ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

खुलाशाचं राजकारण

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

औपचारिक, विशेषतः निवडणुकीय, राजकारणाच्या अवकाशांमध्ये सहभागाच्या पातळीवर दोन वरकरणी विरोधी भूमिकांचंच प्राबल्य राहिलेलं आहे, पण या भूमिका मूलतः सारख्याच आहेत. विकास, सुशासन व चैतन्यशील राष्ट्रवाद यांच्यासाठी आपण मतं देतो आहोत, असाकाहीतरी ‘सार्वत्रिक’ दावा मतदारांनी करणं, ही पहिली भूमिका. विशिष्ट वैयक्तिक हितसंबंधांपेक्षा सामायिक हितामध्ये आपल्याला जास्त रस आहे, असं काहीसं मतदार यातून सुचवतात. तर, या पहिल्या भूमिकेतला खुलासा काहीसा अप्रत्यक्ष आहे. परंतु, विविध पातळ्यांवर निवडणुका लढवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बाबतीतला खुलासा सर्वसाधारणतः अधिक थेट असतो. आपण स्वतःच्या हितासाठी निवडणुका लढवत नसून, सर्वसामान्यांच्या हितरक्षणासाठी निवडणुकीत उतरतो आहोत, असा सार्वजनिक पवित्रा राजकारणातील इचुछुक उमेदवार बहुतेकदा घेतात. उमेदवारांनी वा त्यांच्या समर्थकांनी केलेल्या या खुलाशाचं प्रतिबिंब निवणुकीच्या मोसमात ठळकपणे पडतं, आणि या नेत्यांकडून अवाजवी आश्वासनं दिली जातात. इथे काही प्रश्न उपस्थित होतात: विशेषतः राजकीय इच्छुकांना निवडणुका लढवण्यासाठी कोणती इच्छाशक्ती प्रेरणा देते? निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या त्यांच्या निर्णयावर सामूहिक हिताचा प्रभाव असतो की स्वहिताचा? या प्रश्नांचं उत्तर बहुतांशाने सार्वत्रिक हिताच्या बाजूने जाणारं नाही, तर विशिष्ट वैयक्तिक हिताकडेच जाणारं आहे.

निवडणुकीय राजकारणाचा अवकाश आणि औपचारिक राजकीय व संस्थात्मक सत्तेचा वरचष्मा, यांमुळे अनेक राजकीय नेत्यांचं वैयक्तिक हित साधलं गेलं आहे. हे हित स्पष्टपणे दृश्यमान होणारं आहेच, शिवाय अमूर्त पातळ्यांवरही त्याचं अस्तित्व जाणवतं. काही नेत्यांची भौतिक संपत्ती कित्येक पटींनी वाढते, ही दृश्य पातळी झाली. निवडणुकीय राजकारणासारख्या उद्योगात गुणवत्तेची किंवा तत्सम नैतिक संसाधनांची गुंतवणूक न करताही संपत्तीची ही आश्चर्यकारक उड्डाणं घडत असतात. गुणवत्तेच्या अभावातून असं सूचित होतं की, मुळात वैयक्तिक मूल्याशी निगडित असलेल्या नैतिकतेबाबत तडजोड केल्याशिवाय वैयक्तिक लाभांचा इतका प्रचंड विस्तार शक्य नसतो.

निवडणुकीच्या वा औपचारिक राजकारणामध्ये ‘स्वप्रेमा’सारख्या भौतिकेतर वैयक्तिक सांस्कृतिक संपत्तीचाही संचय होण्याची मोठी संधी असते. या अर्थी ‘राजकीय स्व’ सुखावणारा हा मार्ग आहे. विशेषतः समकालीन राजकारणामध्ये, किमान काही प्रमुख राजकीय नेते स्वप्रेमाने पछाडल्यासारखे वागताना दिसतात. या पछाडलेपणाचं दृश्य रूप ‘सेल्फी’ काढण्याच्या कृतीतून पाहायला मिळतं. शिवाय, शोकात्म परिस्थितीतही स्वतःच्या प्रतिमेला प्रोत्साहन देणारा मजकूर ट्विटवर टाकणं, हासुद्धा त्याचाच भाग आहे. अशा वेळी स्वप्रेम हाच स्वतःच्या मूल्याशी समानार्थी घटक होऊन जातो. किंबहुना, उमेदवारी वाटप किंवा संस्थात्मक पातळीवर तुलनेने लहान पदांचं वाटप असे क्षणभंगुर लाभ करून देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपली दखल घ्यावी, या एकमेव उद्देशाने स्व-मूल्य ठरू लागतं. स्वतःच्या शर्थीवर औपचारिक राजकारणात सहभागी होण्याची स्वायत्तता अधिकारांच्या भाषेला बळ देते, तर आश्रयदातृत्व पुरवण्याची ताकद स्वायत्ततेच्या अधिकारांना कमकुवत करते.

विशिष्ट लाभ करून देणाऱ्या संस्थांमध्ये सत्ताधारी पदांवर असलेल्यांनीच संबंधित इच्छुकांच्या ‘राजकीय स्व’चं मूल्यमापन करायचं असतं. त्यामुळे एखाद्या नेत्याचं मूल्य त्याच्या आश्रयदातृत्वाच्या ताकदीशी जोडलं जातं, गुणवत्तेपेक्षा एखाद्याचा पक्षपाती लाभ करून देण्याला महत्त्व येते.

वैयक्तिक क्षमतांच्या संदर्भात स्वायत्तता टिकवणं महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य माणसाचं नैतिक मूल्य प्रस्थापित करण्यामध्ये अशी स्वायत्तता महत्त्वाची भूमिका निभावते. सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या, सरकारनियंत्रित बाजारपेठेतील किमान हमी भाव, इत्यादींसारख्या निष्णात संस्थात्मक परिस्थितीत नैतिक मूल्य वरचढ ठरतं. पण सद्यस्थितीत बेरोजगार तरुणाईला व तणावग्रस्त शेतकऱ्यांना स्वतःचं सामाजिक मूल्य सिद्ध करण्याची कोणतीही संधी या संस्थात्मक अवकाशांमध्ये मिळताना दिसत नाही. तरीही, बेरोजगार तरुणाई व तणावग्रस्त शेतकरीसुद्धा स्वतःला कोणत्यातरी अलौकिक मूल्याशी जोडून घेताना दिसतात. राष्ट्रवादाच्या अमूर्त संकल्पनेकडे ते आकर्षित झालेले आहेत. स्वमूल्याच्या या अलौकिक संकल्पनेमुळे जगण्याच्या अस्तित्त्वकेंद्री गरजा बाजूला सारल्या जातात आणि आंशिक सामाजिक सुरक्षिततेलाच महत्त्व प्राप्त होतं. दुसऱ्या बाजूला, स्वहिताच्या रक्षणासाठी विशिष्ट राजकीय नेते राष्ट्रवादासारख्या मूल्याचा अमूर्त अवकाश वापरतात, त्यासंबंधीचे पवित्रे घेतात. या पार्श्वभूमीवर, स्वहिताचा उद्देश झाकून सार्वत्रिक हितसंबंधांसाठी आपण राजकारणात उतरत असल्याचे राजकीय उमेदवारांचे खुलासे विचित्र ठरतात.

Back to Top