ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

संपादकाच्या लेखणीतून

.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

गंभीर नियतकालिक म्हणून स्वतःची ख्याती अजूनही पूर्णतः टिकवून असलेल्या ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटीकल वीकली’शी संपादक या नात्यानं जोडलं जाणं हा माझा खरोखरच बहुमान आहे. ‘इपीडब्ल्यू’ची ख्याती टिकवण्यामध्ये इथं काम करणाऱ्या सर्वांच्या समंजस बांधिलकीचा, निष्ठेचा आणि दक्षतेचा मोलाचा वाटा आहे, आणि त्याचसोबत या नियतकालिकाचं अनन्य स्थान टिकवण्यासाठी प्रेमाचं पाठबळ पुरवणाऱ्या व्यापक इपीडब्ल्यू समुदायाचाही वाटा महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर, इपीडब्ल्यूशी संपादक म्हणून औपचारिकरित्या जोडलं जाण्यातून मोठी जबाबदारीही माझ्यावर पडली आहे. या नियतकालिकाच्या पानांमधून वैविध्यपूर्ण आणि मतभिन्नता राखणाऱ्या विचारांना केवळ जागा देऊन भागणार नाही, तर अशा विचारांना चालनाही द्यावी लागेल. बहुविध राजकीय आविष्कार आणि आर्थिक बदल यांमधील व्यामिश्र संबंध स्थानिक व जागतिक संदर्भांमध्ये समजून घेण्यासाठी चिकित्सक दृष्टी राखणारे हे विचार असावे लागतील. चिकित्सक विचाराची विविध ठिकाणं आणि लोकांचा परिवर्तनवादी व्यवहार यांमधून वाहणाऱ्या विचारांना संघटित करणं व त्यांचं परिशीलन करणं ही इपीडब्ल्यूची खास परंपरा राहिली आहे.

या नियतकालिकाकडे एक खुलं विद्यापीठ म्हणून पाहाणं, ही तशी वाजवी अतिशयोक्ती ठरेल. स्वाभाविकपणे इपीडब्ल्यू स्वतःचा विशिष्ट दृष्टिकोन लादत नाही, तर प्रत्येक सजीवाला समान मानवी मूल्य देण्याची सामायिक गरज स्वीकारणाऱ्या विविध दृष्टिकोनांचा आदर करतं. त्यामुळं इपीडब्ल्यूमधील विचारांचा अवकाश मुळातून वादविवादी असतो आणि मांडणीच्या बाबतीत चिकित्सक असतो. महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या वादचर्चा या अवकाशात घडतात.

विशेषतः सध्याच्या टप्प्यावर, अर्थव्यवहार व राजकारण या दोन्हींचं स्वरूप बदलत असल्याच्या संदर्भात इपीडब्ल्यूची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. राजकारणाचा समकालीन अवकाश इतका पोकळ झाला आहे की वर्चस्वाचा दावा करणारा राजकीय आविष्कार बनावट असल्याचं दिसतं. विरोधी राजकीय आविष्कार विखंडित झाला आहे. प्रभुत्वशाली राजकीय आविष्कारात फसवी सफाई आल्याचं दिसतं, त्यामुळं भ्रमनिर्मितीकरिता सातत्यानं पोकळ आश्वासन देण्याची प्रमुख नेत्याची क्षमता निकडीची ठरू लागली आहे. प्रभुत्वशाली राजकीय शक्तींसाठी यातून दोन गोष्टी साध्य होतात: औपचारिक राजकीय सत्ता त्यांच्या ताब्यात राहाते आणि स्वतःचं सामाजिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना या सत्तेचा वापर करता येतो.

सत्ताधारी राजकीय आविष्काराविरोधात लढणाऱ्यांचे प्रतिआविष्कार अंतर्गत पातळीवर विखंडित आहेतच, पण बाह्य पातळीवरही त्यांना ट्विटर, ब्लॉग, व्हॉट्स-अॅप इत्यादींमध्येच संकोचून पडण्याचा धोका सतावतो आहे. समकालीन विचाराच्या संकोचामध्ये राजकीय सोय पाहून स्वतःचं किंवा स्वतःच्या परिवर्तनवादी प्रेरणेचं तत्काळ समाधान करण्याची वृत्तीही अंतर्भूत आहे. दुसऱ्या बाजूला, विशेषतः प्रतिगामी वृत्तीच्या बाबतीत चिथावणी देणाऱ्या पर्यायी संवेदना सहजी उपलब्ध झाली आहे. परंतु, (ब्लॉग वा ट्विटरवर) उजव्या राजकारणाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा संकोचित विचारामध्ये द्वेष व बनावट आशयाची चलती असते.

