ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

आजच्या काळात गांधींचा अर्थ लावताना

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

गांधी हे बहुधा सर्वाधिक तिरस्कार झेलणारे आणि ज्याच्यावर सर्वाधिक लिहिलं गेलं आहे, असे विचारवंत असावेत. काही जण त्यांना लोकनेता मानतात, तर इतर काही जण त्यांना सरळ नाकारतात. त्यांनी मांडलेला विचार आणि भारतातील परकीय सत्तेविरोधात राष्ट्रवादी चळवळ संघटित करताना त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका यांवर काही जण टीका करतात. गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांना तिरस्कारासाठी काही कारण लागत नाही. हिंसक तिरस्काराला काही ज्ञानशास्त्रीय पाया नसतो. तिरस्कार व अवमान या दोन विध्वंसक घटकांचा उगम सुस्पष्ट युक्तिवादांमधून होत नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्या संचित झालेल्या पूर्वग्रहातून हे घटक फोफावतात. गांधीविरोधकांना हा पूर्वग्रह सोयीचा वाटतो. गांधींचं मूळ लेखन वाचून किंवा गांधीवादी अभ्यासक व भाष्यकार यांचं लेखन वाचून विरोधकांनी आपली मतं बनवलेली नसतात. उलट, अविचारी पद्धतीने गांधींचं समर्थन करणाऱ्यांशी संवाद साधण्यात या विरोधकांना आनंद मिळतो.

ज्ञानशास्त्रीय व पद्धतीशास्त्रीय पातळीवर आपल्या विचाराला अधिकृत व प्रमाणित रूप देताच येऊ नये, अशी तजवीज गांधींनी केल्याचं दिसतं. त्यामुळे अभ्यासक व भाष्यकारांची मात्र ज्ञानशास्त्रीय अडचण होते. गांधींच्या विचारांचं पूर्ण व अंतिम वर्णन करणं त्यांना अवघड होतं. गांधींचं लेखन खुल्या स्वरूपाचं आहे,त्यामुळे त्याचा सुघटित व सुस्पष्ट तऱ्हेने मांडणं शक्य होत नाही. या खुलेपणामुळे अभ्यासक गांधींना निरनिराळ्या ‘अवतारां’मध्ये पेश करण्यात ‘गुंतून’ जातात. त्यामुळे गांधी विविध रूपांमध्ये समोर येतात. वसाहतोत्तर राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रीयतावादी, पर्यायी आधुनिकतावादी, आदर्शवादी व व्यवहारवादी, स्त्रीवादी व निम्नसमूहवादी (सबाल्टर्न) आणि अखेरीस सांप्रदायिक व उदारमतवादी, अशा विविध रूपांमधील गांधींची मांडणी झालेली आहे. गांधीविचारामधील खुलेपणामुळेच बहुधा त्यांचे विरोधक नैतिक सभ्यताही दाखवायची तसदी घेत नाहीत आणि राजकीय ढोंगीपणा, बौद्धिक असहायता, निराशा व अगदी भयग्रस्तता यांचं दर्शन होणारे शेरे मारतात. गांधींना सामोरं जाताना त्यांच्याकडे काही उचित युक्तिवाद नसतात आणि युक्तिवादांमध्ये त्यांना काही रसही नसतो. गांधींवर बौद्धिक हल्ला कसा चढवायचा हे न कळल्यामुळे काही जण हताश होतात. गांधीवादी वारसा पुसून टाकण्याची इच्छा असलेले पण हे उद्दिष्ट साध्य करता न येणारे लोक किमान बोलघेवडेपणासाठी तरी गांधींचा वापर करतात. त्यांची राजकीय सत्ता वा ‘दुखरी नस’ अंतःस्थ हेतू व बाह्य अभिव्यक्ती यांच्यातील ताण सतत दाखवत राहाते. गांधींची विचार मांडण्याची पद्धत संवादी स्वरूपाची होती. त्यामुळे रुढीवादी (कन्झर्वेटिव्ह) घटकांनाही ते संवाद साधणं भाग पाडतात. या संवादासाठी गांधी भारतीय ज्ञानशास्त्रीय परंपरांमधील बौद्धिक संसाधनांचा सर्जनशील वापर करत होते. त्यांचा विचार मुख्यत्वे आतून कार्यरत होतो. अभ्यासकांच्या बोधपटावर गांधीविचारांचं एकरूप प्रतिबिंब उमटत नाही. पाश्चात्त्य ज्ञानशास्त्राची बोधात्मक गुलामी भारतीयांनी पत्करू नये, अशी मांडणी गांधींनी केली आहे, याचा रास्त उल्लेख अभ्यासकांनी केलेला आहे. वासाहतिक सत्तारचना आणि समाजावरील ब्राह्मणी नियंत्रणाचा अंतर्भाव असलेली स्थानिक सत्तारचना, यांविरोधात लोकांना संघटित करण्याला गांधींनी प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे या संघटनेला उचित न वाटणाऱ्या बोधात्मक कोटी (कॉग्निटिव्ह कॅटेगरीज्) वापरणं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं. सहिष्णूता, अहिंसा व कायदेभंग या शब्दांचा त्यांनी केलेला वापर परकीय सत्तेविरोधात अतिशय परिणामकारक ठरला. तर, सेवा, सहानुभूती व विश्वस्तवृत्ती यांसारखे शब्द सामान्य जनांना रुचणारे होते; त्यांनी आपल्या स्थानिक शत्रूंविरोधात टोकाच्या भूमिका घेऊ नयेत यासाठी अशा भाषेचा वापर उपयुक्त ठरला. बोधात्मक कोटींचा पाया विवेकशक्तीमधून येतो आणि गांधींनी वापरलेल्या भाषेमधील अंगभूत भावनिक घटक या शक्तीला मवाळ करतो. या संदर्भात ‘हरिजन’ हा शब्द पाहता येईल: सवर्णांचं सामाजिक स्थान कनिष्ठ जातींच्या संदर्भात मवाळ करत नेणं आणि अखेरीस त्यांमध्ये समता आणणं, हा मध्यवर्ती उद्देश असलेला हा शब्द गांधींच्या ‘न-बोधात्मक कोटीकरणा’चा (नॉन-कॉग्निटिव्ह कॅटेगरायझेशन) ठळक दाखला आहे. या पद्धतीशास्त्रीय निवडीमुळे गांधी सर्वांत यशस्वी नेते ठरले आणि ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात समाजातील सर्व घटकांना संघटित करणं त्यांना शक्य झालं. गांधींची भाषा शत्रूला तत्काळ त्रास देणारी नाही, त्यामुळे तिच्या सान्निध्यात सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व शांत वाटणं स्वाभाविक आहे. तर, भारतीय जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी न-बोधात्मक कोटींचा परिणामकारक वापर केल्यामुळे गांधीविचाराच्या सामाजिक पायामध्येही खुलेपणा आला आहे.

