ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

तुच्छतेचं राजकारण?

भाजपच्या सदस्यांची २०१९च्या निवडणुकांवरची पकड ढिली पडते आहे आणि त्याच गतीने त्यांची जीभही सैल सुटते आहे.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका आमदाराने बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्षा मायावती यांच्यावर चढवलेला शाब्दिक हल्ला आत्तापर्यंत राजकीय संदर्भात वापरल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या तुच्छतावादी भाषेला मागे टाकणारा होता. या लोकप्रतिनिधीने वापरलेली हीन भाषा कोणत्याही व्यक्तीला- स्त्री, पुरुष वा तृतीयपंथीय- माणूसपणाच्या ज्ञात मर्यादांपलीकडे ढकलणारी होती. संबंधित आमदाराने व तिच्या पक्ष नेत्यांनी या विधानांबाबत खेद व्यक्त केला आणि बसप अध्यक्षांची माफीही मागितली, पण यात प्रामाणिक खेद व्यक्त करण्याची भावना नव्हती तर केवळ औपचारिक दिखाऊपणा होता. कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तिमत्वाला (यात बसप अध्यक्षांचाही समावेश होतो) अशा विधानांमधून झालेली इजा भरून काढण्यासाठी संबंधित हल्लेखोरांनी व्यक्त केलेली सोयीस्कर दिलगिरी पुरेशी नसते. आक्षेपार्ह शब्द सार्वजनिकरित्या वापरल्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. अशी भाषा समाजविरोधी कुजबुजीद्वारे बराच काळ पसरत राहाते. अशा प्रकारच्या कुजबुजीला जातीय व पितृसत्ताक जाणीवेतून खतपाणी घातलं जातं. शिवाय, अशा सोयीस्कर दिलगिरीमुळे व माफीनाम्यांमुळे जातीय व पितृसत्ताक जाणीवमध्ये खोलवर रुजलेली तुच्छता पूर्णतः नष्ट होत नाहीच, केवळ अशा वक्तव्यांबाबत कडक शब्द तेवढे वापरले जातात. इथे काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे: एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरोधात इतकी तुच्छता का? या तुच्छतेचं स्वरूप काय आहे? अशी तुच्छता धारण करणाऱ्या व्यक्तीला यासंबंधी कोणत्या नैतिक परिणामांना सामोरं जावं लागतं?

अशा शाब्दिक हल्ल्यांमधील तुच्छताभाव हा मुळात बसप व समाजवादी पक्ष यांच्यातील आघाडीमुळे उभ्या राहिलेल्या राजकीय आव्हानातून निपजलेला आहे. ही आघाडी अभेद्य असल्याचं भाजपच्या सदस्यांना वाटू लागलं असावं. असं आव्हान आहे, हे मान्य असल्यामुळेच आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. एकट्या बसप अध्यक्षांवर अशा रीतीने हल्ला चढवला जातो, याचा अर्थ विरोधी आघाडीबद्दल भाजपच्या मनात भीती निर्माण झालेली आहे, हे सिद्ध होतं. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांपैकी बसप अध्यक्षांवरच अशा प्रकारच्या आक्षेपार्ह भाषावापराद्वारे हल्ले झालेले आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या या ‘विशेष वागणुकी’ला दोन घटक कारणीभूत आहेत. एक, सत्ताधारी पक्षाने लक्ष्य केलेलं असूनही त्याला बळी न पडता ही आघाडी उभारण्याची ठाम भूमिका घेतलेल्या व्यक्तीवर असा शाब्दिक हल्ला चढवायचा निर्णय भाजप आमदाराने घेतला. दोन, कनिष्ठ जातीमधील व्यक्तीने- त्यातली एका स्त्रीने आपल्यासमोर आव्हान उभं करणं, भाजपच्या या आमदाराला सहन झालं नाही. अशा स्त्रीबद्दल वाटणारी भीती या शाब्दिक हल्ल्याच्या मुळाशी होती.

