ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

तामीळनाडू आणि तिथला असंतोष

राजकीय पोकळी भरण्यासाठी दोन चित्रपट तारे पुढं आले असताना राज्याचं भवितव्य संदिग्ध वाटतं आहे.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अखिल भारतीय अण्णा द्रमुक) पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नव्वदी पार केलेले नेते एम. करुणानिधी यांनी सार्वजनिक जीवनातून टप्प्याटप्प्यानं निवृत्ती घेतल्यानंतर गेली दोन वर्षं तामीळनाडूमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. यातून तिथल्या राज्यव्यवस्थेमध्ये नवीन पोकळी निर्माण झाली. चित्रपटविश्वातून भावी राजकीय नेत्यांची जोपासना होणाऱ्या या राज्यामध्ये पडद्यावरचं कथानक आणि वास्तव जीवन यांच्यातली सीमारेषा अतिशय बारीक आहे, त्यामुळं राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी रजनीकांत आणि कमल हसन यांच्यासारख्या पडद्यांवरच्या नायकांनी पुढाकार घेतल्यावर कुणालाही आश्चर्य वाटलं नाही.

गतकाळामध्ये तामीळनाडूतील राजकीय स्पर्धा मुख्यत्वे उपरोल्लेखित द्रविडी पक्षांमध्येच होत आलेली आहे. राष्ट्रीय पक्ष असोत किंवा विशिष्ट सामाजिक जनाधारावर दीर्घ काळ कार्यरत असलेले पक्ष असोत, त्यांना निवडणुकीच्या काळात या दोनपैकी एका पक्षांच्या मागोमाग जावं लागत असे. द्रविडी पक्षांनीही कल्याणकारी कल असलेल्या शासनव्यवहाराच्या साथीनं आश्रयदातृत्वाची व्यवस्था राखायची कला साधली. यामध्ये खोलवर रुजलेला भ्रष्टाचारही उपस्थित होता. अशा व्यूहरचनेतून स्वतःला एकसंध ठेवण्यासोबतच प्रभुत्व टिकवणंही या पक्षांना शक्य झालं. केंद्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) अशा पक्षांना पाठिंबा देऊनही राज्यात त्यांना दुय्यम स्थान देण्याचं परिणामकारक राजकारण या पक्षांना जमलं होतं. या दोन द्रविडी पक्षांमध्येच राज्यातील सत्ता आळीपाळीनं फिरत राहिली, परंतु दोन्हींच्या सत्ताकाळात आश्रयदातृत्वाची व्यवस्था मात्र कायम असायची, आणि या व्यवस्थेमध्येच असंतोषाची बिजंही होती.

चित्रपट अभिनेते विजयकांत यांनी २००५ साली देसीया मुरपोक्कू द्रविड कळघम हा पक्ष स्थापन केला. पहिल्यांदाच लढवलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये १० टक्के मतं मिळवण्याची विस्मयजनक कामगिरी या पक्षानं करून दाखवली. मतदारवर्गातील बरेच घटक राजकीय पर्याय शोधत आहेत, हे यातून स्पष्ट झालं. दशकभरापूर्वीच्या आपल्या एका सहव्यवसायी व्यक्तीनं करून दाखवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती साधण्याची आकांक्षा रजनीकांत व कमल हसन यांच्या पुढाकारामध्ये अनुस्यूत आहे, परंतु यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग चोखाळले आहेत. रजनीकांत यांची प्रतिमा ‘सुपरस्टार’ अशी आहे आणि त्यांना राज्यात प्रचंड चाहतावर्ग लाभलेला आहे; तरीही स्वतःच्या राजकारप्रवेशाची शक्यता त्यांनी कायमच हसण्यावारी नेली होती. १९९६ साली त्यांनी पहिल्यांदा अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या विरोधात सार्वजनिक भूमिका घेतली होती. सरकारची मुजोरी व भ्रष्टाचार यांविरोधातील असंतोषाला यातून प्रोत्साहन मिळालं. परंतु, राजकारणात त्यांनी औपचारिक सहभाग घेतलेला नव्हता. अलीकडच्या वर्षांमध्ये राजकीय अवकाशाला नवीन परिमाण प्राप्त करून देण्यात आपल्याला तीव्र रस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. स्वतःची ‘अध्यात्मिकता’ व लोकप्रियता यांचाही उल्लेख त्यांनी केला होता. वैयक्तिक धार्मिकता आणि व्यक्तिगत नेतृत्व यांच्यावर त्यांनी दिलेला भर राज्यातील उजव्या शक्तींना जवळचा वाटला, त्यामुळं भाजपच्या राज्यातील सहप्रवासी राजकीय शक्तींनी रजनीकांत यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु हिंदुत्वाच्या राजकारणाला फारसा जनाधार न मिळणाऱ्या या राज्यात त्यांच्या प्रयत्नांना अजूनतरी यश मिळालेलं नाही.

