ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

ट्रम्प यांचं फिरतं दार

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना निष्ठावानांचं अंतःवर्तुळ हवं आहे; या संदर्भात कुणाचं वर्तन शंकास्पद वाटलं की त्या व्यक्तीला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी १३ मार्च रोजी तातडीनं काढून टाकलं आणि याची घोषणा ट्विटरवरून केली. टिलरसन यांची मानहानी करण्याचा व त्यांच्याविषयी तुच्छता दाखवण्याचा हा प्रकार होताच, शिवाय मुळात परराष्ट्र मंत्र्यांच्या पदाबाबतचा तिरस्कारही यातून दिसला. यानंतर ट्रम्प यांच्याकडून वारंवार विनवणी झाल्यावर अॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी उप-संचालक अँड्र्यू मॅकाबे यांना काढून टाकलं. वास्तविक ‘व्हाइट हाऊस’कडून वारंवार होणाऱ्या धिक्कारामुळं मॅकाबे यांनी आधीच पदाचा त्याग केला होता आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी निवृत्त होण्यास पात्र ठरण्याकरिता ते संचित रजेचा वापर करत होते. आपल्याशी एकनिष्ठ नसलेल्यांबाबत क्षुद्र सूडबुद्धी दाखवण्याचा हा प्रकार होता. पण त्याचसोबत २०१६ सालच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या कथित हस्तक्षेपाचा तपास करण्याबाबत ‘बिभत्स गारठा’ पडणार असल्याचंही त्यातून सूचीत झालं. हा तपास करणारे विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी ट्रम्प यांच्या संस्थेचे दस्तावेज तपासण्याचे आदेश दिले होते; ट्रम्प यांच्या स्थावर मालमत्ता व ब्रँडिंग व्यवसायाच्या साम्राज्याचे रशियन वित्त गुंतवणूकदारांशी संबंध असावेत, यावरून हे आदेश देण्यात आले होते. शिवाय, मुलर यांनी ‘व्हाइट हाऊस’कडं काही प्रश्नांची यादीही पाठवली आहे, असं कळतं. या नंतर खुद्द राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांमध्येच ‘व्हाइट हाऊस’मधील सहकाऱ्यांचं त्यांच्याविषयीचं मत नकारात्मक झालं होतं. ट्रम्प हे अकार्यक्षम, अपुरी माहिती असणारे व राष्ट्राध्यक्ष बनण्याची पात्रता नसलेले आहेत, त्याचसोबत आत्मप्रेमात बुडालेले आणि मानसिकदृष्ट्या अस्थिरही आहेत, असं त्यांच्या सहकाऱ्यांचं मत झालं आहे, ही वस्तुस्थिती पत्रकार मायकल वॉल्फ यांच्या ‘फायर अँड फ्यूरी: इन्साइड द ट्रम्प व्हाइट हाऊस’ या जानेवारीत प्रकाशित झालेल्या पुस्तकातून स्पष्टपणे समोर आली. ट्रम्प यांना याची जाणीव अर्थातच असणार. परिणामी, राष्ट्राध्यक्षांच्या अंतःवर्तुळाचा भाग असलेल्या व्यक्तींना पदच्युत करण्याची मालिका सुरू झाली. परंतु, सर्वसामान्य जनतेचा विचार करता, विशिष्ट ‘अब्जाधीश वर्गा’च्या अर्थपुरवठ्यावर नव-फॅसिस्टवादी राजकारणानं एका अतिराष्ट्रवादी, वंशद्वेषी, भिन्नलिंगद्वेषी, अब्जाधीश वित्तीय-भांडवलदाराला अमेरिकेतील कार्यकारीसंस्थेमध्ये सर्वोच्च पदावर नेऊन बसवलं, ही बाब अधिक विचारणीय आहे. हे घडणं संभाव्य नव्हतं, असं कुणीच म्हणणार नाही. गेल्या चार दशकांमध्ये अमेरिकेत उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपाबाबत सातत्यानं वाढत असलेली विषमता अभूतपूर्व ऐतिहासिक सर्वोच्च बिंदूपर्यंत पोचलेली असताना, हे घडणं अनपेक्षितही नव्हतं.

ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती सर्वोच्च पदावर जाण्यासाठीची सामाजिक अवस्था निर्माण करण्याचं काम ‘१ टक्क्यांच्या, १ टक्क्यांनी चालवलेल्या आणि १ टक्क्यांसाठी असलेल्या’ अर्थव्यवस्थेनं केलं होतं. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी देशाच्या सत्ताधिशांना कायदेशीर निर्बंधांपासून मुक्त करायला हवं, अशी ट्रम्प यांची धारणा आहे. आपण ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहोत याचा अर्थ आपल्याला सर्वंकष अधिकार मिळालेले आहेत, असं त्यांना वाटतं. त्याचप्रमाणे अमेरिकी राज्ययंत्रणेच्या कार्यकारीसंस्थेचे आपण प्रमुख आहोत त्यामुळं सगळी सत्ता आपल्या हातात केंद्रित असायला हवी, असं त्यांचं मत दिसतं. त्यामुळं ऑगस्ट २०१७मध्ये शार्लट्सव्हिल इथं झालेली ‘यूनाइट-द-राइट’ निदर्शनं व प्रतिनिदर्शनं आणि वंशविद्वेषी हिंसाचार यानंतर ट्रम्प यांनी स्वतःला अहंकारानं कायद्याचा अंतिम न्यायाधीश मानलं आणि नव-नाझी मंडळींना ‘अत्युत्तम लोक’ असं संबोधलं.

उत्तर कोरियाचे किम योंग-उन यांच्यासोबतच्या शिखरबैकीला ट्रम्प यांनी संमती दिली तेव्हा त्यांच्या मनात काय होतं, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांना आणि संरक्षण मंत्र्यांनाही यासंबंधी विश्वासात घेतलं नव्हतं. कदाचित या बैठकीला जाणीवपूर्वक कोसळवून ते युद्धासाठीचं कारणही शोधू शकतात. आता त्यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीचे (सीआयए) प्रमुख व ट्रम्प यांचे निष्ठावान माइक पोम्पिओ यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. परिणामी एक उच्चपदस्थ गुप्तचर अधिकारी आता परराष्ट्रविषयक कामकाजाचा अमेरिकी प्रतिनिधी असेल. सीआयएच्या एका तुरुंगात अत्याचार मोहिमा चालवल्याबद्दल कुख्यात असलेल्या गिना हॅस्पेल आता पोम्पिओ यांच्यानंतर सीआयएच्या संचालक असणार आहेत.

सोव्हिएतोत्तर काळात, ‘नॉर्थ अटलान्टिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’मधील इतर साथीदारांसोबत अमेरिकेनं बाल्कन, केंद्रीय आशिया, पश्चिम आशिया, व उत्तर आफ्रिका या प्रदेशांमध्ये युद्धं सुरू केली आणि युक्रेनमधील राज्यविरोधी बंडाला चिथावणी दिली. आता भांडवलदार बनलेल्या रशियानं अमेरिकी कृत्यांना प्रतिसाद म्हणून क्रिमियाला स्वतःमध्ये गिळंकृत केलं (आधी क्रिमिया युक्रेनचा भाग होता). सिरियामध्ये अमेरिकी-सौदी पुरस्कृत युद्धाला प्रत्युत्तर म्हणून रशियानं पश्चिम आशियातील आपला महत्त्वाचा साथीदार असलेल्या सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या सत्तेला पाठिंबा दिला. अमेरिकी सैनिकी-गुप्तचर यंत्रणा अजूनही बहुतांश प्रमाणात रशियालाच मुख्य शत्रुपक्ष मानते. पण ट्रम्प यांचं प्रशासन अमेरिकी भांडवलदार वर्गामधील अशा गटाचं प्रतिनिधित्व करते ज्यांच्या मते इस्लामिक स्टेट, इराण, उत्तर कोरिया आणि चीन हे अमेरिकेचे मुख्य शत्रू आहेत.

गेल्या दीड वर्षामध्ये ट्रम्प यांच्या सरकारनं सैनिकी-गुप्तचर यंत्रणेला स्वतःच्या शिस्तीत आणायचा प्रयत्न चालवला आहे, परंतु याला फारसं यश मिळालेलं नाही. उलट, डेमॉक्रेटिक पक्षाच्या साथीनं सैनिकी-गुप्तचर यंत्रणा विविध ‘माहितीफुटी’द्वारे रम्प यांच्या गच्छंतीसाठीच प्रयत्न करते आहे. गंभीर महाभियोग अथवा आरोपपत्र यांनी भयग्रस्त झालेल्या ट्रम्प यांना सतत केवळ त्यांच्यावरच निष्ठा राखणाऱ्या व्यक्तींचं अंतःवर्तुळ गरजेचं वाटू लागलं आहे. पण अमेरिका व जगातही लोकशाहीला पाठबळ पुरवतील अशा देशांतर्गत व परदेशी धोरणांचं समर्थन ना ट्रम्प प्रशासन करतं ना डेमॉक्रेटिक पक्षाचा पाठिंबा असलेली सैनिकी-गुप्तचर यंत्रणा करते. हे दोन्ही घटक जगभरातील लोकशाही अधिकारांसाठी धोकादायकच आहेत.

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top