ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

कचरा गोळा करण्याचा अधिकार

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

स्वच्छ भारत अभियानामुळे आपलं दोन महत्त्वाच्या घडामोडींकडे दुर्लक्ष होऊ नये. एक, उच्चपदस्थ राजकीय व्यक्तिमत्वांनी प्रतीकात्मकरित्या कचरा जमवल्यामुळे कचरावेचकांकडे लक्ष वेधलं गेलं आहे. दुसऱ्या बाजूला, सफाई कामगारांनी वा कचरा गोळा करणाऱ्यांनी आपली कृती एखादा अधिकार असल्याप्रमाणे त्यावर दावा केला आहे, ही घडामोड अधिक महत्त्वाची ठरावी. सार्वजनिक व्यक्तिमत्वांसाठी कचरा गोळा करण्याची कृती दैनंदिन सामाजिक व भौतिक अस्तित्वाचा भाग नाही, तर कचरावेचक रोजच्या जगण्यामध्ये कचरा संकलनाच्या कृतीशी जखडलेले असतात. दोन, कचरावेचकांनी त्यांचा ‘पेशा’ स्वतःहून निवडलेला नसतो; किंबहुना, आपल्याला हे काम करणं भाग पाडलं जातं आहे, अशी त्यांची भावना असते. कचरासंकलनाची कृती सक्तीने केली जात असेल, तर ती अधिकार कसा ठरू शकते? त्यामुळे अशा अधिकाराचं स्वरूप शोधणं आवश्यक बनतं. उदाहरणार्थ, कचरा-संकलन हा सकारात्मक अधिकार आहे की नकारात्मक अधिकार आहे, असा प्रश्न विचारता येईल.

व्यक्तिगत अधिकार सकारात्मक मानले जातात. काही अंशी सामाजिक मूल्यवर्धनासाठी हे अधिकार साधन म्हणून वापरता येतात. या अधिकारांना घटनात्मक मान्यता असते व संस्थात्मक संरक्षण दिलं जातं. सकारात्मक हुकुमाप्रमाणे हे अधिकार व्यक्तीला आपल्या कामाच्या निवडीचं स्वातंत्र्य देतात. विशेषतः कामाच्या संदर्भातील अधिकाराचं स्वरूप त्यातील मानवी शारीरिक श्रमावर अवलंबून असतं. हे काम सभ्यतेला धरून असेल, स्वच्छ असेल आणि सुदृढ कार्यपरिस्थितीमध्ये पार पाडलं जात असेल, तर श्रम करणाऱ्या व्यक्तीलाही समान मानवी मूल्य मिळायला त्याची मदत होते, असं विवाद्यरित्या म्हणता येईल. सभ्य व स्वच्छ काम स्पर्धात्मकदृष्ट्याही आकर्षक असणं गरजेचं ठरावं. अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण काम उपलब्ध असेल, तर अनेक गरजू व्यक्ती त्यासाठी स्पर्धा करताना दिसतात. स्पर्धेद्वारे चांगलं काम मिळण्याने वैयक्तिक योग्यता व सामाजिक मूल्य यांमध्ये भर पडते. त्यामुळे सभ्य कामांसाठीच्या स्पर्धेद्वारे सामाजिक मूल्याची उतरंड तयार होते. औपचारिक रोजगार बाजारपेठेमध्ये त्या-त्या कामांना या उतरंडीत विशिष्ट स्थान दिलं जातं. या उतरंडीनुसार कामाचं जे काही मूल्यमापन केलं जातं, त्यावर प्रतिष्ठा हे सामाजिक मूल्य अवलंबून असतं. सध्या कॉर्पोरेट वा सरकारी क्षत्रांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांना तुलनेने जास्त सामाजिक प्रतिष्ठा असल्याचं दिसतं. तर, अशा परिस्थितीमुळे कामाच्या अधिकाराची सकारात्मक व्याख्या करणं शक्य होतं. कचरावेचक व्यक्ती कचरा-संकलनाच्या त्यांच्या अधिकाराकडे या परिस्थितीच्या संदर्भात पाहतात का? याचं उत्तर होकारार्थी मिळणं अवघड आहे. याची तीन कारणं आहेत.

एक, सर्वसाधारणपणे, कचरावेचक स्वतः आणि एकंदर समाज, कचरा वेचण्याला सामाजिक कलंकाशी जोडतो आणि हे काम व्यक्तिगत पातळीवर नैतिक सक्तीचंही ठरतं. नागरी समाजाचा कचरा हे कामगार उचलतात, पण याच समाजाचे सदस्य कचरावेचकांकडे तिरस्काराने व साशंकतेने पाहतात. तर, तिरस्करणीय अर्थाशी जोडलेलं हे काम नैतिकदृष्ट्या सक्तीचं ठरतं, हे अधिक गंभीर आहे. या कामाचं स्वरूप असं आहे की, कचऱ्याच्या डब्यात उतरताना संबंधित व्यक्तीला मानवपणाची पातळी गमावल्यासारखं वाटतं. कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला या कामातून कोणतंही मानवी मूल्य प्राप्त होत नाही, किंवा त्यातून काही ‘प्रतिष्ठा’ही लाभत नाही. किंबहुना, कचरा-संकलनाच्या कामाला सामाजिक मूल्यही नाही. दोन, कचरासंकलनाच्या अधिकारातून ‘आकलनात्मक अडथळा’ निर्माण होण्याचीही शक्यता असते. जगण्याच्या इतर अवकाशांमधील विषमतांची दखल घेण्याची नैतिक क्षमताच अशी व्यक्ती गमावून बसते. कचरा-संकलनाच्या कृतीला अधिकार मानणारे लोक जीवनाच्या इतर महत्त्वाच्या अवकाशांमधील विषमतांना स्वीकारार्ह बनवतात आणि अमानवी निवारा व जीवनस्थितीला वाजवी मानू लागतात. कचरा-वेचक विभक्त ठिकाणी, बहुतेकदा झोपडपट्ट्यांमध्ये राहातात, आणि ही विभक्तपणाची जाणीव घेऊन कामाच्या ठिकाणी जातात. ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या कामामध्ये त्यांची ही वेगळेपणाची जाणीव मिसळून जाते.

कचरा-संकलनाच्या अधिकाराद्वारे या विभक्तपणाच्या सखोल स्वरूपाचा शोध लागत नाही. वास्तविक यातून कचरावेचकांमधील सामाजिक कलंकाची भावना अधिक तीव्र होते. तीन, कचरा-संकलनाला अधिकार मानल्यामुळे अधिक सभ्य पर्याय शोधण्याची गरजही संपुष्टात येते. परंतु, आजकाल स्वच्छ रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना कचऱ्यांच्या डब्यांमध्ये उतरावं लागतं, हेही वास्तव आहे. किंबहुना, कचरा वेचण्याचं कामही बलशाली घटक आपल्याकडून हिरावून घेतील या भीतीमधून कचरा-संकलनाच्या अधिकारावर दावा सांगितला जातो. तर, कोणत्याही अपरिहार्यतेमुळे कचरावेचकांना स्वतःच्या कामावर अधिकार सांगावा लागत असला, तरी त्याऐवजी त्यांनी एखाद्या सकारात्मक अधिकाराचं वाहक बनण्याची गरज आहे, अशा अधिकारामुळे त्यांना स्वच्छ, स्पर्धात्मक व आकर्षक काम मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Back to Top