ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

जुनी आणि नवी पेशवाई

भीमा कोरेगाव इथल्या हिंदुत्वविरोधी दलित संघटीततेमुळं उच्च जातीय गट हिंसाचाराला उद्युक्त झाले.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव लढाईचा द्विशतकी स्मरणोत्सव १ जानेवारी २०१८ पार पडला. या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून आलेल्या दलितांवर विखुरलेल्या स्वरूपात परंतु संघटित हल्ले झाल्यानं या सर्व कार्यक्रमाला गालबोट लागलं. याची प्रतिक्रिया म्हणून संतप्त दलित समुदायानं या हल्ल्यांचा निषेध करत महाराष्ट्रभरातील शहरांमधून निदर्शनं केली. या स्मरणोत्सवामधील अंतःस्थ सूत्र हिंदुत्वविरोधाचं होतं, त्याचा आणि या हल्ल्यांचा कळीचा संबंध असल्याचं दिसतं. या वर्षीच्या स्मरणोत्सवी कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले दलित व अल्पसंख्याक नेते आजच्या प्रभुत्वशाली उजव्या शक्तींविरोधातील मतभिन्नतादर्शक प्रवाहाचे चेहरे बनलेले आहेत, हाही संदर्भ या हल्ल्यांना होता.

भीमा कोरेगावमध्ये १८१८ साली ब्रिटिश साम्राज्यवादी सैन्य आणि तत्कालीन पेशव्यांच्या फौजा यांच्यात झालेली लढाई दलित इतिहासातील कलाटणी देणारी घटना मानली जाते. वासाहतिक सैन्याच्या विजयातील मुख्य योगदान महार बटालियनचं होतं, त्यातूनच ब्राह्मणी पेशवाई सत्तेचा शेवट झाला. या सांस्कृतिक स्मृतीचं पुनरुज्जीवन खुद्द भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलं. दडपशाहीविरोधातील दलितांचं शौर्य व विजय यांचं प्रतीक म्हणून या लढाईकडं पाहिलं जाऊ लागलं. परिणामी, सवर्ण हिंदू संस्कृतीच्या विरोधात आणि या संस्कृतीपासून फारकत घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आंबेडकरी प्रतिसंस्कृतीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध वार्षिक दिवसांमध्ये या घटनेलाही स्थान मिळालं. डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमधील काही महत्त्वाचे दिवस असे: ६ डिसेंबरला- आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस, त्यावेळी आपल्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर हजारो दलित एकत्र येतात; २५ डिसेंबर- आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली तो मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा होतो (दलित-बहुजन स्त्रीवादी या तारखेला भारतीय स्त्रीमुक्ती दिवस साजरा करतात); १ जानेवारी- भीमा कोरेगावमधील लढाईचा वर्धापन दिन (पुण्यातील या लढाईचं ठिकाण असलेल्या कोरेगाव इथं एकत्र येऊन हा दिवस साजरा होतो); ३ जानेवारी- सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस (शिक्षक दिन म्हणूही साजरा केला जातो); २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन, या वेळी आंबेडकरांनी तयार केलेला राज्यघटनेचा मसुदा भारतानं स्वीकारला. या कार्यक्रमांमधील सहभागामधून महाराष्ट्रातील दलितांमध्ये आंबेडकरी अस्मिता आणि जाणीव यांची जोपासना होत आली आहे.

परंतु, या वर्षीच्या भीमा कोरेगावमधील कार्यक्रमामध्ये उघडपणे हिंदुत्वविरोधी राजकीय रंग होते. विविध दलित नागरी संस्था व सांस्कृतिक संघटनांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ सुरू केलं होतं. या अभियानातर्फे ३१ डिसेंबर २०१७ रोजी- द्विशतकी स्मरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला- ‘एल्गार परिषदे’चं आयोजन होणार असल्याची घोषणा झालेली होती. पुण्यातील पेशव्यांचे निवासस्थान राहिलेल्या शनिवारवाड्यात ही परिषद होणार होती. “नवपेशवाईविरोधात (किंवा नव-फाशीवाद) एल्गार” असं या परिषदेचं सूत्र होतं. आजघडीच्या सत्ताधारी राजकीय शक्ती व त्यांचं हिंदू उजव्या विचारसरणीचं राजकारण यांच्यावरील राजकीय आक्रमणाचं हे सूत्र आहे. या कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी (दलित नेता व गुजरातमधील अपक्ष आमदार), सामाजिक कार्यकर्त्या सोनी सुरी (छत्तीसगढ) व उल्का महाजन (महाराष्ट्र), राधिका वेमुला (दिवंगत विद्यार्थी नेता रोहित वेमुलाची आई), आणि दोन्था प्रशांत व उमर खालिद हे विद्यार्थी नेते यांची मुख्य भाषणं झाली. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे मुख्य व कठोर टीकाकार म्हणून या वक्त्यांची गणना होते. या कार्यक्रमामधील हा हिंदुत्वविरोधी सूर उच्च जातीयांना उचकावणारा ठरला आणि त्यातून भीमा कोरेगावमधील हल्ल्याची ठिणगी पडली. हे हल्ले ३१ डिसेंबर २०१७ व १ जानेवारी २०१८ या दिवसांमध्ये झाले. कार्यक्रमात सहभागी व्यक्तींना/गटांना आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं. या हिंसाचारात एकाचा खून झाला, अनेक जण जखमी झाले आणि बऱ्याच गाड्यांचं गंभीर नुकसान झालं.

