ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

कोरोना विषाणूचा उद्रेक आणि सामाजिक चिंतेची तीव्रता कमी करण्याचा प्रश्न

.

कोरोना विषाणूजन्य साथीचा रोग लक्षात घेता स्वतःला पूर्णतः विलग करून घेणे, ही बाब तीव्र गरजेची बनली आहे. महामारीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपापल्या घरीच राहावे आणि सामाजिक अंतर कायम राखावे, यासाठी लोकांना नियमितपणे सावधगिरीचे इशारे देत राहणे सरकारला भाग पडत आहे. कोरोनाजन्य अरिष्टाची तीव्रता लक्षात घेता लोकांना स्वतःला वैयक्तिक पातळीवर विलग करून घेणे, ही बाब नि:संशयपणे आत्यंतिक निकडीची ठरली आहे. तथापि, सरकारांकडून सल्ला प्राप्त होऊनही आणि याबाबत सरकारांनी काही जबाबदारी घेतली असूनही लोकांना आपली चिंता किंवा नैराश्य दूर करता आलेले नाही. लोकांच्या चिंतेने / नैराश्याने दोन विरोधाभासी रूपे घेतल्याचे दिसते. 1)  तर्काधिष्ठित 2) तर्कविसंगत

युक्तिवादासाठी उदाहरण म्हणून आपण स्थलांतरित कामगारांनी आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी शहरे सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामागील तर्काधिष्ठित चिंतेचे  उदाहरण घेऊ शकतो. आपल्या घरी किंवा गावी पोहोचण्याची निकड निराधार कामगारांमध्ये इतकी तीव्र आहे की, सरकारने जर त्यांना तसे करू दिले नाही तर त्यांनी भूख हरताळ करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.  आपल्या गावी कसे पोहोचायचे? ही चिंता  खरेतर दोन कारणांनी निर्माण झाली. एक म्हणजे, या कामगारांच्या रोजगारदात्यांनी त्यांना अचानक वाऱ्यावर सोडून दिले. दुसरे म्हणजे, या कामगारांचा पुरेशा गांभीर्याने आणि समग्रपणे विचार न करता देश बंद करण्याची (लॉकडाऊन करण्याची) घोषणा अमलात आणताना केंद्र सरकारने दाखविलेला अविचारीपणा. कोणतीही प्रारंभिक पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यामुळे या कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरणे साहजिकच होते. अशा कठीण प्रसंगांमध्ये स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसे ठेवायचे,  ही त्यांची प्रमुख चिंता होती.

