीकं सहजतेने वापरत होते, हा मुद्दा नाकारता येणार नाही. ‘आप’च्या प्रचारासंदर्भातील व्यूहरचनेचा पाया विचारान्ती व्यावहारिकतावादी ठेवला गेल्याचं दिसतं. 'आप'च्या नेत्यांनी ‘भाजप’शी विधानबाजीची स्पर्धा करणं बहुतांशाने टाळलं, परिणामी हिंदुत्ववादी चिथावणी अपरिणामकारक ठरली.

टीकेच्या संदर्भात बोलायचं तर, काही टीकाकारांनी ‘आप’चं निवडणुकीतील राजकारण स्थानिक प्रश्नांच्या संदर्भातच बघितलं, तर हा पक्ष अखिल भारतीय होणं अशक्य असल्याचं प्रतिपादन केलं. हा विजय मुख्यत्वे स्थानिक संदर्भात महत्त्वाचा आहे आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटणार नाही, अशी या टीकाकारांची धारणा आहे. ‘आप’सह कोणत्याही पक्षाचा प्रभाव मर्यादित ठरवणारी भूमिका एक महत्त्वाचा मुद्दा नाकारत असते, पण आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. सत्तरपैकी ६२ जागांवर विजय मिळवून ‘आप’ने ‘भाजप’ला बाजूला हटवलं आहे, एवढंच नव्हे तर ‘भाजप’चा राजकीय आत्मविश्वासही कमी केला आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दिल्ली निवडणुकांमध्ये ‘आप’चा विजय झाल्यामुळे, जमातीय धृवीकरणाद्वारे भारताचं हिंदूकरण करण्याचा भाजपचा राष्ट्रीय प्रकल्प आणि त्याचा भाग असलेला प्रचार अंशतः निष्प्रभ ठरला.

स्थानिकतेच्या बळावर संकुचित भारताच्या सार्वत्रिक प्रकल्पाला सौम्य करण्यात आलं, ही यातील बाब सर्वाधिक अर्थपूर्ण ठरावी. स्थानिक रुजवण असलेलं सत्यच भाजपसारख्या उजव्या पक्षाच्या खोट्या प्रचारतंत्राला सहजपणे हरवू शकतं, हेही ‘आप’च्या विजयाने दाखवून दिलं. त्यामुळे ‘आप’ला केवळ स्थानिक वा प्रांतीय पातळीपुरतं मर्यादित मानणं वरवरचं ठरेल.

परंतु, विचारसरणीला तात्पुरतं सुट्टीवर पाठवलेल्या ‘आप’ने संदिग्धतेची चौकट जास्त वापरू नये, अशीही अपेक्षा आहे. सर्वसामान्य सत्याशी ‘आप’ने जवळीक राखावी; विकासाद्वारे उपजीविकेची ग्वाही देणारं आणि त्याचसोबत शांततेची जोपासना करणारं जगणं लोकांना पुरवणं हे सत्य असावं. हे मुद्दे केवळ दिल्लीच्या लोकांपुरते मर्यादित नाहीत. किंबहुना, इहवाद व सार्वत्रिकतावाद या प्रश्नांशी निगडित हे मुद्दे आहेत. तर, या स्थानिक निवडणुकीय अवकाशाने सार्वत्रिक तत्त्वांना जागा करून दिली आणि जमातवादी विचारसरणीला हुसकावून लावलं आहे.

Back to Top