एल्गार परिषदेची नुसती घोषणा झाली तेव्हाही पुण्यातील प्रभुत्वशाली ब्राह्मण समुदायानं या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. परंतु नंतर लोकांच्या दबावामुळं हा विरोध मावळला आणि भीमा कोरेगावच्या इतिहासाविषयी चर्चा करण्यासाठी स्मरणोत्सवाच्या आयोजकांना ब्राह्मणांच्या संघटनेनं खुलं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी २०१७ सालीच वैज्ञानिक मेधा खोले यांनी आपल्या घरातील आचारी महिलेनं खरी जात लपवल्याबद्दल तिच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती; संबंधित महिलेनं जात लपवल्यामुळं आपल्या घरातील प्रथेची शुद्धता पाळली गेली नाही, असं खोले यांचं म्हणणं होतं. या प्रकरणानंतरही ब्राह्मण समुदायावर मोठी टीका झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मराठा, ब्राह्मणेतर राजकारणाचा पराभव करून भाजपनं ब्राह्मण- इतर मागास वर्गीय यांची सामाजिक आघाडी राज्यात पुढं आणली आहे. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार म्हणून शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता मंचाचे मिलिंद एकबोटे यांचा निर्देश केला जातो आहे. या दोघांचेही राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षांशी चांगले संबंध आहेत. विशेषतः दलित समुदायाविरोधात दंगल घडवल्याच्या आणि सांप्रदायिक चिथावणी दिल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आहेत.

दलित निदर्शनांचा भडका उडाल्यानं भाजपची अवस्था नाजूक झालेली आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ सुमारे १० टक्के दलित आहेत, परंतु ग्रामीण-शहरी विभागांमध्ये ‘सक्रिय जाळी’ असलेला आणि तीव्र राजकीय जागृती झालेला हा समुदाय आहे. त्यामुळं हिंदूंच्या स्वघोषित जागल्यांना नियंत्रित करण्यामधील भाजपची अकार्यक्षमता अधिक अडचणीची ठरली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये (दलितविरोधी) मराठा संघटिततेचा वापर करून दलित समुदायाला आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न भाजपनं चालवला होता. व्यापक हिंदू ऐक्य साधण्याच्या राजकीय प्रकल्पासाठी भाजपला दलित समुदाय महत्त्वाचा वाटतो. परंतु, महाराष्ट्रातील राजकीय अर्थनीतीवरील मराठा वर्चस्व आणि सांस्कृतिक अवकाशातील ब्राह्मणांचं प्रभुत्व यांमुळं राज्यातील व्यूहात्मक/खऱ्या भागीदारीसाठी दलितांना मोठा संघर्ष करावा लागतो. नीतीन आगे खटला व कोपर्डी खटला यांच्या निकालांमधील तीव्र विरोधाभास, किंवा पद्मावती (पद्मावत) चित्रपटाविरोधात राजपुतांनी केलेली निदर्शनं व भीमा कोरेगावसंदर्भात दलितांनी केलेली निदर्शनं यांबाबत व्यक्त होणाऱ्या सार्वजनिक प्रतिक्रिया या सर्व घटनाक्रमांमधून दलितांसंबंधीचा जातीय पूर्वग्रह उघड होतो. हा पूर्वग्रह न्यायव्यवस्थेपासून रस्त्यावरच्या रोजच्या जगण्यापर्यंत सर्वत्र आहे. परंतु, नवपेशवाईच्या रूपातील हिंदुत्ववादी शक्तींविरोधातील दलितांची यशस्वी संघटितता भारतामधील हिंदू उजव्या विचारसरणीच्या सांस्कृतिक व राजकीय भवितव्याला गंभीर इजा पोचवू शकते.

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top