ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

इम्रान खान आणि त्यांचा नया पाकिस्तान

सैन्य आणि प्रस्थापित व्यवस्था कितपत स्वायत्ततेची मुभा देते यावर बरंच काही अवलंबून राहील.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान आणि इतर देशांमध्ये निवडून आलेले रेसेप तय्यीप एर्दोगान व रॉड्रिगो ड्यूटेर्टे यांसारख्या उजव्या लोकानुनयी नेत्यांमध्ये अतिसुलभ व साचेबद्ध तुलना करण्यात आलेल्या आहेत. निवडून आलेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना साधारणतः काही समान ताण आहेत आणि त्यांच्यातील काही वैशिष्ट्ये सारखी आहेत. पण विशिष्ट संदर्भ, परिस्थिती व इतिहास यांचा विचार केला तर अशा नेत्यांमधील तुलना लंगडी व निरर्थक ठरते. खान म्हणजे मोदी वा ट्रम्प यांच्यासरखेच आहेत असे दावे अनेकांनी केले असले तरी ते चुकीचे आहेत. प्रत्येक राजकीय नेत्याच्या असंख्य वैशिष्ट्यांकडे या प्रक्रियेत दुर्लक्ष होतं. शिवाय, सैन्यासारख्या बलशाली संस्थांना ते बांधील आहेत, त्यामुळं ते काय आणि कसं बनतील यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

सुरुवातीलाच हे नमूद करायला हवं की, पाकिस्तानमधील अकराव्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त वा न्याय्य नव्हत्या. निवडणुकीच्या अनेक महिने आधीपासून निकालावर पूर्वप्रभाव टाकण्याचे प्रयत्न झाल्याचं सखोल कागदपत्रांवरून, पुराव्यांवरून आणि घडलेल्या प्रसंगांवरून व आरोपांवरून स्पष्ट होतं. शिवाय, निवडणुकीच्या दिवशी- २५ जुलै रोजी निकाल ज्या पद्धतीनं जाहीर झाले त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. या निवडणुकीत स्पर्धा मोठी होती, डझनभर मतदारसंघांमध्ये विजेता व पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक अतिशय कमी होता, आणि या फरकापेक्षा कितीतरी जास्त मतं निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारली. यातील अनेक मतदारसंघांमध्ये पुनर्मोजणीची विनंतीही फेटाळून लावण्यात आली.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आलं आणि नंतर तुरुंगात धाडण्यात आलं, सैन्याकडून माध्यमांचं नियंत्रण करण्यात आलं, आणि न्यायव्यवस्थेनंही उघड पक्षपाती भूमिका घेतली. मतदानावर पूर्वप्रभाव टाकण्यासाठीचे हे मार्ग बरेचसे प्रकाशात आलेले आहेत. पण त्याशिवायही काही मार्गांचा अवलंब या निवडणुकीत करण्यात आला. शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ’ (पीएमएल-एन) या पक्षाच्या समर्थकांची मतं क्षीण करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेनं नवीन राजकीय पक्ष निर्माण केले. सैन्याचा पाठिंबा असलेल्या ‘तेहरीक-ए-लब्बाइक पाकिस्तान’ या इस्लामी पक्षाचं उदाहरण या संदर्भात पाहता येईल. ‘पीएमएल-एन’च्या वाट्याची काही मतं खाऊन या पक्षानं किमान १३ जागांवर ‘पीएमएल-एन’चा संभाव्य विजय हाणून पाडला. शिवाय, ‘पीएमएल-एन’च्या काही माजी सभागृह-सदस्यांनी खान यांच्यासोबत यावं किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुका लढवाव्यात यासाठी त्यांचं मन वळवण्यात आलं. या उमेदवारांना आता तुच्छतेनं ‘मताकर्षी’ असं संबोधन मिळालं आहे

या निवडणुका न्याय्य व मुक्त वातावरणात पार पडल्या नाहीत, आणि कोणत्याही परिस्थितीत शरीफ यांचा पक्ष पुन्हा निवडून येऊ नये या एकमेव उद्देशानं हा खेळ झाला, हा मुद्दा मान्य केला तर निकालांविषयी समाजशास्त्रज्ञांनी केलेलं विश्लेषण किती अपुरं आणि बहुधा चुकीचं आहे तेही स्पष्ट होतं. पीएमएल-एन विजयी होईल आणि पंजाबमध्ये व केंद्रात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उभा राहील, असे संकेत मतदानपूर्व सर्वेक्षणांमधून मिळत होते. अर्थात, निवडणुका न्याय्यरित्या पार पडतील, या गृहितकावरून हे संकेत मिळाले होते. तसं झालं असतं, तर निकालांचं विश्लेषण अतिशय वेगळं राहिलं असतं. आता निवडणुकांचा निकाल खान यांना पूरक लावण्यात आल्यानंतर या निवडणुका ‘भ्रष्टाचाराविषयीच्या’ होत्या असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. खान यांचा विजय म्हणजे पाकिस्तानातील नव्या मध्यमवर्गांचा विजय आहे, असंही बोललं जातं आहे. पण यातील तथ्यांश शोधणं अवघड आहे. समाजविज्ञानांमधील निकष वापरून या निकालांचं स्पष्टीकरण करू पाहाणाऱ्यांनी आपल्या दाव्यांविषयी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्यापेक्षा अतिशय भिन्न प्रतिपादन करण्यासाठी आवश्यक असा बराच पुरावा व अनेक प्रतिदावे उपलब्ध आहेत.

