ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

उत्तर प्रदेशात कायद्याची कसोटी

पोलिसांची आक्रमक व धमकावणारी भूमिका सभ्य समाजाला आणि लोकशाही नियमांना छेद देणारी आहे.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

‘नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम’ व ‘नागरिकांचा राष्ट्रीय नोंदपट’ यांविरोधातील राष्ट्रव्यापी निदर्शनं निग्रहाने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचं (भाजप) सरकार असलेल्या किंवा जिथे पोलिसांवर भाजप सरकारचं नियंत्रण आहे अशा राज्यांमध्ये निदर्शकांना निष्ठूरपणे दडपण्यात आल्याचं दिसतं. याच राज्यांमध्ये- कथितरित्या पोलिसांच्या गोळीबारामुळे- जीवितहानी झाल्याची माहिती समोर आहे, ही बाब सत्ताधारी पक्षासाठी विशेष लांच्छनास्पद आहे. परंतु, यासंबंधी कोणतीही खंत न बाळगता सत्ताधारी पक्षाचे नेते व त्यांच्या कट्टर समर्थकांचा वर्ग या परिस्थितीला बलवान व निश्चयी नेतृत्वाचं चिन्ह मानत आहेत. निदर्शकांचा आपण सूड घेऊ असं विधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी १९ डिसेंबर २०१९ रोजी केलं, हे तर सर्वाधिक भयावह होतं. तेव्हापासून या राज्यात पोलिसांच्या क्रौर्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, ठराविक घटकांना लक्ष्य ठरवून कारवाई केली जाते आहे, मनमानी पद्धतीने लोकांना अटक केलं जातं आहे. स्वतःच्याच जनतेमधील विशिष्ट घटकाविरोधात सरकार खरोखरच सूड घेतंय.

आत्तापर्यंत उत्तर प्रदेशात या घडामोडींमध्ये १९ जणांचा जीव गेला आहे, परंतु सरकारने समेट साधण्याची भूमिका अजिबात घेतलेली नाही. या जीवितहानीची जबाबदारी घेण्याची तर बातच दूर. सुरुवातीला पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केल्याचं सरळ नाकारलं आणि सगळा दोष निदर्शकांवरच टाकायचा प्रयत्न केला. व्हिडिओ स्वरूपातील पुरावा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यावर मात्र पोलिसांना स्वतःची कृती कबूल करणं भाग पडलं, पण तरीही आत्मसंरक्षणासाठी कारवाई झाल्याचं समर्थन पोलिसांनी केलं. लोकनिर्वाचित सरकारच्या दृष्टीने जीवितहानी म्हणजे गंभीर नैतिक संकट अथवा पराभव असतो. त्यामुळे योग्य चौकशी करून अपराध्यांना शिक्षा करणं गरजेचं असतं. परंतु, उत्तर प्रदेशात अपराध्यांना पाठीशी घातलं जातं आहे आणि सरकारच त्यांना आश्रय देताना दिसतं. प्रत्यक्ष घडामोडींसंबंधीचा अधिकाधिक पुरावा सरकार व एकंदर यंत्रणेच्या अपराधाकडे निर्देश करतो आहे. मूलतः पोलीस ही नागरी सेवा आहे, सैनिकी सेवा नव्हे, हे उत्तर प्रदेश पोलीस विसरले असावेत किंवा त्यांना हे विसरायला लावण्यात आलं असावं. उत्तर प्रदेश हा काही अशांत प्रदेश किंवा संघर्ष क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला नाही, अशा वेळी पोलिसांनी अंगीकारलेल्या सैनिकी भूमिकेचं काहीच समर्थन देता येत नाही. कोणत्याही सभ्य समाजामध्ये पोलिसांनी चिथावणी दिल्यावरही संयम दाखवणं अपेक्षित असतं. पण उत्तर प्रदेशातील पोलिसांनी विशिष्ट समुदायाला आक्रमकतेने लक्ष्य केल्याचं दिसतं आणि निदर्शक हिंसाचार करत आहेत असं शंकास्पद कारण देऊन पोलीस ही कारवाई करत आहेत. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि हिंसाचारात सामील झालेल्या व्यक्तींची मुखवट्याआड लपलेली ओळख उघड करण्यासाठी निःपक्षपाती चौकशीची गरज आहे.

