ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

एकार्थक राजकीय प्रतीकवाद

.

आजमितीला  भारतातील राजकीय नेतृत्व हे  नागरिकांमध्ये ऐक्य आणि एकजूटता यांसारख्या जटिल  तत्त्वांचा  पुरस्कार  व्हावा  या कारणासाठीच   दीप प्रज्वलित करणे,  थाळ्या आणि टाळ्या  वाजवणे यांसारख्या प्रतीकांचा वापर करत आहे असा युक्तिवाद करता येतो. जेव्हा प्रतीकांचा वापर हा  लोकसंघटन या हेतूसाठी होतो, तेव्हा त्या प्रतीकांना राजकीय स्वरूप येते. म्हणूनच राजकीय स्वातंत्र्य हे ध्येय प्राप्त करण्यासाठी  लोकांमध्ये ऊर्जा यावी या कारणास्तव गांधीजींनी खादी  आणि मीठ या प्रतीकांचा  उपयोग केला तर  आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी बुद्ध धर्मातील दिवे लावण्याची संस्कृती या प्रतीकांचा उपयोग  केला. या दोन विचारवंतांनी जरी वेगवेगळ्या प्रतीकांचा वापर केलेला असला तरी त्यामध्ये 'स्वातंत्र्य' हा  एक  समान धागा होता. म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास तर जटिल संकल्पनांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे  एक यशस्वी साधन म्हणून प्रतीकांना बहुविध अर्थ प्राप्त झाले आहेत. 

बहुविधअर्थी  प्रतीकवादाच्या (multivocal symbolism)  उलट एकार्थक प्रतीकवादाचे (univocal symbolism) कमीतकमी दोन आयाम असतात. एक म्हणजे  या प्रकारच्या प्रतीकवादामध्ये  नेतृत्व आणि राज्य हे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने प्रतीकांचा वापर करून घेऊ शकते. उदाहरणार्थ कोविड १९ च्या संदर्भामध्ये कोणती प्रतीके वापरायची (दीप प्रज्वलित करणे , थाळ्या वाजवणे इ.) आणि त्याची वेळ काय असेल (रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी). दुसरे असे की, एकार्थक प्रतीकवादामध्ये एकच भावार्थ असतो आणि प्रत्येक नागरिकाने तोच अर्थ स्वीकारायचा असतो. उदाहरणार्थ पंतप्रधानांनी दिलेल्या  टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याच्या  कार्यक्रमाचा अर्थ  हा कोरोना संकटाशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोन हात करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांविषयी  एकजूटता  दाखवणे असा  होता. 

पंतप्रधानांनी  दिलेला दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम हा देखील कोरोना  महामारीरूपी अंधाराला घालवणे याच प्रतीकरूपी  अर्थाने अभिप्रेत  होता. किंबहुना  प्रत्यक्षरीत्या अंधार घालवणे या अर्थाने देखील होता असेच म्हणावे लागेल. तसे पाहायला गेले तर  कोरोना संकटाशी प्रत्यक्ष दोन हात करणाऱ्यांसोबत एकजूटता  दाखवण्यासाठी  दीप प्रज्वलन करणे अथवा थाळ्या वाजवणे यां प्रतीकांचा वापर हा योग्यच  मानावा लागेल. अशारितीने  ऐक्यभावना  दाखवण्यासाठी  दीप प्रज्वलनाचा  वापर करणे यामधून   कमीत कमी दोन अर्थ निघू शकतात. एक म्हणजे, जी व्यक्ती दीप प्रज्वलित करते आहे तिच्यासाठी अंधार हा एक बाह्य  शत्रू आहे. आणि दुसरी म्हणजे, या ठिकाणी 'अंधार' हे दुसरे-तिसरे काही नसून कोरोना विषाणूचे संकटच आहे, असेच म्हणावे लागेल.

