ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

लोकशाहीमधील वास्तव आणि बनावट

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

सक्षम लोकशाहीमध्ये बनावट बातमीचं अस्तित्व विरोधाभासी वाटतं. अशा स्वरूपाच्या लोकशाहीमध्ये वास्तव गैरसोयीचं असलं तरी, त्याच्या अभिव्यक्तीला अवकाश मिळतो. राजकीय नेत्यांच्या उक्तीमधून आणि इतर सामाजिक स्वरूपाच्या मांडणीमधून हे वास्तव समोर येतं. माध्यमांमधून होणारा प्रसार आणि विमर्शप्रधान लोकशाहीमधील युक्तिवादांची मांडणी- या दोन्ही अर्थांनी वास्तवाचं अस्तित्व पारदर्शक असायला हवं. आदर्शलक्ष्यी जबाबदारी पेलणाऱ्या माध्यमांनी संदेशनाद्वारे वास्तवाचा आशय विपरित न करता सर्वदूर पोचवायला हवा. सामाजिक जाणीव आणि वास्तवाचे पडसाद यांना जोडण्याची महत्त्वाची भूमिका माध्यमं निभावतात. समाजातील वास्तवाभोवती लोकशाही संभाषित उभारण्याची वाढीव जबाबदारी माध्यमांवर असते. या संदर्भात बनावट बातम्या समाजातील आदर्शाच्या विपरित वाटतात. तरीही, पाश्चात्त्य देशांमध्ये आणि भारतातही बनावट बातम्यांमुळे लोकशाहीचा पोत बिघडत असल्याचं आपण अनेकदा ऐकतो.

परंतु, अवास्तव किंवा विपरित माहितीचा प्रसार करण्यापुरतं बनावट बातमीचं घटित मर्यादित नाही. खोटी आश्वासनं देणं, विशेषतः निवडणूक प्रचारादरम्यान अशी आश्वासनं देणं किंवा अपयशाला देदिप्यमान यश असल्याप्रमाणे सादर करणं, हेही बनावट बातम्यांचेच प्रकार आहेत. विरोधकांकडून नेहमी केल्या जाणाऱ्या तक्रारींवर या निरीक्षणाद्वारे शिक्कामोर्तब होतं.

औपचारिक संस्थात्मक सत्ता मिळवू पाहणारे किंवा आपल्या सत्तेला कार्यक्षम करू पाहणारे लोक सर्वसाधारणतः बनावट बातम्यांचा वापर करतात, असं गृहित धरलं जातं आणि अनेकदा तसं दिसतंही. पण सत्ता काबीज करण्यासाठी किंवा सत्ता वाचवण्यासाठी बनावट माहिती वा बातम्यांची गरज अशा राजकारण्यांना का भासते?

अमेरिकेतील आणि भारतातील निवडणुकीय स्पर्धांच्या संदर्भात एक साधं उदाहरण देता येईल. सत्तेच्या खेळामध्ये आपल्या सर्वांत जवळच्या राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठीच राजकारणी बनावट बातम्यांचा वापर करताना दिसतात. सत्तेत आलेल्या पक्षाला बनावट माहिती, अपुरी आकडेवारी आणि इतर प्रकारची फसवणूक वापरून स्वतःची संस्थात्मक सत्ता राखावी लागते. अशा पक्षांकडे स्वतःच्या सत्तेला कार्यक्षम बनवण्यासाठी उत्तम नमुने नसतात आणि आश्वासनपूर्तीचा पुरावाही नसतो, हे उघड आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, सत्तेमध्ये असलेले लोक ‘वाईट नमुने’ वापरायचं टाळतात. जीवनमानाची ढासळती पातळी, वाढता सामाजिक ताण, बाजारपेठे व वित्तीय संस्थांची चंचलता यांसारख्या अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या घटकांचा यात समावेश होतो. सत्ताधारी पक्षांनी अशा वाईट नमुन्यांची थेट मांडणी केली, तर लोकांचा पाठिंबा गमावण्याचा धोका त्यांना पत्करावा लागेल आणि विरोधकांना कठोर हल्ल्यासाठी भूमी उपलब्ध होईल. तर, दृश्य पातळीवर तरी विरोधकांचा आवाज कमी करणं, हे बनावट बातम्यांचं लक्ष्य असल्याचं दिसतं.