गांधीविचार इतका खुला आहे की त्यात आशय व भाषा यांबाबतीत कोणत्याही प्रकारची सेन्सरशिप नाही. विभिन्न अर्थनिर्णयनांसाठी व निरोगी टीकेसाठी त्यांचा विचार सहजी उपलब्ध असतो. संकल्पना व विचार यांच्या अभिव्यक्तीला शिस्त देणारे नियम व शिष्टाचार गांधीविचारांना लागू होत नाही. त्यांच्या विचारांचं वावर मुक्त शोध घेणारं आहे. परंतु, या खुलेपणाचा अर्थ मनमानीपणा असा होत नाही. किंबहुना, मानवतेच्या आधारे नैतिक समुदाय निर्माण करणं, हा गांधींच्या मध्यवर्ती आस्थेचा विषय आहे. त्यामुळे गांधींचे विचार निरुद्देश नाहीत; नैतिक समुदाय व मानवता निर्माण करण्याची जबाबदारी त्यांनी मानलेली आहे. त्यांचे विचार समकालीन प्रस्तुतता राखून आहेत. भारत केवळ उघड्यावरील शौचापासून मुक्त होऊन पुरेसं नाही, तर अधिक मूलगामी स्वरूपात जातिग्रस्त मानसिकतेमध्ये रुजलेल्या अस्पृश्यतेपासून या देशाने मुक्त व्हावं, अशी सामाजिक आशा लोकांमध्ये उत्पन्न करण्याचं सामर्थ्य गांधीविचारात आहे.

Back to Top