ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

राजकारणाविषयीच्या विचारपद्धतीमधील समस्या

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या केंद्रात सत्तास्थानी सुखाने विराजमान झालेलं आहे. या सरकारने देशाच्या राजकीय व सार्वजनिक जीवनातील काही संवेदनशील अवकाशांसंबंधीचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. निग्रही व करारी विरोधकांचा अभाव असल्यामुळे असे निर्णय घेणं केंद्र सरकारला सोपं झाल्याचं दिसतं. प्रसारमाध्यमं निवडणुकीनंतरच्या घडामोडींचं विश्लेषण उथळपणे व निवडकपणे करतात. माध्यमांद्वारे केलं जाणारं भाष्य तात्कालिक असतं, परिवर्तनकारी नसतं; त्यात लौकिक बाबींपलीकडे जाण्याची प्रवृत्ती नसते. परंतु, समकालीन भारतातील राजकारणाविषयीच्या विचारपद्धतीमधील समस्या आणखी खोलवर रुजलेल्या आहेत.

निवडणुकीनंतर चिंतनशील विचार मांडण्याऐवजी धूर्त विचार मांडले जातात, हा सर्वांत चिंताजनक भाग आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष व विरोधक या दोघांच्याही राजकारणात धूर्त विचारांचा घटक सामायिक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये निर्णय घेताना सत्ताधारी पक्षाने बराच धूर्तपणा दाखवला, यात काही शंका नाही. अशा धूर्त विचारपद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य आधी निवडणूक प्रक्रियेतील कच्ची सामग्री म्हणून ‘सर्वसामान्य माणसां’चं शोषण करतात, आणि नंतर राजकीय व सामाजिक भ्रमांच्या मालिकेमध्ये याच सर्वसामान्यांना गुंगवून ठेवतात. स्वतःची सत्ता टिकवू पाहाणारे लोक सर्वसाधारणतः राजकारणाविषयीच्या चिंतनशील विचारपद्धतीऐवजी धूर्त विचारांचा मार्ग जवळ करतात.

परंतु, विरोधकांची राजकीय कल्पनादृष्टीही धूर्त विचारांपासून अंतर राखणारी नाही. पक्षाध्यक्ष कोण होणार, या एकाच मुद्द्यावर काँग्रेसने स्वतःची सर्व विचारक्षमता पणाला लावली आहे, त्यामुळे त्यांच्या विचारपद्धतीलाही धूर्तपणाशी जोडावं लागेल. सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात आपली काही ठोस भूमिका आहे का, याचा विचार काँग्रेसने करावा, अशी अपेक्षा काही जण व्यक्त करतील. तर, पक्षांतर्गत बाबींवर इतका वेळ वाया घालवणाऱ्या काँग्रेसचा ‘विलंबित खयाल’ काहींना चिंताजनक वाटण्याची शक्यता आहे. विलंबित खयालाचंही काहीएक महत्त्व असतं, कारण तो केवळ व्यवहार्यताकेंद्री विचारांवर आधारलेला नसतो, तर विशिष्ट सैद्धान्तिक कृतींशी जोडलेला असतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षापेक्षा वेगळं वागत एखाद्या विरोधी पक्षाने स्वतःच्या अंतर्गत प्रश्नांवर विचारविमर्श करण्यासाठी वेळ घेतला तर ते इष्टच ठरेल. लोकशाहीसाठीसुद्धा ते हिताचंच आहे, पण शब्दशः आणि व्यवहारामध्ये खूप जास्त विलंब लागला तर राजकीय विस्कळीतपणा येण्याची शक्यता असते. शिवाय, लोकशाहीची गरज असलेले घटक व्हॉट्स-अॅपवरील प्रचारतंत्राला बळी पडण्याची शक्यताही यातून वाढते. स्वतःच्या पक्षाची सत्ता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने सत्ताधारी राजकीय नेते अशा प्रचारतंत्राचा अवलंब करत असतात. इथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित करायला हवा: आपल्याला राजकीय पक्ष व नेते का गरजेचे असतात?