पण पक्षांकडून होणारा विरोध हा दुय्यम प्रतिस्पर्धी असतो, असं सत्ताधारी पक्षाच्या उद्देशांचा सखोल तपास केल्यावर निदर्शनास येतं. बनावट बातम्यांचं प्रमुख लक्ष्य मतदार असतात. निवडणुकीय पाठिंब्याच्या बाबतीत त्यांना गृहित धरता येत नाही. सर्वसामान्य लोकांवर परिणाम करणाऱ्या अनेक मूलभूत प्रश्नांवर काम करण्यात सत्ताधारी पक्षाला अपयश आलं, तर मतदार त्याविरोधात मतदान करू शकतात. त्यामुळे मतदारांकडे दुर्लक्ष करता येत नाही, त्यांचा समावेश असलेला बनाव रचावा लागतो. तर, बनावट बातमी व सत्य यांचा संबंध नसतो, तर लोकांना सत्यापासून दूर देण्याशी अशा बातम्यांचा संबंध असतो. तर, सत्तेची अमर्याद हाव असलेल्या अशा पक्षांसाठी फसवणुकीद्वारे मोकळं मैदान पुरवलं जातं. अशा पक्षांसाठी बनाव रचणं हीच एक कृती झालेली असते. अशा बनेलगिरीमुळे/फसवणुकीमुळे लोकांच्या आकलनक्षमतेचा ऱ्हास होतो.

या फसवणुकीसाठी साधनमात्र झालेला माणूस विवेकबुद्धी वापरायचं थांबवतो, त्यामुळे वास्तवापासून बनावट गोष्ट त्याला वेगळी काढता येत नाही अथवा फसव्या गोष्टीतून वास्तव जोखता येत नाही. वास्तवाचं विपरित रूप स्वीकारण्यासाठी मतदार तयार आहेत की नाही, यावर बनावट बातम्यांचं यश अवलंबून असतं. बहुतेकता सत्ताधारी पक्षाच्या प्रत्यक्षातील कामगिरीला वास्तवाहून भिन्न रूपात दाखवण्यासाठी हा प्रकार केला जातो. अशी लोकांची फसवणूक करणं म्हणजे मतदारांना स्वयंनिर्णयनाचा अधिकार नाकारण्यासारखं आहे. चिकित्सक क्षमतेद्वारे घेतला जाणारा स्वायत्त निर्णय या परिस्थितीत बिघडून जातो. सर्वसामान्य लोक आणि स्वतंत्र निवाडा करण्याची त्यांची क्षमता, याच गोष्टी सत्ताधारी पक्षांच्या अंतर्गत कारस्थानांविरोधात जाण्याची शक्यता असते.

लोकशाहीवर बनावट बातम्यांचे कोणते परिणाम होतात? लोकशाहीती एका अधिक गंभीर समस्येचे संकेत बनावट बातम्यांच्या घटिताद्वारे मिळतात. लोकांनी स्वतःची फसवणूक करवून घ्यावी यासाठी सत्ताधारी पक्षांनी बनावट बातम्यांचा अतिरिक्त वापर केला, तर त्यातून लोकशाहीमध्ये संकट निर्माण होतंच, शिवाय त्याहून अधिक गंभीर व्यवस्थात्मक संकटही निर्माण होतं. या संकटामुळेच सामाजिक विभागण्या होतात व आर्थिक मंदीसदृश वातावरण निर्माण होतं. इतर लोकांचा अजाणपणा व बलहीनता यांना चालना देऊन स्वतःची कार्यक्षमता वाढवू पाहणारी कृती अंतिमतः अपयशीच ठरते, हे खरं आहे.

Back to Top