या तीव्र चिंतेमुळे दिल्लीमधील हजारो कामगार तीव्र संवेदनशील आणि असहायतेच्या परिस्थितीतही आंतरराज्यीय वाहतूक सेवांकडे  वळाले. यापैकी असंख्य निराधार कामगारांनी जीवाची जोखीम पत्करून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी शेकडो-हजारो किलोमीटर चालत जाण्याचा निर्णय घेतला. कोणाचीही मदत न घेता रस्त्याने चालत जाण्यामुळे चिंतेची तीव्रता वाढतच गेली. घराकडे परतण्यासाठी केलेला हा ‘लाँग मार्च’ काही ठिकाणी प्राणघातकही ठरला. अशाप्रकारे असहायतेच्या या वातावरणामध्येही या कामगारांच्या चिंतेमध्ये  तर्कशुद्धताही जाणवत होतीच. दुर्दैवाने अशा तर्कशुद्धतेचे रूपांतर काही कामगारांच्या करुण मृत्यूंमध्येही झाले. असहायतेची तीव्र भावना शहरे सोडून गावी परतण्याच्या निर्णयाला कारणीभूत ठरली. सरकार लोकांमधील चिंतेची भावना कमी करण्याच्या प्रयत्नात असूनही या भीतीजन्य चिंतेमुळे लोकांना घराबाहेर (गावाकडे जाण्यासाठी) पडणे भाग पडले. तर्कशुद्धतेच्या लोलकाच्या  दुसऱ्या बाजूला असेही अनेकजण होते की, ज्यांना घरीच राहण्याचा निर्णय घेण्याइतकी आणि तो निर्णय अमलात आणण्याइतकी “पुरेशी” संसाधने किंवा स्त्रोत उपलब्ध होते. अशा प्रकरणांमध्ये विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये तर्कशुद्धतेला आणि सुसंघटितपणे जगण्याला सर्जनशीलतेचे आणि अर्थपूर्णतेचे पैलू प्राप्त करून देणे शक्य झाले. तथापि, सामाजिक चिंतेचे प्रकटीकरण हे बहुमुखी पद्धतीचे असू शकते. म्हणजेच ही चिंता तर्कशुद्ध पद्धतीबरोबरच अतार्किक पद्धतीने समोर येऊ शकते. याचे प्रत्यंतर आपल्याला महाराष्ट्रातील अनेक गावांमधील लोकांच्या (ग्रामस्थांच्या) सामूहिक वर्तनावरून स्पष्ट होते. प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार काही ग्रामस्थांनी आपल्या गावाकडे येणारे रस्ते अनेकविध अडथळे उभे करून बंद करून टाकले आहेत. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी गावकऱ्यांनी उचललेले तर्कशुद्ध पाऊल म्हणूनही एखादी व्यक्ती याची भलामण करू शकते. त्यामुळे अन्य शहरांतील लोक गावांमध्ये येण्यास नियंत्रण राखता येईल. तथापि, अडथळे उभे करून रस्ते बंद पाडण्याचा घेतलेला निर्णय हा अतार्किक किंवा अल्पदृष्टीचा ठरू शकतो. कारण वैद्यकीय आपत्तीच्या काळात गावांमध्ये बाहेरून येऊ शकेल अशी बाह्य वैद्यकीय सेवा-सुविधा गावांपर्यंत या अडथळ्यांमुळे पोहोचणे शक्य होणार नाही. या घटकाचा ग्रामस्थांनी विचारच केलेला नाही. परिणामी (प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार) एका व्यक्तीला चांगल्या वैद्यकीय सुविधांअभावी आपला जीव गमवावा लागला. त्याचप्रमाणे वैद्यकीयदृष्ट्या निरोगी व्यक्तींना गावांमध्ये प्रवेश नाकारणे, हेही तितकेच अतार्किक वर्तन ठरते. याठिकाणी स्वसंरक्षणाच्या तीव्र भावनेचा प्रभाव तर्कदृष्ट्या विसंगत चिंतेवर गंभीरपणे पडताना दिसतो. अशाप्रकारे स्वसंरक्षणाच्या सर्वोच्च भावनेतून अतार्किक वर्तन समोर येताना दिसते. यासंदर्भात सरकारने प्रतिबंध म्हणून लादलेल्या परिस्थितीमधून निर्माण झालेली चिंता विचारात घेणेही सुसंगत ठरेल. सध्याच्या परिस्थितीत देखरेखीच्या तंत्रांमध्ये संशयित रुग्णांच्या हातावर शिक्के मारणे किंवा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणे यांचा समावेश होऊ शकतो. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्ती स्पष्ट, ओळखण्यायोग्य आणि तापासणीयोग्य (Legible, identifiable and verifiable) आहे अथवा नाही हे शासन ठरवू शकते. (या तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार व्यक्तीची ओळख निश्चित करू शकते आणि योग्य तपासणीअंती संबंधित व्यक्तीसंदर्भात निर्णय घेऊ शकते.) अस्वीकारार्ह सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेता संबंधित व्यक्ती आपल्या हातावरील हे शिक्के इतरांपासून लपवण्याच्या प्रयत्नांमधून अधिकाधिक चिंताग्रस्त ठरू शकतो. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वार्तांकनानुसार, कोरोनाविषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टरमंडळींच्या बाबतीत समाजातील अन्य लोक ‘किळसवाणा’ (Dirty) असा अपमानकारक शब्द वापरताना दिसत आहेत. यासाठी ‘एक प्रकारचा अदृश्य शिक्का’ अशी संज्ञा वापरता येईल. त्यातून संबंधित डॉक्टरमंडळीची पातळी ‘नैतिकदृष्ट्या घाणीच्या पातळी पर्यंत’ घसरल्याचे दिसते. ‘कोविड 19’ सारख्या तीव्र संसर्गजन्य रोगाने ‘नागरी समुदाया’च्या सदस्यांना आपल्या स्वतःच्या जीवासंदर्भात अधिक चिंताग्रस्त केले आहे. तथापि, जेव्हा चिंताग्रस्त लोक वैद्यकीय सेवा पुरवठादारांकडे संकट म्हणून पाहू लागतात, तेव्हा अशा चिंतेमध्ये तर्कविसंगतीचा अंश असतोच असतो.

 

Back to Top