तथापि, या  अंधाराकडे एका वेगळ्या अर्थाने देखील पाहिले जाऊ शकते. बौद्ध धर्मामध्ये  दिव्यांचा वापर हा  एका  मौलिक  प्रतीकवादाच्या  माध्यमातून  केला जातो. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये एक प्रसिद्ध तत्त्व आहे, ते म्हणजे ‘अत्त दीपो भव !’ अर्थात  ‘स्वतःच स्वतःचे दीप बना’, आधी स्वतःमधील अंधकाराचा नाश करा. आणि स्वतःमधील अंधकार म्हणजे कोणता अंधकार? हा  आंतरिक अंधकार म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून स्वतःमधील अज्ञान, दंभ, द्वेष, मत्सर तसेच स्वतःमधील अंधकाराला ओळखण्याची असमर्थता हाच होय. त्यासोबतच अंधश्रद्धेने दुसऱ्यांचे अनुकरण करणे म्हणजे देखीलएक अंधकारच आहे. म्हणजेच  काय तर करोनारूपी अंधकाराला घालवण्यासाठी लोकांनी दीप प्रज्वलन  केले खरे, मात्र यासोबतच स्वतःच्या मनाला आणि त्यानंतर सरकारला  काही मूलभूत प्रश्न  विचारले काय?  ते मूलभूत प्रश्न असे की, कोरोना विषाणूचा / संकटाचा प्रत्यक्ष सामना करण्यासाठी सरकारने आवश्यक चाचणी प्रयोगशाळा किंवा संरक्षक पोशाख जनतेसाठी आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत काय? असे प्रश्न  सरकारला  विचारण्याचा  विचाररूपी  प्रकाश  दीप प्रज्वलन कार्यक्रमाने लोकांच्या डोक्यामध्ये  पडला काय ?  या महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या काटेकोर नियोजनाच्या अभावाविषयी  लोक सरकारला  साधा जाबदेखील विचारताना  दिसत नाहीत. म्हणजेच  या  एकार्थक प्रतीकवादाने  सरकारला साधा जाब विचारण्याची देखील शक्ती जनतेला दिली नाही, जेणेकरून या कोविड १९ चे अरिष्ट दूर होईल आणि सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरळीत  होऊन जाईल. अर्थात कोविड १९ चे  संकट घालवण्यासाठी पुरेशा पूर्वतयारीची आणि सक्रिय कल्पनाशक्तीचीच आवश्यकता अधिक आहे, हे तितकेच खरे आहे. 

लोकांनी थाळ्या वाजविणे  किंवा दीप प्रज्वलन करणे यांसारख्या कार्यक्रमांमागे लोकांचे कोणतेही भव्य-दिव्य राजकीय उद्दिष्ट नसते. केवळ पंतप्रधानांनी केलेल्या भावनिक आवाहनाला  प्रतिसाद देणे, हे उद्दिष्ट असते. अशा प्रतीकात्मक स्वरूपाच्या पाठिंब्यामुळे  प्रत्यक्षपणे कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे नैतिक मनोबल खरोखर उंचावू देखील शकते, हे मान्य करावे लागेल.  तसेच आणखी एक बाब ही आपण अवश्य लक्षात घेणे गरजेचे आहे, ती  अशी की, अशा कार्यक्रमामुळे शहरातील सुरक्षित ठिकाणी  राहणारे लोक असोत किंवा टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे  लोक असोत तसेच झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असोत, या सगळ्यांनाच प्रतीकात्मक रूपाने का असेना पण या  कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, अन्नधान्य पुरवणारे  अशा सगळ्यांच्याच पाठीशी उभे राहण्याची संधी मिळाली. पण त्याचवेळेस कित्येक मजूर, कामगार, बेघर लोक यांना मात्र  पंतप्रधानांनी उपलब्ध करून दिलेल्या या  प्रतीकात्मक  साधनांचा वापर करायच्या  संधीचा लाभ घेता आला नाही. असहाय त्रासामधून वेळ काढून त्यांनी या प्रतीकात्मक संधीचा वापर करावा, अशी त्यांच्याकडून अपेक्षा करणे देखील  अनुचित आहे. ज्यांना या  प्रतीकात्मकतेचा  वापर करायची संधी मिळाली त्यांनी ती संधी   केवळ घेतलीच नाही तर  त्याच्या  पुढे जाऊन  फटाके वाजवून आणि घोषणाबाजी  करून त्याला थोडा जास्तच अर्थ प्राप्त करून दिला. तर  अशा या  एकार्थक प्रतीकवादी  कृतीच्या समर्थकांनी  एक  गोष्ट लक्षात ठेवायाला हवी की, अशा कार्यक्रमांना लोक कसे प्रतिसाद देतील,  कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतील  आणि त्यांच्यावर काय परिणाम होईल, यावर नियंत्रण ठेवणे अवघड असते. आपल्यासारख्या सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण समाजामध्ये प्रतीकांचा वापर  हा कलावस्तूंच्या भावात्मक वापरावर अवलंबून असतो. मात्र ह्या  भावात्मक वापराविषयी  केवळ भावनात्मक साद घालून भागत नाही तर त्याला 'समाजातील सर्व घटकांची कोणत्याही पूर्वअटींशिवाय घेतली  जाणारी काळजी'  यांसारख्या मूल्यांची जोड देणे देखील आवश्यक असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे.                    

 

 

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top