परंतु, रजनीकांत यांनी मात्र भाजपशी कोणतीही आघाडी करण्याची किंवा जवळीक साधण्याची शक्यता सूचीत करायचं टाळलेलं आहे. राज्यातील सर्व २३४ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी पक्षबांधणी करण्यावर आपलं लक्ष असल्याचं सांगून त्यांनी सुशासनविषयक पोकळ वक्तव्यं तेवढी केली. कोणत्याही मुद्द्यावर सार्वजनिक भूमिका घेण्याचं त्यांनी टाळलं आहे आणि कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कारही केलेला नाही. परंतु, एम.जी. रामचंद्रन यांच्या यशाचं अनुकरण आपण करू इच्छितो असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. रामचंद्रन यांनी द्रमुकपासून वेगळं होऊन कोणताही विचारसरणीय रंग नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकची स्थापना केली होती. भाजपला अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तिस्तोमाला रजनीकांत यांच्यामुळं खतपाणी मिळेल, अशीही शंका व्यक्त केली जाते आहे.

दुसऱ्या बाजूला कमल हसन बहुगुणी अभिनेता म्हणून ख्यातकीर्त आहेत, पडद्यावर त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण व आव्हानात्मक भूमिका निभावलेल्या आहेत. रजनीकांत यांच्याइतकं लोकाकर्षण त्यांना लाभलेलं नाही, पण विलक्षण नटाचं सन्माननीय स्थान त्यांना दिलं जातं. रजनीकांत यांच्याप्रमाणे राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा त्यांनी अलीकडंपर्यंत व्यक्त केलेली नव्हती. परंतु अश्रद्धा आणि पुरोगामीत्व या संदर्भात सुरुवातीच्या काळातील द्रविडी आणि विवेकवादी चळवळींशी साधर्म्य सांगणाऱ्या विचारसरणीय भूमिका त्यांनी जाहीररित्या घेतल्या होत्या. गेल्या साधारण वर्षभराच्या काळात कमल हसन यांनी राजकारणातील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. आपण मध्यममार्गी आहोत आणि व्यावहारिकतेच्या राजकारणाशी आपली बांधिलकी असेल, अशी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘मक्कल निथी मय्यम’ (लोक न्याय केंद्र) असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. त्यांनी जमातवादी राजकारणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि भाजपला आपला विरोध असेल असंही स्पष्ट केलेलं आहे. असं काही रजनीकांत यांनी केलेलं नाही. शिवाय, शेतीसंकट, पाणीवाटप, पर्यावरणीय प्रश्न अशा विविध समस्यांवर कमल हसन यांनी जाहीर मतप्रदर्शन केलेलं आहे, परंतु स्थिर विचारसरणीय भूमिका मात्र त्यांनी टाळलेली आहे.

हे सर्व नोंदवल्यावर हेही स्पष्ट करायला हवं की, जयललिता यांच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय अण्णा द्रमुकमध्ये उडालेली अनागोंदी आणि विद्यमान सत्ताधारी शासनाविरोधात वाढती नाराजी ही मुख्य कारणं या सिनेनटांच्या राजकारणातील प्रवेशामागं आहेत. द्रमुकनं पक्षनेतृत्वासाठी करुणानिधींच्या विस्तारीत कुटुंबाची मदत घेतली आहे, पण त्यामुळं त्यांना ऱ्हासशील अखिल भारतीय अण्णाद्रमुकसाठीचा एकमेव पर्याय म्हणून उभं राहाणं शक्य झालेलं नाही. रजनीकांत व कमल हसन गेली अनेक वर्ष वैयक्तिक पातळीवर मैत्री राखून असले, तरीही ‘तारांकित स्थाना’पर्यंत पोचण्याच्या त्यांच्या वाटा भिन्न राहिलेल्या आहेत. रजनीकांत यांनी व्यक्तिमत्वाच्या आणि विचित्र लकबींच्या सहाय्यानं लोप्रियता मिळवली, तर कमल हसन यांनी उल्लेखनीय अभिनय करत विचक्षण प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावलं. राजकीय अवकाशातही त्यांच्यातील भेद अशाच प्रकारचे दिसत आहे. वेगानं मध्यम-उत्पन्न अर्थव्यवस्था बनत असलेल्या आणि आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी स्थिर राजकीय दिशेच्या प्रतिक्षेत असलेल्या या राज्यात दोघांपैकी कोण यशस्वी ठरतं, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Back to Top