ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

कार्ल मार्क्स- ‘अस्तित्वात असलेल्या सगळ्याची कठोर चिकित्सा’

कार्ल मार्क्स यांच्या जन्माला दोनशे वर्षं पूर्ण होत असताना बर्नार्ड डी’मेलो यांनी जागतिक व्यवस्था म्हणून भांडवल आणि भांडवलशाही यांच्या चिकित्सक विश्लेषणाची मांडणी केली आहे.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

‘कठोर चिकित्सा’ हे कार्ल मार्क्सचं एक मुख्य तत्त्व होतं. भांडवल आणि भांडवलशाही यांची कठोर चिकित्सा करताना त्यांनी स्वतः या तत्त्वाचं परिणामकारक उपयोजन केलं. त्यांच्या जन्माला आता दोनशे वर्षं पूर्ण होत असली तरीही या भांडवलशाहीच्या चिकित्सेमुळं ते आजही जगातील सर्वाधिक प्रभावशाली ऐतिहासिक बौद्धिक व्यक्तिमत्वांपैकी एक मानले जातात. त्यांनी स्वतःच्या मतांनाही कठोर चिकित्सेचं तत्त्व लागू केलं होतं. आपल्या लेखनातील प्रामाणिक काय आहे आणि खोटं काय आहे, याची छाननी ते सातत्यानं करत राहात. उदाहरणार्थ, १८५३ साली ब्रिटिश साम्राज्यवादी स्त्रोतसामग्रीवर अवलंबून राहिल्यामुळं सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की, ब्रिटिश वसाहतवाद हे भारतातील आर्थिक परिवर्तनासाठी ‘इतिहासाचं अबोध साधन’ ठरतं आहे. परंतु, १८८१ साली सयुक्तिक अनुभवाधिष्ठित पुरावा हाताशी आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मतामध्ये सुधारणा केली. भारतीयांकडून ‘ब्रिटिश जे काही हिसकावत आहेत त्या रक्तरंजित सूडचक्राशी तुलना होण्याजोगं दुसरं काहीही नाही’, असं त्यांचं १८८१मधील निरीक्षण होतं. मार्क्स कायमच अनुभवाधिष्ठित पुरावा मोकळेपणानं स्वीकारत. शिवाय, त्यांच्या संकल्पना आणि व्याख्या खुल्या स्वरूपाच्या आणि नवीन व बदलत्या ऐतिहासिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या होत्या.

सुरुवातीला स्वप्नाळू (रोमॅन्टिक) आदर्शवादी भूमिकेतून मार्क्स यांनी इतर तत्त्वज्ञांबरोबरच फ्रेडरिक हेगेल आणि लुडविग फ्युबार्ख यांची चिकित्सा केली. तत्कालीन असह्य भौतिक परिस्थितीविषयी चिंता वाटत असल्यामुळं त्यांनी पुढं जाऊन भौतिकवादी विरोधविकासत्व (मटेरियालिस्ट डायलेक्टिक्स) आणि ऐतिहासिक भौतिकतावाद (हिस्टॉरिकल मटेरियालिझम) यांबद्दल स्वतःची मांडणी केली. तेव्हापासून त्यांच्या विचारपद्धतीमध्ये कोणताही तीव्र खंड पडला नाही. किंबहुना ‘पूर्वकालीन मार्क्स’ आणि ‘उत्तरकालीन मार्क्स’ यांच्यामध्ये सेंद्रिय दुवा असल्याचं आढळतं. जर्मन तत्त्वज्ञान, फ्रेंच समाजवाद, ब्रिटिश राजकीय अर्थनीती आणि त्यानंतर रशियन लोकानुनयवाद, असे काही कळीचे प्रभाव त्यांच्यावर पडले.

‘कॅपिटाल’मध्ये मार्क्सनी अमूर्त-आनुमानिक पद्धत वापरली. हीच पद्धत पुढं ‘सलग अंदाजां’ची प्रक्रिया म्हणून ओळखली गेली; यामध्ये प्रत्येक टप्प्यावर विश्लेषण अधिक अमूर्ततेकडून अधिक मूर्ततेकडं जातं, पुढील विश्लेषणाच्या टप्प्यांवर सुलभीकरणारी गृहितकं सोडून दिली जातात. प्रत्येक विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये सिद्धान्तांद्वारे प्रत्यक्षातील व्यापक घटितांची दखल घेऊन त्याचं स्पष्टीकरण केलं जातं. अमूर्ततेच्या पद्धतीमुळं वास्तव जगातील कळीचे घटक सखोल तपासासाठी वेगळे काढायला मदत होते. उदाहरण म्हणून ‘कॅपिटाल’च्या पहिल्या खंडामध्ये नमूद केलेल्या भांडवल-श्रम संबंधांच्या स्वरूपाकडं पाहाता येईल. अमूर्ततेच्या कनिष्ठ पातळीवरतील वास्तवाच्या अधिक काही अंगाची दखल घेतली जाते. यातून अमूर्ततेच्या उच्च पातळीवरचा कल बदलू शकतो. महत्त्वाचं म्हणजे मार्क्सच्या पद्धतीचा गाभा ऐतिहासिक होता व आहे. विशिष्ट सामाजिक संबंधांनुसार बदलाची प्रकिया ही मानवी कृतीतून उत्पादित होते. समाज बदलत असतो आणि त्यात बदल घडवताही येतो (‘गतकाळात सापडणाऱ्या, उपस्थित असलेल्या आणि हस्तांतरित झालेल्या परिस्थितीच्या’ मर्यादेमधील बदल). ऐतिहासिक भांडवलशाही सोडून दुसरी कुठली भांडवलशाही अस्तित्वातच नसते. त्यामुळं, पाश्चात्त्य युरोपातील भांडवलशाहीच्या मार्क्सनी केलेल्या विश्लेषणामध्ये या भांडवलशाहीचा उगम, तिची कार्यपद्धती आणि तिची पुढील दिशा हे घटक मध्यवर्ती ठरतात.