स्त्रियांचं नैतिक खच्चीकरण करण्यासाठी अशा आक्षेपार्ह भाषेचं वापर करणं, हा पितृसत्ताक व्यवस्थेचा विशेषाधिकार आहे. पण एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीविरोधात अशा प्रकारची भाषा वापरत असेल, तर केवळ पितृसत्ताच नव्हे, तर अधिक मूलभूत असा जातीचा घटक या उपरोधिक तुच्छतेचा स्त्रोत असतो, हे लक्षात घ्यायला हवं. पुरुषीपणाचा हा विशिष्ट व्युत्क्रम लिंगभावाशी संबंधित नाही, तर जातीशी संबंधित आहे. तुच्छतावादी अभिव्यक्तीच्या राजकारणावर जात या घटकाचं प्रभुत्व राहिलेलं दिसतं.

संबंधित महिला आमदाराचं हे भडक विधान आपल्याला एका व्यापक प्रश्नाबद्दलही विचार करायला भाग पाडतं. पितृसत्ताक भाषेचं होकारात्मक पुनरुत्पादन एक स्त्रीच करते, तेव्हा तिला स्वतःच्या सत्यामध्ये रस नसल्याचं सूचित होतं. मुळात ती स्वतः अशा पुरुषी भाषेला बळी पडलेली असते. अशा भाषेला सार्वजनिक पातळीवरून पाठिंबा मिळाला की तिची संदिग्धावस्था टिकून राहते आणि पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये आपण अंकित आहोत हे सत्य तिच्यापासून दूर राहातं. पक्षीय राजकारणाला बळी पडून अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला हे लक्षातही येत नाही की, पुरुष, स्त्रिया व तृतीयपंथीयांना वैध समान प्रतिष्ठाही नाकारण्याचं काम तिच्या या भाषिक उत्पादनामुळे होतं.

सध्याच्या घडीला राजकीय आघाड्यांसंबंधीची टीका उत्तर प्रदेशाच्या पातळीसोबतच राष्ट्रीय पातळीच्या संदर्भातही करणं इष्ट राहील. विविध सामाजिक गट आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्या राजकीय अस्तित्वाबाबत परस्पर आदर राखणाऱ्या लोकशाही प्रेरणेच्या वाजवी मर्यादेमध्ये ही टीका होणं गरजेचं आहे. परस्परांविषयीच्या आदराची किमान आदर्शलक्ष्यी ऊर्जा टिकवणाऱ्या नैतिक क्षमतेचे युक्तिवाद करत ही टीका व्हायला हवी. आक्षेपार्ह राजकीय उक्तीची लागण होणाऱ्या अवकाशात मोकळीक निर्माण करण्याचं काम युक्तिवादी टीका करते. त्यातील काही युक्तिवाद प्रस्थापित प्रमाणकांनुसार दुर्बल वा खराब असले तरीही हे घडतं. लोकशाहीमध्ये युक्तिवादाला अधिक अवकाश मिळतो आणि वैध युक्तिवादाचा पाया डळवळवणाऱ्या पूर्वग्रहांवर मात करण्याची शक्यताही या अवकाशामध्ये असते. दुर्बल अथवा अपुरे युक्तिवाद सहन करता येतात, कारण त्यातून लोकशाहीची वीण तत्काळ उसवण्याचा धोका नसतो. सभ्यता, परस्परांविषयीचा आदर व प्रतिष्ठा या मूल्यांनी ही वीण घट्ट झालेली असते- लोकशाहीवादी राजकारणाचे हे अत्यावश्यक घटक आहेत. कोणत्याही युक्तिवादाशिवाय सातत्याने केवळ सरकारी सत्ता काबीज करण्याची राजकीय आकांक्षा बाळगणं हीन भाषेच्या अतिरिक्त वापराला कारणीभूत ठरतं. एका कणखर लोकशाहीला प्रतिष्ठितरित्या टिकवून ठेवण्यासाठी राजकारणाची युक्तिवादी संस्कृती आपण निर्माण करायला नको का?

Updated On : 29th Jan, 2019

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top