बुलंदशहर इथे जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाची जमावाने हत्या केली, तेव्हासुद्धा अशी तत्परता दिसली नव्हती, हे आश्चर्यकारक आहे. जमावाला पांगवण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागतो आणि आता पोलीस विशिष्ट  समुदायाविरोधात झुंडीसारखं वागत आहेत, हे कायद्याच्या राज्याचं विडंबन आहे. जेमतेम तीन दिवसांचं संक्षिप्त प्रशिक्षण मिळालेले तथाकथित पोलीसमित्र या कारवाईत मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. यातूनही पोलिसांच्या झुंडसदृश वर्तनाची आणखी एक संभाव्य बाजू समोर आली. हे लोक टोकाच्या उजव्या हिंदुत्ववादी गटांमधून भरती करून घेतलेले आहेत, अशी भीती काही विरोधी नेत्यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायामध्ये भीतीची भावना निर्माण करून त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी पोलिसांनी घरं अस्ताव्यस्त केली, मालमत्तेची नासधूस केली आणि लोकांना धमकावलंही, अशा बातम्या आल्या आहेत. विशिष्ट घटकावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्याचं ठरवल्याप्रमाणे मनमानी पद्धतीने लोकांना अटक करण्यात आलं. अल्पसंख्याकांवर कोठडीत अत्याचार झाल्याचे संतापजनक प्रसंगही समोर आले आहेत. सामाजिक वीण उसवणारी कारवाई करण्याला आणि जीवितहानीला प्रोत्साहन देणारं सरकार व पोलीस निदर्शकांकडूनच (आणि निदर्शनांमध्ये सामील न झालेल्या मुस्लीम समुदायातील व्यक्तींकडून) सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाबाबत भरपाईची मागणी करत आहेत, हा क्रूर उपहास म्हणावा लागेल. राजकीय कार्यकारीसंस्थेकडून संरक्षण किंवा सक्रिय प्रोत्साहन मिळाल्याशिवाय अशा कृती घडल्या असतील, असं मानणं अवघड आहे. विशेषतः या सरकारने विविध प्रसंगी स्वतःचा प्रतिगामी स्वभाव दाखवून दिला असताना, असा विश्वास ठेवता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेश पोलीसशासित राज्याकडे वाटचाल करतं आहे आणि त्याला धर्मसत्तेचाही रंग आहे, असं दिसतं. अशा राज्यात लोकशाही अधिकारांना कायमचं दडपलं जातं. सकृत्दर्शनी निराधार असलेल्या गंभीर आरोपांखाली ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्यांना असमर्थनीयरित्या अटक करण्यात आली, यावरूनही हे सिद्ध होतं. अटक झालेल्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याच्या आणि प्राथमिक अधिकार नाकारण्यात आल्याचं कळतं. या अटकसत्राचा विशिष्ट आकृतिबंधही दिसतो. परिघावरील समुदायांच्या अधिकारांसाठी अथकपणे लढणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात डांबण्यात आलं आहे, जेणेकरून पोलिसांच्या निष्ठूरतेबाबत मतभिन्नतेचा आवाज उठवला जाऊ नये आणि न्यायाची मागणी होऊ नये.

जगण्याचा, शांततापूर्णरित्या एकत्र जमण्याचा, निदर्शनं करण्याचा मूलभूत अधिकार नाकारून आपल्याला दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा अप्रत्यक्षरित्या देण्यात आला आहे, ही मुस्लीम समुदायातील भीती उत्तर प्रदेश सरकारच्या वर्तनामुळे खरी ठरते. या समुदायाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे, आणि अपवाद वगळता या घटनांचं वार्तांकन झालेलं नाही, किंवा झालंच असेल तरी त्यात पूर्वग्रह दिसत राहिलेला आहे. अशा प्रकारे भय आणि संघर्षाचं वातावरण लोकशाही राज्यव्यवस्थेला व सभ्य समाजाला छेद देणारं आहे. त्यामुळे सर्व समाजघटकांनी सरकारला उत्तरदायी राहण्यासाठी भाग पाडण्याची व लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी उभं ठाकण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांनी या संदर्भात लोकमत जागृत करायला हवं, जेणेकरून सामाजिक धृवीकरण हे आपल्या दैनंदिन जगण्याचं कायमस्वरूपीय वैशिष्ट्य होऊ नये.

Updated On : 22nd Jan, 2020

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top