बदलाला चालना देणाऱ्या ऐतिहासिक शक्ती आणि स्थैर्य राखण्याचा अट्टाहास करणाऱ्या व्यवस्थाबद्ध शक्ती यांच्यामध्ये कायम अस्वस्थकारक तणाव असतो. या संघर्षामुळं कार्यकारी ऐक्याच्या ठिकऱ्या उडतात आणि त्यातूनच मोठा बदल घडतो. त्यामुळं, १८६०च्या दशकातील भांडवल व भांडवलशाहीची मार्क्सनी केलेली चिकित्सा अजूनही सर्वाधिक जहाल ठरत असली, तरी त्या काळापासून आताची अर्थव्यवस्था आणि समाज अपरिहार्यरित्या बदलले आहेत. आपल्या पद्धतीमध्ये सातत्यानं सुधारणा करत मार्क्स यांनी सुरू केलेल्या संशोधनकार्याला पुढं नेणं आवश्यक आहे. त्यांचा सिद्धान्त खुला होता, आणि आपण त्याचीही चिकित्सा करावी अशी मार्क्स यांची निश्चितच अपेक्षा राहिली असती. विशेषतः मार्क्सवादी दृष्टिकोनातून केलेली अशी चिकित्सा या सिद्धान्ताला अधिक संपन्न करणारी ठरू शकते.

‘कॅपिटाल’चा पहिला खंड प्रकाशित झाल्याच्या घटनेला दीडशे वर्षं होऊन गेली आहेत. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात अनुभवाधिष्ठित वास्तवाची भर पडलेली आहे, त्यामुळं मार्क्स यांच्या सैद्धांतिक अमूर्ततेमध्येही महत्त्वाच्या सुधारणा करण्याची गरज आहे. आजची भांडवलशाही खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवर कार्यरत आहे. जागतिक भांडवलशाही व्यवस्थेच्या केंद्रापेक्षा तिचा परिघावरील व निम-परिघावरील अवकाश आर्थिक, राजकीय व सैनिकीदृष्ट्या दुय्यम झाला आहे. परिघ व निम-परिघ या अवकाशांमधील शोषण वाढलं आहे. व्यवस्थेच्या अतिरिक्ततेचे वाटप अधिक असमान झालं आहे आणि केंद्रस्थानी असलेले सत्ताधारी वर्ग व व्यावसायिक अभिजन यांना याचा सर्वाधिक वाटा मिळतो- हाच आजच्या व्यवस्थेच्या शोषणकारी संस्थात्मक रचनेचा गाभा आहे. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी कुंठितावस्था (मंदावलेली आर्थिक वृद्धी, वाढती बेरोजगारी/अल्प-रोजगारी आणि अतिरिक्त क्षमता) आलेली आहे, जगभर अल्पसत्ताकवादी बहुराष्ट्रीय कंपन्या फोफावल्या आहेत, आणि ‘भांडवल संचय प्रक्रियेचं वित्तीयीकरण’ झालं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था आणि तिच्या बहुतांश राष्ट्रीय भागीदारांच्या ‘वास्तविक’ अंगावर एका बड्या व तुलनेनं स्वतंत्र वित्तीय इमल्याची उभारणी झालेली आहे. या वित्तीय इमल्याचा प्रभाव जगातील बड्या ‘वास्तविक’ अर्थव्यवस्थांच्या व कंपन्यांच्या रचनेवर आणि कामकाजावर पडला आहे. त्यामुळं या अर्थव्यवस्थांच्या व कंपन्यांच्या व्यवस्थापकांनाही वित्तीय अनुमानांमध्ये गुंतणं भाग पडतं. साठवलेल्या उत्पन्नाला वास्तविक भांडवली रचनांमध्ये नफादायी मार्ग सापडत नाहीत, त्यामुळं ते आनुमानिक वित्तीय मार्गांकडं वळवलं जातं.

