ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

राजकीय भविष्यसूचकतेमधील जोखीम

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

सुरुवातीलाच एक खुलासा करणं गरजेचं आहे. निवडणूकविषयक तज्ज्ञ, भाष्यकार व निरीक्षक वेळोवेळी निवडणुकांबाबत विश्लेषण करताना वापरतात ती भविष्यसूचकता मला इथे अभिप्रेत नाही. मतचाचण्यांद्वारे निवडणुकीय निकालांचा कल शोधून त्यातून केली जाणारी भाकितंही मला इथे अभिप्रेत नाहीत. निवडणूकपूर्व काळात निरीक्षक मतदारांशी संवाद साधून राजकीय मानसिकतेचा अंदाज बांधताना जी भाकितं करतात, त्याच्याशी संबंधित उपरोक्त प्रक्रिया आहेत. भविष्यसूचकतेची ही संकल्पना राजकारणाच्या एका विशिष्ट अवकाशात उपयुक्त ठरत असेलही, परंतु दुसऱ्या अवकाशात ती उपयुक्त ठरेलच असं नाही. ‘भविष्यसूचकता’ या शब्दाकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. विशेषतः आपल्याकडील पक्षीय राजकारणाचं आकलन करून घेण्यासाठी असा दृष्टिकोन गरजेचा आहे, कारण या राजकारणाचं मुख्य उद्दिष्ट सत्ता काबीज करणं हेच असतं. राजकीय पक्षांचं भविष्यसूचकतेविषयीचं आकलन आणि तज्ज्ञ व विश्लेषक यांच्या आकलनातील भविष्यसूचकतेची संकल्पना यांच्यात फरक असतो, असा युक्तिवाद करता येईल. आपल्या पक्षाचं निवडणुकीय भवितव्य उजळून निघावं या दिशेने, विशिष्ट पद्धतीने मतदारांनी मतदान करायला हवं, ही राजकीय पक्षांची अपेक्षा आपण इथे चर्चेला घेतो आहोत.

विशिष्ट मतदार विशिष्ट पक्षाच्या रचनेनुसार मतदान करेल, अशा संभाव्यतेवर मतदारांच्या निवडीविषयीचं भाकित केलं जातं. परंतु, ही संभाव्यता आणि निवडणुकीतील मतदारांचं एकत्रीकरण यांमध्ये गुणात्मक फरक असतो. काही पक्ष मतदारांसमोरच्या व्यावहारिक प्रश्नांना धरून मतदारांना एकत्र आणतात. अशा एकत्रीकरणामध्ये विशिष्ट राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांमधील वाटा उचलून मतदार स्वतःची राजकीय स्वायत्तता उपयोगात आणतात. दुसऱ्या बाजूला, मतदारांच्या निवडीविषयीची भविष्यसूचकता आपल्याला अनुकूल कशी करायची, एवढा एकमेव उद्देश असलेल्या पक्षांचे प्रयत्न मतदारांचं रचित उभारण्याचे असतात. २०१४ व २०१९ या वेळी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसून आल्यानुसार, भावनिक मुद्दे उचलून, खोटी प्रमेयं मांडून, बनावट बातम्या पेरून आणि अगदी उघडउघड खोटं बोलून स्वतःला अनुकूल मतदारांचं रचित उभारण्याचं राजकारण केलं जातं.

असं खोटं बोलणं स्वीकारलं जातं किंवा लोक स्वतःची फसवणूक करवून घेतात, त्यामागची बौद्धिक व सांस्कृतिक परिस्थिती कशी असते? कोणाला मतदान करायचं, याचा निर्णय घेताना संबंधित खोटं स्वीकारलेल्या व्यक्तीला वा मतदाराला अधिक माहिती मागण्याची गरज वाटत नाही. त्यांना बौद्धिक समाधान मानावं लागतं. राष्ट्रवादासारख्या सार्वजनिक मुद्द्यांना बरंच भावनिक पाठबळ असतं, त्यातून मतदारांना पूर्ण समाधानाची भावना मिळते. शिवाय, इतर वेळी धडधडीत असत्य असल्याचं सहज समजून येईल, किमान विवेकी दृष्टीला त्यातला खोटेपणा जाणवेल, अशी आश्वासनं त्रस्त मतदार स्वीकारतात. भारतीय जनता पक्षाला २०१४ व २०१९ या दोन्ही वेळच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात भविष्यसूचकतेचा लाभ झाला, त्यामागे हे दोन घटक कारणीभूत होते. २०१४च्या निवडणुकीवेळी भाजपने आश्वासनांचा तडाखा लावला आणि २०१९ साली भावनिक मुद्दे वापरून मतदारांना आपल्या बाजूला करून घेतलं. अशा राजकारणामध्ये विचारविमर्श, चर्चा व संवाद यांना काही जागा नसते.

अशा पक्षाचा प्रभाव इतका असतो की, सरकारची धोरणं लोकस्नेहीच आहेत, सरकारने मंजूर केलेला कायदा योग्यच आहे, आणि सरकारची भारताविषयीची दृष्टी प्रत्येकासाठी पुरेशीच आहे, ही सरकारची मांडणी लक्ष्य गट वा मतदार स्वीकारतात. अशा स्व-रचितामध्ये चैतन्यशील, पारदर्शक राजकारणामधील योगदानाची गरज नाकारली जाते. त्याचप्रमाणे पारदर्शक राजकारणाचा समावेश असेल अशा प्रक्रियेमध्ये लक्ष्य मतदारांनी काही योगदान देऊ नये, अशी सरकारची व सरकारसमर्थकांची अपेक्षा असते. या संपूर्ण प्रक्रियेने लोकशाहीच्या जीवनाची हानी होते. अशा वेळी, मतदार आणि ते राहातात तो प्रदेश विशिष्ट सत्ताकांक्षी पक्षाच्या हातातील केवळ बाहुलं होऊन जातो. जनतेशी किंवा मतदारांशी खोटं बोलल्याने त्यांचा विवेक हिरावून घेतला जातो. निवडणुकीय राजकारणात चिकित्सक निर्णय घेण्यासाठी विवेक गरजेचा असतो. अशा वेळी लोकांच्या आत्मसन्मानाची कसोटी लागते. हे पक्ष मतदारांना कोणतंही सघन मूल्य देऊ करत नाहीत, त्यांना केवळ साधन मूल्य म्हणून वापरलं जातं.

परंतु, पाच राज्यांमधील अलीकडच्या निवडणुकीय निकालांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की, इतरांपेक्षा कायमस्वरूपी वरचष्मा राखण्यासाठी कोणत्याही पक्षाला स्वतःचा प्रभाव वापरता येणार नाही. राजकीय नियंत्रण स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न जोखमीचा असतो. सत्ताधारी पक्षाची भविष्यसूचकता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी खोटी ठरलेली आहे. भविष्यसूचकतेची वाट तयार करणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवं की, संभाव्य समर्थकांचं रचित तयार करणं म्हणजे यशवृद्धीची किंवा अधिक काळ- अथवा कायमस्वरूपी- सत्ता चालवण्याविषयीची हमी नसते.

Back to Top