‘दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगी’सारख्या या विचारपद्धतीमुळं परिवर्तनशील विचारांची जागा शीघ्र विचार घेऊ लागले आहेत. गंभीर विचारांमधून आडवाट शोधण्याची ही प्रवृत्ती समस्येचा स्त्रोत नसून लक्षण आहे. स्वायत्त विचार करण्याच्या लोकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येत आहेत, ही खरी समस्या आहे. राजकीय जागरूकतेपेक्षा राजकीय सोय पाहाण्याच्या वृत्तीमुळं ‘पुरोगामी स्व’मध्ये ‘योग्य बाजू’ला असण्याची आकांक्षा आणि बहुधा सामाजिक अनिवार्यताही निर्माण झाली आहे. राजकीय अचूकता साधत राहाण्याच्या या गरजेमुळं ‘पोकळ शब्दांच्या खेळा’त किंवा प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या भाषिक क्रीडेत सहभागी होण्याची गरजही भासू लागलेली दिसते.

या पार्श्वभूमीवर, परिवर्तनकारी विचारांमधील समस्येला भाषिक क्रीडेतील रुढींची वाढीव जोड मिळते. सध्याच्या काळात प्रभुत्वशाली राजकीय आविष्काराचं प्रतिनिधित्व करणारे आणि प्रतिआविष्कार करणारे या दोघांनाही एकमेकांमधील संवाद केवळ रुढीपुरता करण्याची सवय लागली आहे. उदाहरणार्थ, आपलं अपयश झाकण्यासाठी सरकार ‘राष्ट्रविरोधी’ किंवा ‘ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी’ यांसारखे साठवणीतले शब्दप्रयोग करतं. पण राजकीय प्रतिआविष्कार करणारेही राज्यसंस्थेच्या शब्दांना नाकारण्यासाठी पुन्हा असले साचेबद्ध शब्दप्रयोगच करतात. अशा शब्दांना उलटवणं एवढाच जहाल परिवर्तनकाऱ्यांचा नेहमीचा प्रतिसाद ठरलेला असतो.

इपीडब्ल्यू हे खुल्या पुस्तकासारखं आहे. विविध संकटग्रस्त गटांसाठी आपण सारख्याच उद्देशानं बोलतो आहोत, असा राजकीयदृष्ट्या सोयीस्कर दावा करणाऱ्या जहाल परिवर्तनवादी गटांचा कंपू नव्हे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर- बुद्धिजीवी अभिजनांचा कंपू किंवा अभ्यासक, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचे गट यांसारख्या समरूप समुदायांची खटपट (स्वतःलाच) उत्कृष्ट भासणाऱ्या भाषेत एकमेकांसाठी काहीतरी लिहिण्याची असते, एकमेकांशी सहमती असलेल्यांचं प्रतिनिधित्व ही मंडळी करू पाहतात आणि अशा लेखनाचाच आशय आदर्श आहे असंही त्यांच्यात मानलं जातं. ‘आपण सगळेच जाणतो की’ असे शब्दप्रयोग या कंपूंमध्ये वारंवार केले जातात आणि त्यातच त्यांच्या प्रवृत्तीचं सार आहे. अशा स्वरूपात मुक्तिदायी राजकारण हा सार्वजनिक प्रकल्प उरत नाही.

इपीडब्ल्यू हे खुलं पुस्तक आहे, त्याचं स्वरूप अतिसुरक्षित ब्लॉगसारखं नाही, त्यामुळं विविध स्थानांवरून मांडल्या जाणाऱ्या विविध दृष्टिकोनांमधून चिकित्सक मर्मदृष्टी उदयाला येऊ शकतात, अशी इपीडब्ल्यूची धारणा आहे. शिवाय, चिकित्सक मर्मदृष्टींना निश्चित पत्ता नसतो आणि मुक्तिदायी संघर्षांच्या सर्व स्थानांवरून अशी दृष्टी इपीडब्ल्यूच्या पानांमध्ये समाविष्ट होऊ शकते, अशीही या नियतकालिकाची धारणा आहे. विचारांच्या चिकित्सक आणि त्यामुळंच परिवर्तनकारी असलेल्या शक्तीचं लोकशाहीकरण करण्यासाठी आवश्यक स्थान इपीडब्ल्यूला लाभलं आहे. विविध गटांमध्ये पूल बांधून गंभीर विचारांचं लोकशाही करण्याचा समतावादी दृष्टिकोन आणि नियतकालिकात प्रसिद्ध होणारा आशय यांवरून हे स्थान स्पष्टपणे दिसून येतं. सर्वस्तरीय परिवर्तनकारी विचारांना चालना देण्याबाबत इपीडब्ल्यूचं डिजीटल रूप आणि भाषांतर-प्रकल्प यांची भूमिका मोलाची राहिली आहे.

मानवी मुक्तीला सार्वजनिक प्रकल्प बनवण्यासाठीच्या इपीडब्ल्यूच्या प्रयत्नांमध्ये प्रत्येकानं सहभागी व्हावं, असं कळकळीचं आवाहन मी करतो आहे.

गोपाळ गुरू

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top