धोकादायक वळण
कटकारस्थानांचे असंगत आरोप जाणीवपूर्वक करणारे मोदी काहीही करून निवडणुकीत विजय मिळवण्याच्या खटपटीत दिसतात.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
निवडणुकांच्या काळात राजकारणी लोक सत्य सांगतील, अशी अपेक्षा ठेवता येत नाही. किंबहुना, शाब्दिक अवडंबर, अतिशयोक्ती व तद्दन खोटेपणा हा निवडणुकांचा मुख्य भाग बनला आहे. पण संबंधित राजकारणी हा पंतप्रधानही असेल, तेव्हा त्याच्याकडून यापेक्षा किंचित सुधारीत वर्तनाची अपेक्षा करणं गैर ठरत नाही. परंतु, गुजरातमधील बनासकांठा इथं १० डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं भारतीयांच्या दृष्टीनं ही अपेक्षा धुळीस मिळाली. नाटकी अतिरंजितता व अतिशयोक्ती यांची नवीन प्रमाणकं मोदींनी अननुकरणीय शैलीद्वारे प्रस्थापित केली आहेत. या प्रमाणकांनुसार विचार केला तरीही मोदींनी त्या दिवशी केलेलं वक्तव्यं सर्व मर्यादांचा भंग करणारं ठरतं. लोकनियुक्त सरकारच्या प्रमुखाकडून असलेली किमान सभ्य वर्तनाची मर्यादाही त्यांनी पाळली नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी व माजी सैन्यदलप्रमुख दीपक कपूर यांच्यावर त्यांनी थेट राष्ट्रद्रोहाचा आरोप केला. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव घडवून काँग्रेसचे मुस्लीम नेते अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ‘शत्रू’सोबत- म्हणजे पाकिस्तानसोबत- गुप्त कट रचल्याचा आरोप या व्यक्तींवर मोदींनी केला. हा सगळा कल्पनाविलास वाटत असला तरी वास्तवामध्ये अटीतटीच्या गुजरात निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात वातावरण जमातीय बनवण्यासाठी हेतूतः केलेली ही कृती आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी ६ डिसेंबर रोजी झालेल्या तीन तासांच्या ‘गुप्त’ बैठकीमध्ये हे सर्व घडल्याचा पंतप्रधानांचा दावा आहे. यातला तीन तास हा तपशील तेवढा वस्तुस्थितीला धरून होता, परंतु अय्यर यांनी त्यांचे जुने मित्र व पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्यासाठी आयोजित केलेल्या खाजगी भोजन समारंभामध्ये काहीही ‘गुप्त’ नव्हतं.
मोदींच्या या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवत नसलं, तरी पाकिस्तान, काँग्रेस व मुस्लीम यांच्यात स्वैरपणे संबंध जोडण्याचा मुद्दा या हास्यास्पद खोटेपणाच्या केंद्रस्थानी आहे. हीच गोष्ट धोकादायक आहे. एक, देशाच्या लोकनियुक्त नेत्यानं प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करणं अपेक्षित असतं, केवळ आपल्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचं किंवा आपल्या पक्ष सदस्यांचं प्रतिनिधित्व या नेत्यानं करणं अपेक्षित नाही. परंतु, इथं देशाचा सर्वोच्च नेता पूर्वी घटनात्मक पदं सांभाळलेल्या व्यक्तींवर उघडपणे असा आरोप करतो आहे की, या व्यक्तींनी संगनमताद्वारे पाकिस्तानला भारतीय निवडणुकीत हस्तक्षेपासाठी वाव मिळवून दिला. शिवाय, भारतीय मुस्लीम व पाकिस्तान यांच्यात संबंध जोडणारी वक्तव्यंही मोदींनी सातत्यानं केली आहेत, त्यामुळं भारत देशाबाबतच्या मुस्लिमांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केल्यासारखं होतं. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षांमध्ये आपल्या देशाविषयीची निष्ठा सिद्ध करण्याची सक्ती मुस्लिमांवर वारंवार होत आलेली आहे. तीन, आपल्याला पदच्युत करण्यासाठी मुख्य विरोधक असलेला काँग्रेस पक्ष ‘शत्रू’सोबत संगनमत साधत आहे, असाही सूचक आरोप मोदी करत आले आहेत. गायीवरून चालू असलेलं राजकारण आणि तथाकथित ‘लव्हजिहाद’ यांवरून मुस्लिमांना लक्ष्य केलं जात आहे व त्यांच्या हत्याही होत आहेत, अलीकडंच ६ डिसेंबर रोजी राजस्थानातील राजसमंद इथं मोहम्मद अफ्रझूल यांची क्रूर हत्या झाली- या पार्श्वभूमीवर मोदींनी मात्र जाणीवपूर्वक मौन राखलं आहे. हे मौन आणि निवडणुकांवेळची वक्तव्यं यातून द्वेषाच्या राजकारणाची निर्मिती होताना दिसते, यामध्ये भारतीय मुस्लिमांना परिघावर ढकललं जातं आहे, त्याचसोबत या प्रक्रियेत भारतीय लोकशाहीच्या पायाही ठिसूळ होणार आहे. दुर्दैवानं या निवडणुकीत भाजपच्या मुस्लीमविरोधी कार्यक्रमाचा प्रतिकार करण्यात काँग्रेसलाही अपयश आलं. आपण मुस्लिमांच्या बाजूनं कललेलो नाही, असं दाखवण्याच्या प्रयत्नात काँग्रेसनं राज्यातील एका महत्त्वाच्या समाजघटकाकडं दुर्लक्ष केलं. गेली काही दशकं मुस्कटदाबी झालेल्या या समुदायाला काँग्रेसनंही आवाज दिला नाही.