दरम्यान, ‘वास्तविक’ जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिघावरील/निम-परिघावरील श्रमिकांना केंद्रस्थानी येण्यापासून रोखण्यासाठी कठोर निर्बंध आहेत. त्यामुळं बहुराष्ट्रीय भांडवलानं बहुतांश ठिकाणी परिघावरील/निम-परिघावरील औद्योगांशी अतिशय असमान पण पूरक संबंध ठेवलेले आहेत, आणि त्या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड शोषणाचा फायदा घेत या उद्योगांमधील कामगारांनी निर्माण केलेल्या मूल्यावर या बहुराष्ट्रीय भांडवलानं ताबा मिळवला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अशा खरेदीदारकेंद्री जागतिक क्रयवस्तू साखळ्या आता शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत. बाजारपेठीय सत्ता नसल्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या उद्यमातील नफा, उत्पादक जमिनीचं भाडं आणि संचित कर्जांवरील व्याज हे सगळं ‘भांडवला’समोर आणून टाकावं लागतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या ‘वेतना’चा काही भागही त्यांना या प्रक्रियेत खर्चावा लागतो.

आज ‘कॅपिटाल’ची कितीही खंडांची समकालीन आवृत्ती काढायची झाली, तर ती मुळातल्या आवृत्तीपेक्षा खूपच भिन्न असेल. जागतिक पातळीवरचं भांडवल व भांडवलशाही यांची चिकित्सा त्यात करावी लागेल. या लेखाच्या शब्दमर्यादा लक्षात घेता या ठिकाणी अशा आवृत्तीमधील संभाव्य आशयाची केवळ यादी नोंदवणं शक्य आहे: जागतिक पातळीवरील वर्गीय विश्लेषण; श्रमशक्तीचं मूल्य आणि केंद्र, परीघ व निम-परीघावरील श्रमाच्या अतिशय भिन्न किंमती; महाशोषण व विषम देवाणघेवाण यांची सैद्धान्तिक मांडणी करणारा मूल्य सिद्धान्त; अल्पसत्ताक बाजारपेठीय रचनांमधील अतिरिक्त मूल्य वाटपाची सैद्धान्तिक मांडणी करणारा मूल्य सिद्धान्त; भांडवलाकडून शोषण होणारे गरीब शेतकरी व इतर निम्न-क्रयवस्तू उत्पादक; क्रयवस्तूच्या श्रमशक्तीचं पुनरुत्पादन करणारं आणि वेतन न मिळणारं घरकाम; श्रमिकीकीरणाद्वारे बहुसंख्यांचा सत्ताहीनतेच्या दिशेनं झालेला ऱ्हास; नैसर्गिक स्त्रोतांवर करण्यात येणारा कब्जा आणि मक्तेदारी भाडेपद्धती; ‘निसर्गा’कडून उपयुक्तता मूल्याचा अशाश्वत अपहार करणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाचा व उपभोगाचा ‘कचरा’ पुन्हा ‘निसर्गा’कडं अशाश्वत पद्धतीनं फेकणं; पर्यावरणीय साम्राज्यवाद; अस्थैर्य, संकटं आणि परिणामकारक मागणीची समस्या; वित्तीयीकरण, वित्तीय इमला आणि ‘वास्तविक’ अर्थव्यवस्थेशी असलेले त्याचे संबंध व परिणाम; मक्तेदारी-वित्त भांडवल; विद्यमान भांडवली वस्तूंचा साठा व वित्तीय मालमत्तेचा साठा या दोहोंची दखल घेणारा आणि या दोन घटकांमधील परस्परसंबंधांची मांडणी करणारा संचय सिद्धान्त; भांडवलाची राजकीय आदेश रचना ठरलेली राज्यसंस्था; विक्रीचे प्रयत्न; नागरी सरकार; सैनिकीकरण व साम्राज्यवाद; मुख्य अंतर्विरोध आणि मूलभूत अंतर्विरोध; आणि समाजवादी सामाजिक क्रांती.

मार्क्स यांच्या जन्माला दोनशे वर्षं होत असताना त्यांची विचार व विश्लेषणपद्धती- ऐतिहासिक भौतिकवाद व भौतिकवादी विरोधविकासत्व- यांचं नव्यानं अर्थनिर्णयन करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला वारश्यात मिळालेल्या जुन्या अर्थनिर्णयनांची चिकित्साही व्हायला हवी. विशेषतः मार्क्सवादाकडं आर्थिक नियतीवादाच्या यांत्रिक स्वरूपात पाहाणाऱ्या दृष्टिकोनापासून फारकत घेण्याची आत्यंतिक गरज आहे. या आर्थिक नियतीवादातूनच ऐतिहासिक भौतिकवाद या इतिहासविषयक सिद्धान्ताचा उगम झाल्याचं सांगितलं जातं आणि मानवतेच्या उर्वरित जीवनासाठी हा सिद्धान्त वैध असल्याचा दावा केला जातो!

जगाचा नव्यानं अर्थ लावणं आणि समाजवादी सामाजिक क्रांतीद्वारे जग बदलणं निकडीचं बनलेलं आहे, कारण भांडवल व भांडवलशाही अशीच चालू राहिली तर मानवतेला आणखी २०० वर्षांचा अवधीही मिळणार नाही.

Back to Top