निदर्शनांचं सत्य
.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
‘नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियमा’विरोधात भारतात विविध ठिकाणी निदर्शनं होत आहेत. या निमित्ताने सार्वजनिक निदर्शनांविषयीचं आकलन विस्तारणाऱ्या नवीन अर्थाची भर पडली आहे. हे पहिल्यांदाच घडत नसलं, तरी दीर्घ कालावधीनंतर अशी अर्थवृद्धी झाल्याचं दिसतं आहे. दोन विभिन्न प्रकारचा अर्थविस्तार या निदर्शनांमुळे आपल्याला पाहायला मिळतो. एक, शांतता व सामाजिक सौहार्द अशा दुहेरी मूल्यांवर आधारित राष्ट्राची गांधीवादी संकल्पना सार्वजनिक पातळीवर मध्यवर्ती स्थानी आणण्यावर या निदर्शनांनी आदर्शलक्ष्यी भर दिला आहे. दोन, इतर अनेक बाबींसोबतच घटनानिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भीमराव रामजी आंबेडकरांचीही स्मृती जागवण्याचं काम ही निदर्शनं करत आहेत. घटनात्मक लोकशाहीच्या त्यांच्या संकल्पनेसोबतच ‘लोकशाहीनिष्ठ राष्ट्रवादा’चाही समावेश यामध्ये होतो.
घटनात्मक लोकशाहीमध्ये व्यक्तींच्या व अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं रक्षण करणं सत्ताधारी सरकारला कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक ठरतं. आंबेडकरांच्या कृतीतून मांडली गेलेली लोकशाहीनिष्ठ राष्ट्रवादाची संकल्पना अनन्य आहे. मानवांना समान आदर देणारं लोकशाही मूल्य या संकल्पनेद्वारे राष्ट्रवादामध्ये समाविष्ट होतं. मोहनदास करमचंद गांधी आणि आंबेडकर या दोघांच्याही वैश्विक सत्यांमध्ये शांततेवर आधारित आणि स्वातंत्र्यासारख्या लोकशाही मूल्यांमधून स्वतःचा गाभा घडवणाऱ्या राष्ट्राची आदर्शलक्ष्यी संकल्पना अभिप्रेत आहे. या दोन्ही विचारवंतांच्या मांडणीत वैश्विक सत्याचा समावेश आहे, त्यामुळे त्यांचं वैश्विकीकरण शक्य आहे, असं विवाद्यरित्या म्हणता येईल.
या दोन विचारवंतांच्या तत्त्वांचं अनुसरण करण्याचं आवाहन सध्याच्या निदर्शनांमधून होतं आहे. या दोघांच्या स्मृती जागवणाऱ्या निदर्शकांची बांधिली केवळ बोलण्यापुरती असल्याचं दिसत नाही, तर निःसंदिग्धपणे त्यांनी स्वतःच्या निष्ठा स्पष्ट केल्या आहेत. गांधी व आंबेडकर यांच्याविषयीची बांधालकी निदर्शकांनी बऱ्यापैकी सातत्याने दाखवून दिली आहे. राज्यघटना व लोकशाही यांसारख्या वैश्विक मूल्यांवर आदर्शलक्ष्यी भर देत असताना जात व लिंगभावाच्या प्रश्नांचाही त्यात समावेश करण्याचं नैतिक सामर्थ्य आंबेडकरांनी दाखवलं होतं, त्या संदर्भात निदर्शकांची बांधिलकी निःसंदिग्ध असल्याचं दिसतं. गांधी व आंबेडकर यांनी पाठबळ पुरवलेल्या घटनात्मक तत्त्वांमध्ये व लोकशाही आदर्शनांमध्ये उपस्थित असणारं वैश्विक सत्य मांडणाऱ्या या निदर्शनांमध्ये स्त्रियांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, जात व लिंगभावविषयक अत्याचारांशी निगडित अन्यायाचं वस्तुस्थितीदर्शक सत्य सामावून घेण्याचे प्रयत्न ही मुळात एक राजकीय कृती असते. निदर्शनांचा व्यापक संघटनात्मक अवकाशत वस्तुस्थितीदर्शक सत्यानेच काबीज करण्यापासून रोखणं, हा यामागचा उद्देश असतो.