गुजरात निवडणुकांमधील प्रचार ज्या पद्धतीनं झाला त्यामध्ये आणखीही काही गोष्टी चिंताजनक आहेत. प्रत्येक राज्य विधानसभा निवडणुकीसोबत मोदींभोवतीचं व्यक्तिस्तोम वाढवत नेलं जात असल्याचं दिसतं आहे. निवडणूक सभांवेळी होणाऱ्या ‘मोदी, मोदी’ अशा उन्मादी घोषणा, साबरमती नदीवर जलविमानाद्वारे उतरण्यासारख्या भपकेबाज प्रदर्शनी कृती (शिवाय, हे अशा प्रकारचं ‘पहिलं’ विमान असल्याचा दावा करण्यात आला. वास्तविक अंदमान-निकोबार बेटांवर कित्येक वर्षँ या विमानाचा वापर होत आला आहे), आणि अय्यर यांच्या भरकटलेल्या विधानाचा वापर व विपर्यास करून स्वतः पीडित असल्याचा मोदींनी केलेला उद्घोष यांमधून धोकादायक राजकारण उभं राहातं. एका व्यक्तीला निःसंदिग्ध व अढळ निष्ठा वाहाण्याची मागणी यातून तयार होते. मोदी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी, ‘राष्ट्र’निष्ठेचीही नवीन व्याख्या निर्माण होते.
गुजरातच्या प्रचारमोहिमेमध्ये मोदींच्या वक्तव्याची पातळी रसातळाला गेली, त्याचसोबत त्यातून हेही स्पष्ट झालं की हिंदुत्वाला पुढे नेण्यासाठीचा चेहरा ‘विकासा’चा होता आणि तो तसाच राहाणार आहे. सर्वांसाठी विकासाच्या सर्व गप्पा केवळ महाकाय नाट्यमय अंगविक्षेपांच्या दिशेनं जात आहेत. विकासाच्या आश्वासनाचा फोलपणा जलविमानाच्या कृतीतूनच दिसून येतो- ‘प्रगती’च्या अशा पोकळ प्रतीकांनी पोटं भरत नाहीत किंवा उपजीविकाही मिळत नाहीत, परंतु आपल्या मतदारवर्गाला अशा वेडगळ कृतींद्वारे अचंबित करता येईल, ही धारणा या फोलपणातूनच आलेली आहे. शेवटी तर धर्म, अस्मिता व नेत्याप्रति निष्ठा या खऱ्या कार्यक्रमासाठी ही आश्वासनंही लगोलग बाजूला सारली जातात. यासंबंधी कुणाला काही शंका असतील तर त्या गुजरातच्या निवडणूक प्रचारानं दूर केल्या आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये अधिक द्वेषमूलक वक्तव्यं केली जातील, भेदजनक व्यूहरचना आखल्या जातील, अल्पसंख्याकांची मुस्कटदाबी व त्यांना परिघावर ढकलण्याची प्रक्रिया गतिमान होईल, खुलेपणानं बहुसंख्याकवादाची बढाई मारली जाईल. भाजपच्या कार्यक्रमाचा सूर आणि आशय यांना प्रतिकार करणाऱ्या भिन्न, समावेशक कथनाची उभारणी करण्यासाठीचा आत्मविश्वास कमावणं हे विरोधकांसमोरचं एक आव्हान आहे.
कटकारस्थानांविषयी मोदींनी केलेल्या असंगत आरोपाला कठोर व योग्य प्रतिक्रिया देताना मनमोहन सिंग म्हणाले: “माजी पंतप्रधान व सैन्यदलप्रमुख यांसह सर्व घटनात्मक पदांची प्रतिमा मलीन करण्याच्या अधाशी आकांक्षेपायी मोदी धोकादायक पायंडा पाडत आहेत.” केवळ सत्ताधारी क्षाचा एक नेता म्हणून नव्हे, तर देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या व सभ्य वर्तनाच्या मर्यादा यांबाबत बेफिकीर असणारी व्यक्ती देशाचं नेतृत्व करतं आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मोदींपुरतं बोलायचं तर युद्धाप्रमाणे निवडणुकीतही काहीही शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. कोण जिंकतं ते महत्त्वाचं, कसं जिंकला ते महत्त्वाचं नाही.