कितीही काहीही म्हटलं, तरी प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये राजकीय पुढाकार घेण्याचं काम सर्व जण करत नाहीत, तर काहीच लोक करतात. कार्यकारी संदर्भात वा तात्कालिक अर्थाने बोलायचं तर, प्रत्येक जण शासन चालवू शकत नाही; परंतु लोकशाहीमध्ये राजकीय सत्ता वारसाहक्कात मिळत नाही, तर एखादा पक्ष वा नेत्यांचा गट ज्या काही सहृदय राजकीय कृती करतो त्यातून सत्ता मिळत असते, याची आठवण सत्ताधाऱ्यांना करून देण्याची जबाबदारी प्रत्येकावर असते. वास्तवात मात्र ‘सर्वसामान्य लोकां’वर शासन चालवण्याचा आपला दावा मक्तेदारीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करू पाहतात. राजकीय सत्तेवरील नियंत्रण दीर्घ काळ टिकवण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे हे घडतं. पण मुळात अशा महत्त्वाकांक्षेला आजूबाजूची परिस्थितीच जन्म देत असते. सत्ताधारी पक्षाच्या कामाबाबत कोणतीही चिकित्सक प्रतिक्रिया न देता केवळ आज्ञापालन करण्याचा मार्ग सर्वसामान्य लोक पत्करतात, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. तर, चिकित्सक प्रतिक्रिया देण्याची क्षमता लोकांकडे आहे का, हा प्रश्न विचारावा लागतो.

सखोल व सुज्ञ विचार करण्याची क्षमता वापरण्यासाठी शांतपणे आकलन करून घ्यावं लागतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, राजकारणाविषयीची चिंतनशील विचारपद्धती वेग (ब्रेकिंग न्यूज) आणि सनसनाटीपणा यांच्या पातळीवर घसरते. अशा घाईगडबडीतल्या विचारपद्धतीमुळे ‘सर्वसामान्य माणसां’ना सखोल व चिकित्सक प्रतिक्रिया देण्याचा अवकाशच मिळत नाही. विविध समाजमाध्यमांच्या वेगाला बळी पडण्याची इच्छा ‘सर्वसामान्यां’मध्ये निर्माण झाली की, त्यांच्यावरचं राजकीय नियंत्रण बळकट करण्याची संधी नेत्यांना मिळते. अभिनव कामगिरी करून किंवा गुणांच्या नैतिक ताकदीद्वारे नियंत्रण टिकवण्याऐवजी स्वतःची निःसंदिग्ध विचारसरणी लादून हे नियंत्रण दृढ केलं जातं. व्हॉट्स-अॅपसारखी माध्यमं व्यक्तीला माहितीच्या आणि बहुधा ज्ञानाच्याही महासागरापर्यंत नेऊ शकतात, हे खरं आहे. परंतु, वापरकर्त्या व्यक्तीला या महासागरामध्ये खोलवर नेण्याचं कामही हेच माध्यम करेल असं नाही. आपल्याला व्यापून असणाऱ्या व्यामिश्र समस्यांवरची उत्तरं सोपी नसतात, त्यामुळे खोली गाठण्यासाठी व्यक्तीलाच नैतिक बोच असावी लागते. तर, ही माध्यमं सक्षमीकरणही करू शकतात, पण त्यातून मर्यादा येण्याचीही शक्यता असते. (निवडणूक काळात दिसतं तसं) लाटांप्रमाणे कार्यरत असणारी ही माध्यमं बनावट व अस्सल माहितीचा ओघ समोर घेऊन येतात. त्यामुळे चिंतनशील विचारपद्धतीद्वारे विविध प्रश्नांचा सखोल शोध घेण्याची वृत्तीच कोमेजून जाण्याची शक्यता असते. ‘व्हॉट्स-अॅपच्या लाटा’ किमान तात्कालिक पातळीवर राजकारणाची दिशा ठरवू लागल्या आहेत. परंतु, विचार करण्याची क्षमता शाबूत असलेले लोक आहेत, तोपर्यंत अशा लाटा ज्ञानसागरावर वर्चस्व गाजवू शकणार नाही.

Tags: 

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top