ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

राजकारणाची स्थितिगती

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

महाराष्ट्रातील राजकारणाची सध्याची स्थितिगती दोन प्रकारच्या विधानांनी निर्धारित होते आहे, आणि यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष गुंतलेले आहेत. या तीन पक्षांनी राज्यात सरकार स्थापन करायलाच हवं, हे यातलं पहिलं विधान. आणि, या पक्षांनी राज्यात स्थापन करावं, हे दुसरं विधान. पहिल्या विधानामध्ये ‘च’ आहे, त्यातून निकड अधोरेखित होते, तर ‘करावं’ हे क्रियापद वापरणारून थांबणारं दुसरं विधान इष्टतासूचक आहे. उपरोल्लेखित पक्ष या दोन विधानांमध्ये हेलकावत आहेत. तर, राजकीयदृष्ट्या अचूकता राखण्याची सवय असलेल्या ‘राजकीय भोंदूं’नी विशेषतः काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी काही ठोस सूचना केल्या आहेत- या पक्षांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू’च’ नये, ही त्यांची सूचना आहे. अशा सूचनांमधील ‘च’ची भाषा निवडणुकीय राजकारणाची विशिष्ट दिशा गृहित धरते आणि चर्चाविमर्शाला काहीच अवकाश सोडला जात नाही. राजकारणाचा ‘शुद्ध’ दृष्टिकोन राखणाऱ्या काही राजकीय भाष्यकारांच्या मते, नैतिकदृष्ट्या हे तीनही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे पात्र नाहीत. या दृष्टिकोनानुसार, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची ‘इहवादा’बाबतची (सेक्युलॅरिझम) निष्ठा संशयास्पद आहे. परंतु, अशा साशंकतेच्या वातावरणातही उपरोल्लेखित तीन पक्षांमधील चर्चामसलत सुरू आहे, आणि माध्यमांमधील बातम्यांनुसार, सरकारस्थापनेच्या दिशेने या पक्षांची वाटचाल सुरू आहे.

त्यांच्यातील चर्चा बरीचशी ढोबळ राहिली असली, तरी सरकारस्थापनेसंदर्भातील चर्चांना अजून या पक्षांनी पूर्णविराम दिलेला नाही. गेला काही काळ बंद दरवाज्याआड होत असलेल्या या चर्चांवरून सरकारस्थापनेची व्यावहारिक निकड या पक्षांच्या आता लक्षात आल्याचं दिसतं आहे. प्रत्येक पक्ष आपापले आस्थाविषय या चर्चांमध्ये मांडत असल्याचं सांगितलं जातं. विशेषतः काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी सावधानता पावलं उचलून काही प्रमाणात ‘स्पष्ट’ स्वरूपाची संदिग्धता जाणीवपूर्वक राखल्याचं दिसतं. या ‘सावधानते’मुळे चर्चा ‘अशक्य’ असल्याचा दृष्टिकोन टाळता आला असावा.

कट्टर हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेने सौम्य करावी, अशी अपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून चर्चांमध्ये उपस्थित केली जाणं स्वाभाविक आहे. बहुविधतावाद व सांप्रदायिक सौहार्द या मूल्यांबाबत काही तडजोड केली जाऊ नये, असं यातून ध्वनित होतं, पण अपवादात्मक परिस्थिती ही मूल्य खूण म्हणून वापरणं गरजेचं असतं असाही संकेत यातून दिला जातो आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आस्थाविषयांमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींच्या कचाट्यातून सोडवण्यासारखे मुद्दे प्रबळ होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वनिष्ठेसारखे मुद्दे सौम्य करणं शक्य होईल. इथे पुढील प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे: शिवसेना प्रगतिशील दृष्टिकोनाने व निर्धाराने जबाबदार पावलं उचलेल, की रुढीवादी (कन्झर्वेटिव्ह) मानल्या जाणाऱ्या धर्मनिष्ठेकडेच जाईल? गतकालीन प्रतिगामित्वावर दृढ श्रद्धा ठेवणं आणि उतरंडीवर आधारित सामाजिक व्यवस्थेची चिकित्सा करण्याबाबत पूर्ण मौन धारण करणं, यांमुळे सदर निष्ठेला रुढीवादी म्हटलं आहे. या संदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांबाबत एक प्रश्न उपस्थित करावा लागतो: जबाबदार निर्धार दाखवून त्याभोवती आपलं राजकारण संघटित करण्याची बांधिलकी हे दोन्ही पक्ष कायम ठेवतील का? या संदर्भात संबंधित पक्षांकडून स्पष्ट उत्तरांची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही, सातत्याने होणाऱ्या चर्चांद्वारेच यातून काही मार्ग निघेल आणि हानिकारक निष्ठा दूर ठेवणं शक्य होईल.

राजकारणाच्या चर्चाविमर्शप्रधान अवकाशामध्ये जबाबदार निर्धार कायम ठेवून परिशीलन करणं आवश्यक असतं. अशा प्रकारच्या निर्धारामध्ये सर्वसाधारणतः सक्तीची भाषा वापरली जात नाही. चर्चेत सहभागी झालेल्या पक्षांच्या परस्पर लाभासाठी सत्तेचं वाटप करणं, या व्यावहारिक गरजेतून ही भाषा उद्भवते. नैतिकदृष्ट्या सजग चर्चाविमर्शांमध्ये जबाबदार निर्धाराचा समावेश असतोच. सर्वसामान्य लोकांना खरोखरच कशाची गरज आहे, याला अशा चर्चांमध्ये प्राधान्य असतं. हे प्राधान्य केवळ बोलण्यापुरतं असून चालत नाही, तर त्याला वास्तवात आधार असावा लागतो.

सक्तीविना निर्धार टिकून राहातो, असा याचा अर्थ नाही. राजकीय पक्षांना जबाबदार निर्धार दाखवणं भाग पडतं. समाजामध्ये शांतता व सांप्रदायिक सौहार्द आणि बहुधा मैत्री टिकून राहावी यासाठी असा निर्धार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे विवंचनेत असलेल्यांना वाचवण्यासाठी वेगाने कृती करण्यासाठीही हा निर्धार गरजेचा ठरतो. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांनंतर राजकीय अस्थिरता पसरली आहे, अशा वेळी जबाबदार निर्धारासाठीचा अवकाश निर्माण होतो. त्याचप्रमाणे नैतिक निर्धारासाठीच्या अवकाशालाही यातून चालना मिळू शकते. परिणामी, धार्मिक प्रतीकांद्वारे सांप्रदायिक संघटन करून जनतेची दिशाभूल करण्यापासून पक्षांना रोखणं शक्य होतं. सांप्रदायिक सौहार्दाबाबतची नैतिक बांधिलकी एकदा सिद्ध करून जबाबदार निर्धार थांबत नाही, तर काळजीपूर्वक सातत्याने चर्चाविमर्श करून, संवाद साधून हा निर्धार विकसित करावा लागतो. केवळ पक्ष कार्यकर्त्यांशी हा संवाद साधून पुरत नाही, तर सर्वसाधारण जनतेशी संवाद साधणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

Back to Top