चूक व तिचं राजकारण
राजकीय निवडीमध्ये व निर्णयामध्ये आपण चूक केल्याची जाहीर कबुली राजकीय नेत्यांनी देणं, आजकाल दुर्मीळ झालेलं आहे. सत्य शोधण्यात रस नसल्यामुळे अनेक नेते अशी काही कबुली देत नाहीत. परंतु, काही मोजके नेते मात्र त्यांच्या राजकीय निवडीतील चुकांची जाहीर कबुली देण्याचं नैतिक सामर्थ्य राखून असतात. तर, एका बाजूला कबुलीचा अभाव आणि दुसऱ्या बाजूला कबुली देण्याची कृती, या दोन्हींचा विचार करता चूक व दुरुस्तीचं राजकारण यांचं नातं अवघड व व्यामिश्र असल्याचं दिसतं. पारदर्शक परंतु अनिश्चित राजकारणामध्ये राजकारणाचा नैतिक पाया बळकट करण्यासाठी चूक होणं व ती दुरुस्त करणं तार्किकदृष्ट्या आवश्यक बनतं.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
राजकीय निवडीमध्ये व निर्णयामध्ये आपण चूक केल्याची जाहीर कबुली राजकीय नेत्यांनी देणं, आजकाल दुर्मीळ झालेलं आहे. सत्य शोधण्यात रस नसल्यामुळे अनेक नेते अशी काही कबुली देत नाहीत. परंतु, काही मोजके नेते मात्र त्यांच्या राजकीय निवडीतील चुकांची जाहीर कबुली देण्याचं नैतिक सामर्थ्य राखून असतात. तर, एका बाजूला कबुलीचा अभाव आणि दुसऱ्या बाजूला कबुली देण्याची कृती, या दोन्हींचा विचार करता चूक व दुरुस्तीचं राजकारण यांचं नातं अवघड व व्यामिश्र असल्याचं दिसतं. पारदर्शक परंतु अनिश्चित राजकारणामध्ये राजकारणाचा नैतिक पाया बळकट करण्यासाठी चूक होणं व ती दुरुस्त करणं तार्किकदृष्ट्या आवश्यक बनतं. राजकारणाच्या अनिश्चित स्वरूपामुळे अनुभवातून शिकण्याला व सुखकारक शेवटापर्यंत पोचण्याला अवकाश मिळतो.
दोन प्राथमिक घटकांमुळे चूक होऊ शकते: एक, स्पष्ट उद्दिष्ट साध्य करायचं असणं; आणि दोन, पारदर्शक व अनिश्चित राजकीय परिस्थितीमध्ये हे उद्दिष्ट साध्य करावं लागणं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, निश्चित आराखडा किंवा सरळसोट मार्गक्रमणा तयार केलेली असेल, तर चूक होण्याची शक्यता फारशी नसते. देशातील डाव्या राजकारणाला हे कमी-अधिक प्रमाणात लागू होतं. या राजकीय शक्तींनी काही निश्चित तत्त्वांनी नियमन होणारा अवकाश म्हणून राजकारणाकडे पाहिलं, असं विवाद्यरित्या म्हणता येतं. आपल्या तत्त्वांच्या अचूकतेविषयी खात्री असलेल्या राजकीय नेत्यांना- विशेषतः गांधीवादी व डाव्या विचारांकडे कललेल्या राजकीय नेत्यांना प्रगतिशील संधीसुद्धा प्रतिगामी चूक असल्याचं वाटू शकतं. राजकारणाचं नियमन करणारी अशी तत्त्वं चुकीला वाव ठेवत नाहीत, त्यामुळे संधी गमावण्याचा प्रश्नही येत नाही, कारण मुळात अनिश्चित संधी साधण्याचा प्रयत्नच केला जात नाही.
त्याचप्रमाणे कोणताही निर्णय घेणं किंवा जाहीररित्या राजकीय भूमिका घेणं नाकारणाऱ्यांकडूनही चूक होण्याची शक्यता नसते. कितीही महत्त्वाचा प्रश्न असला, तरी त्यासंबंधी भूमिका न घेतल्यामुळे काही नेत्यांना व चित्रपट तारेतारकांसारख्या सार्वजनिक व्यक्तिमत्वांना सुरक्षित वाटतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, चूक होण्याला वाव दिल्यामुळे रोगट साशंकता दूर राहाण्याची शक्यता निर्माण होते. परंतु, दुरुस्ती न करता नियमितपणे चुकाच करत राहिलं, तर त्यातून निराशा निर्माण होऊ शकते. परिणामी, दुरुस्तीच्या कृतीमधील नैतिक अर्थपूर्णताही कमी होत जाते. उदाहरणार्थ, काही राजकारणी व्यक्ती खोटं बोलण्यासाठीच प्रसिद्ध असतात.
या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो: कोणत्या परिस्थितीत चूक दुरुस्त करता येते? विशेषतः सद्यकाळातील राजकारण्यांची राजकीय मनस्थिती लक्षात घेता, चूक या संकल्पनेवर प्रबंध लिहून चूक दुरुस्त करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. चूक दुरुस्त करण्याचा अवकाश राजकीय क्षेत्रतच सापडतो. अनुभवी पण आस्थेवाईक राजकीय नेते चूक कबूल करताना नैतिक पातळीवर लोकभावनेला हात घालतात आणि लोकांना स्वतःच्या बाजूने वळवतात. बहुधा त्यांची बाजू सत्याची असते. चूक जाहीररित्या कबूल केल्यामुळे पक्षांना स्वतःच्या राजकारणाचा नैतिक पाया विस्तारण्यासाठी मदत होते. महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशा कबुलीचा परिणामकारक वापर करण्यात आला. चुका कबूल करणं आणि त्या दुरुस्त करायची तयारी दाखवणं, याला काहीएक नैतिक मूल्य आहे. भविष्यातील राजकीय निर्णय घेताना मात्र त्या चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये, तरच ते नैतिक मूल्य टिकून राहातं. गतकाळातील चुका ओळखणं, वर्तमानात त्या दुरुस्त करणं आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची खातरजमा करणं, या प्रक्रियेतून राजकारणाचा नैतिक पाया दृढ होतो. तर, राजकारणातील चुकांची दुरुस्ती वैयक्तिक सूडबुद्धीतून करता येत नाही, तर मुक्तिदायी राजकारणाच्या दिशेने तिचा रोख असावा लागतो. किंबहुना, चुका दुरुस्त केल्याने नैतिक प्रभुत्वसत्ता निर्माण होते. काही घटकांना- विशेषतः परिघीय समुदायांमधील घटकांना फोडून स्वतःचं सामाजिक वर्चस्व लादण्याचा राजकीय प्रकल्प काही राजकीय शक्ती राबवत असतात, त्यांच्या विरोधात राजकीय ऐक्य साधायचं असेल, तर ही प्रभुत्वसत्ता आवश्यक ठरते. चुकांची जबाबदारी स्वीकारणं आणि स्वतःचे दोष कबूल करणं, याला नैतिक मूल्य आहे. यातून नैतिक प्रभुत्वसत्ता उभारण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यातून पुढे राजकीय ऐक्य तयार होतं. याउलट, ही सारासार विवेकबुद्धी न वापरता केल्या जाणाऱ्या चुका नैतिकदृष्ट्या दोषार्ह ठरतात. समतावादी, लोकशाही व समावेशक भारताच्या जडणघडणीत रस नसलेल्या राजकीय शक्ती वर्तमानात चुका करत स्वतःचं काम साधतात आणि गतकाळातील चुकांचा संदर्भ सातत्याने देत राहातात.