वुई, द पीपल
.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
भारतामध्ये ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयका’विरोधात सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमधून ‘वुई, द पीपल’ या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील प्रारंभिक शब्दांचे किमान दोन अर्थ समोर येतात. प्रस्तावनेच्या आरंभीचे हे शब्द काही प्रमाणात अमूर्त स्वरूपाचे आहेत, कारण त्यात कोणा एका व्यक्तीला वा सामाजिक गटांना संबोधित केलेलं नाही. प्रत्येक सामाजिक गटातील प्रवक्त्याच्या मध्यस्थीने तयार झालेल्या राज्यघटनेला लोकांचा पाठिंबा गृहित धरून २६ जानेवारी १९५० रोजी या उक्तीचा उच्चार झाला, पण ते एक कल्पित प्रमेय होतं.
‘वुई, द पीपल’ या शब्दप्रयोगातून चुकीचा अर्थ निघत नसला, तरी अमूर्त अर्थ निघतो. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेवर शिक्कामोर्तब झालं, त्याच्या पूर्वसंध्येला भारतामध्ये असलेल्या सर्वांना उद्देशून यातील ‘वुई’/‘आम्ही’ हे संबोधन वापरलं आहे. ‘आम्ही’ म्हणजे वरच्या शब्दप्रयोगामध्ये सामावलेले आणि सर्वसाधारण ओळख सामायिक असलेले लोक- मग त्यांचा धर्म, प्रदेश, जात व लिंगभाव यांबाबतीतला कल काहीही असला, तरी ते भारतातीलच आहेत. परंतु, घटनानिर्मितीच्या व्यापक प्रक्रियेमध्ये भिन्न आवाजांच्या अनेक अभिव्यक्ती समाविष्ट झालेल्या आहेत, हे ऐतिहासिक सत्य आहे. पण या वेगवेगळ्या आवाजांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना प्रस्तावनेत रुजलेल्या मूळ अर्थाबाबत एकमत साधावं लागलं. मूळ अर्थ राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांनाही लागू होतो. सार्वभौम, समाजवादी, इहवादी व लोकशाही असण्याचं महत्त्व लोकांनी स्वीकारावं, अशी सैद्धान्तिक तरतूद यातून करण्यात आली. या पार्श्वभूमीर, ‘आम्ही’ म्हणजे या तत्त्वांचं समर्थन करणारा समूह. अशा प्रकारे एकमताने ‘आम्ही, लोक’ / ‘वुई, द पीपल’ ही संकल्पना किंवा शब्दप्रयोग साकारला.
घटनाकर्त्यांनी १९५०मध्ये हा शब्दप्रयोग स्वीकारून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत त्याला जागा दिली, पण ‘वुई, द पीपल’चा अचूक अर्थ मात्र त्यांनी ठोसपणे स्पष्ट केलेला नाही. ‘नागरिक’ या अधिक ठोस ओळखीची अधिक सार्वत्रिक ओळख लावून त्यातून बहुधा हा अर्थ लावण्याची गरज होती. प्रस्तावनेतील ‘नागरिक’ शब्द बराचसा तांत्रिक आहे आणि राज्यघटनेत त्याला अचूक स्थान आहे, हे वेगळं नमूद करायला नको. विशिष्ट घटनात्मक तरतुदींच्या मर्यादेत नागरिकांना असलेल्या अधिकारांसंदर्भात नागरिक असण्याची व्याख्या केलेली आहे. तर, ‘वुई, द पीपल’सारख्या अधिक व्यापक व अमूर्त अभिव्यक्तीचा परिणाम नागरिकत्वामध्ये दिसतो. त्यामुळे राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘वुई, द पीपल’ या शब्दप्रयोगानंतरच सिटिझन / नागरिक हा शब्द येतो. समतापूर्ण आणि पर्यायाने राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांचा स्वीकार करण्याबाबतचं सर्वसाधारण एकमत या शब्दप्रयोगातून प्रतिबिंबित होतं. तर, ‘वुई, द पीपल’ यामध्ये राज्यघटनेचा मूळ अर्थ स्वीकारण्याचा भाव आहे. या संदर्भात हे लक्षात घ्यायल हवं की, असा अर्थ घटनाकर्त्यांच्या हेतूमधून आलेला नाही, तर लोकांच्या जीवनानुभवाबाबत त्यांच्या प्रामाणिक जागरूकतेमधून हा अर्थ आलेला नाही. एका अर्थी हा जीवनानुभव शोकात्म होता, कारण त्यात दलितांचं शोषण, स्त्रियांचं अंकितत्त्व आणि आदिवासींची भयंकर वगळणूक होती. दुसऱ्या पातळीवर हा जीवनानुभव ऊर्जा पुरवणारा होता, कारण सांस्कृतिक अवकाशातील मानवी वैविध्य त्यातून समोर येत होते. राज्यघटनेने वंचितांना समतेचं आश्वासन दिलं आणि विशेषाधिकारी गटांना सामाजिक अव्यवस्थेपासूनच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं.
‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विरोधातील निदर्शनांमध्ये ‘वुई, द पीपल’ या शब्दप्रयोगाचे प्रतिध्वनी पुन्हा एकदा उमटत आहेत. राज्यघटनेच्या मूळ अर्थातील मूलभूत तत्त्वांचं समर्थन करण्यापुरती ही निदर्शनं मर्यादित राहिलेली नाहीत, तर मूळ अर्थ बजावून सांगणारी ही निदर्शनं आहेत. ‘वुई, द पीपल’ या मूळ अभिव्यक्तीची पुनर्स्थापना या निदर्शनांमधून होते आहे. राज्यघटनेचा मूळ अर्थ वा प्राथमिक तत्त्वं यांचा बचाव करण्यासाठी प्रजासत्ताक अधिसत्ता मांडण्याचं काम या निदर्शनांमधून होतं आहे. घटनाकर्त्यांसोबतच राज्यघटनेचा प्रतीकात्मक उत्सव साजरा केल्याने राज्यघटनेच्या मूळ आदर्शलक्ष्यी अर्थाबद्दलची बांधीलकी अधिक घट्ट झाली आहे. ‘वुई, द पीपल’ हा शब्दप्रयोग सार्वजनिक अवकाशात पुन्हा उदयाला येतो आहे. ‘वुई’ / ‘आम्ही’ हा शब्द, सध्याच्या संदर्भात, राज्यघटनेच्या पाठीशी उभं ठाकण्याचा नैतिक निर्धार व्यक्त करणारा ठरला आहे. ‘महा सार्वभौम’ सत्ताधीशांपुढे शरणागती न पत्कारण्याचा हा निर्धार दिसतो आहे.