या निदर्शनांनी निदर्शकांना एक प्रतीकात्मक अवकाश मिळवून दिला आहे. घटनात्मक नैतिकतेच्या वैश्विक सत्यासोबत लोकशाही प्रस्थापनेचे सच्चे प्रयत्न करण्यासाठी त्यांना हा अवकाश आधाराला येतो आहे. गांधी व आंबेडकर यांनी दिलेल्या नैतिक आधाराद्वारे सामूहिकरित्या वैश्विक सत्य साधण्यासाठीचा प्रयत्न या निदर्शनांमधून होतो आहे. सत्यावर मालकी सांगण्यापेक्षा वैश्विक सत्याचा शोध घेण्याची नैतिक निकड या निदर्शनांना प्रेरणा देत असल्याचं दिसतं. सत्यावर मालकी सांगितली तर, जात व लिंगभावाचा विशिष्ट प्रश्न नागरिकत्वाच्या वैश्विक प्रश्नापेक्षा वरचढ मानल्यासारखं होईल. लोकशाहीच्या वैश्विक प्रश्नांवर विशिष्ट प्रश्नांचं दडपण येणार नाही, अशा रितीने सामाजिक गटांना प्रेरणा मिळत असेल, तर ते सत्य वैश्विक ठरतं. अशा वैश्विक सत्याचा शोध सामूहिकरित्या घेता येतो आणि चेहऱ्यावर मुखवटा न चढवता त्याचं प्रतिपादन करता येतं. सत्यामध्ये आंतरिक शक्ती असते, त्यामुळे कोणत्याही फसव्या मुखवट्याआड लपण्याची गरज त्याला नसते.
उलट, निर्लज्ज असत्याला मुखवट्यामागे लपण्याची गरज पडते. आंतरिक शक्ती असलेल्या सत्याच्या वैश्विक संकल्पनेला राजकीय चेतना लाभते. विशेषतः गांधी व आंबेडकर यांच्याशी दिशादर्शक बांधिलकी मानल्यावर ही चेतना लाभणं क्रमप्राप्त असतं. अशा प्रकारच्या सामूहिक बांधिलकीमुळे आणि प्रतिपादनामुळे निदर्शनांच्या विरोधकांना राष्ट्रवाद व स्वातंत्र्य या संकल्पनांचा संकुचित व सांप्रदायिक अर्थ सर्वसामान्य लोकांच्या मनावर लादण्यासाठी रणनीती आखावी लागते. कोणत्याही वैध लोकशाही मतभिन्नतेला राष्ट्रविरोधी असल्याप्रमाणे वागवण्याचं काम हे निदर्शन-विरोधक करत आहेत. यातून आपोआपच लोकशाही विरुद्ध राष्ट्रवाद असं द्वंद्व उभं राहातं. गांधी-आंबेडकर यांच्या परिप्रेक्ष्यातून राष्ट्रवादाचा विचार केला असता, त्यात अनेक सकारात्मक अर्थ आढळतात, उदाहरणार्थ- समाजवादी राष्ट्रवाद, बहुजन राष्ट्रवाद, किंवा लोकशाहीनिष्ठ राष्ट्रवाद. त्याचप्रमाणे सध्याच्या निदर्शनांचे विरोधक नागरिकत्वाचा घटनात्मक अधिकार संकुचितरित्या विशिष्ट धर्माच्या संदर्भातच मांडू पाहत आहेत. नागरिकत्व विशिष्ट धर्माशी जोडण्याचं राजकारण राज्यटनेतील नागरिकत्वाच्या अधिकाराचा वैश्विक पाया नाकारू पाहतं. ‘टुकडे-टुकडे गँग’सारख्या खोट्या व बनावट ‘घोषणा’ सार्वजनिक अवकाशात पेरून निदर्शनांचे विरोधक काही लोकांच्या मनात राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना रुजवू पाहत आहेत. अशा प्रयत्नांमुळे लोकशाहीनिष्ठ नागरिकत्व आणि राष्ट्रवाद हे घटनादत्त मूलभूत तत्त्वांवर आधारित वैश्विक सत्य धूसर होत जातं.