तर निवडणुकांविषयीचं तथ्य काहीही असलं तरी, आता पुढच्या आठवड्यात इम्रान खान हे पाकिस्तानचे एकोणिसावे पंतप्रधान होतील, आणि पाकिस्तानला, त्याच्या शेजाऱ्यांना व उर्वरित जगालाही हे वास्तव स्वीकारावं लागेल. कोणत्याही पातळीवरील शासनाचा कोणताही अनुभव नसलेल्या खान यांच्या मंत्रिमंडळात अनेक अननुभवी आणि पहिल्यांदाच मंत्री बनणारी मंडळी आहेत, त्यामुळं राजकारणात व सार्वजनिक प्रतिनिधित्वामध्ये ताजा व स्वच्छ दृष्टिकोन येईल, अशी अपेक्षा खान यांच्या अनेक समर्थकांनी व्यक्त केली आहे. खान यांच्या ‘नया’ पाकिस्तानचा मार्ग यातून आखला जाईल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. पण खान यांना संसदेत अतिशय बलशाली विरोधकांना सामोरं जावं लागणार आहे. यापूर्वी १९८८ साली पाकिस्तानातील राजकारणाचा नवा चेहरा म्हणून पुढं आलेल्या बेनझीर भुट्टो यांनाच तेवढं इतक्या बलशाली विरोधी पक्षाला सामोरं जावं लागलं होतं. या वेळी सरकार स्थापन करणाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाच्या बाकांवर बसणारी मंडळी पाकिस्तानी राजकारणात अधिक अनुभव घेतलेली आहेत. पंजाबमध्येही खान यांच्या उमेदवाराल विशेष वैरभावानं विरोधाला सामोरं जावं लागेल.

एकाधिकारशाही, मताभिनिवेशी, अहंकारी आणि अधीर मनोवृत्तीचे मानले जाणारे इम्रान खान स्वतःच्या अशा वैयक्तिक अवगुणांवर कशी मात करतील हेही त्यांच्या व त्यांच्या सरकारच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. विजयानंतर त्यांनी पाकिस्तान व उर्वरित जगाला संबोधून केलेल्या भाषणात यांपैकी कोणतंही वैशिष्ट्यं दिसलं नव्हतं, किंबहुना त्यांच्या भाषणात इतर कोणत्याही भावनेपेक्षा अविश्वासाचा सूरच अधिक दिसत होता. अतिशय सौम्य शब्दांत या भावी पंतप्रधानांनी सामाजिक न्याय, समावेशकता, दयाशीलता, मैत्री, स्वच्छ व निग्रही सरकार यांविषयी संवाद साधला. पाकिस्तानच्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. त्याचसोबत वैयक्तिक पातळीवर इस्लामी तत्त्वांवरची आपली श्रद्धा नव्यानं दृढमूल झाल्याचं त्यांनी सांगितलं; आठव्या शतकात मेदिना राज्याची प्रेषित मोहम्मद यांनी केलेली स्थापना आपल्यासाठी ‘प्रेरणादायक’ असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

खान यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनामध्ये अनेक अंतर्विरोध आहेत. त्यांचा हेतू व निर्धार कदाचित सच्चा आणि सद्भावी असेलही, पण त्यांची तडजोडी आधीच सुरू झाल्या आहेत. पूर्वी त्यांनी धिक्कारलेले अनेक राजकारणी आता बहुमत गाठण्यासाठी त्यांना स्वतःच्या बाजूला ओढावे लागले आहेत. शिवाय, पाकिस्तानच्या राजकीय अर्थव्यवस्थेतून काही मोठी आव्हानं उभी राहातील. शेजाऱ्यांसोबतचा पाकिस्तानचा संवाद कसा असेल यावर तिथल्या उद्दाम सैन्याचं नियंत्रण असतं, त्यामुळं आता खान यांना निवडून आणल्याबद्दल काही एक लाभ सैन्य मागेलच. पाकिस्तानचं आर्थिक परावलंबित्व प्रचंड आहे, त्यात भर म्हणून अनुभवी विरोधकांमधील वैरभाव तीव्र आहे, अशा वेळी इम्रान खान यांच्या कल्पनेतील नया पाकिस्तानमध्ये जुना पाकिस्तानच बराचसा मौजूद असणार आहे.

Updated On : 16th Aug, 2018
Back to Top