‘१९१७-२१ची महान रशियन क्रांती’ आणि लेनिनवाद
नागरी युद्धावेळी निर्माण झालेल्या गंभीर विकारांवर उपाय करण्यात लेनिनवादाला अपयश आलं.
बर्नार्ड डी’मेलो यांनी हा मजकूर लिहिला आहे:
प्रस्तुत लेखाच्या शीर्षकामधील अवतरणातला भाग अलेक्झांडर रेबिनोविच यांच्या लेखनातून घेतलेला आहे. बोल्शेविक, १९१७ची रशियन क्रांती आणि यादवी युद्ध यासंबंधीचे जगातील एक आघाडीचे इतिहासकार म्हणून रेबिनोविच परिचित आहेत. ‘इपीडब्ल्यू’नं प्रसिद्ध केलेल्या ४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या ’‘रशियन क्रांतीच्या शतकमहोत्सव विशेषांका’त रेबिनोविच यांचा लेख आहे. रेबिनोविच, रेक्स ए. वेड (यांचाही लेख विशेषांकात आहे) आणि इतरांनी केलेल्या लेखनकार्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमधील रशियन क्रांतीच्या चुकीच्या चित्रणांचं खंडन करण्याची गरज पडत नाही. १९१७-२१ या कालखंडामधील प्रचंड दस्तावेज १९९१ पासून उपलब्ध झालेले असले, तरी अजूनही रशियन क्रांती म्हणजे लाल दहशतवादानंतर झालेलं राजकीय बंड होतं, असं चित्रण मुख्यत्वे केलं जातं. सत्ताधारी वर्गातीलच गटांमध्ये राज्यसूत्रं ताब्यात घेण्यासाठी (कार्यकारी राज्यसत्तेसाठी) सशस्त्र संघर्ष होतो तेव्हा सर्वसाधारणपणे त्याला राजकीय बंड (इंग्रजीत ‘कू’) म्हटलं जातं. आणि क्रांतीचा हिंसाचार हा इतर अनेक गोष्टींसोबतच प्रतिक्रांतीच्या हिंसाचाराच्या पातळीवर अवलंबून असतो. रशियाच्या संदर्भात ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इतर काही महासत्तांच्या हस्तक्षेपानं प्रतिक्रांतीला अधिक बळ मिळालं. क्रांतीचा सत्यान्वेषी इतिहास तिच्यासोबत येणाऱ्या अपरिहार्य प्रतिक्रांतीच्या इतिहासाला टाळू शकत नाही. या प्रतिक्रांतीचा आधुनिक काळातील मुख्य आधार साम्राज्यवाद हा राहिलेला आहे.
रशियात २०१७ साली फेब्रुवारीमध्ये व ऑक्टोबरमध्ये (जुन्या रशियन दिनदर्शिकेनुसार) अशा दोन क्रांत्या झाल्या. पहिल्या क्रांतीमध्ये राजसत्तेला आणि तिला आधार देणाऱ्या एकाधिकारशाहीला उलथवून टाकण्यात आलं. दुसरी क्रांती ही मुळात पहिल्या क्रांतीचं प्रतिक्रांतीच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी झाली, परंतु त्यात लोकांमधील भांडवलशाहीविरोधी चैतन्याला मुक्त अवकाश मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हद्दपारीहून परतल्यावर लेनिन यांनी मांडलेल्या ‘एप्रिल थीसिस’द्वारे ‘समाजवाद’ क्रांतिकारी कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाला. एप्रिल अखेरीला लेनिन यांच्या बोल्शेविक पक्षानं सोव्हिएत सरकारसाठीचं आवाहन केलं. फेब्रुवारी क्रांतीच्या काळात कामगारांनी आणि सैनिकांनी निवडलेली प्रतिनिधी-मंडळं म्हणजे ‘सोव्हिएत’. यांमध्ये बूर्झ्वा वर्गाला आणि बड्या जमीनमालकांना प्रतिनिधित्व नव्हतं.
रशियातील समाजवादी क्रांती (“साम्राज्यवादाच्या साखळीतील दुबळा दुवा”) अखिल युरोपीय क्रांतीसाठी मुख्य उत्प्रेरक ठरेल, असं लेनिनला वाटत होतं. तसं झालं नाही, तर रशियन क्रांतीला टेकून राहण्यासाठी फारसा वाव मिळणार नाही, असं प्रतिपादन त्यांनी केलं होतं. वसाहतवादाला प्रतिकार करणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळींशी आघाडी करण्याचाही विचार लेनिन यांनी केला होता. पहिल्या महायुद्धानंतर भयकारी हिंसाचार, प्रचंड अनागोंदी, रोगराई, दुष्काळ व तीव आर्थिक तणाव अशी संकटं कोसळली होती. त्या दरम्यान, सैन्यात बंड झालं, युद्धाला तत्काळ पूर्णविराम द्यावा व बिनशर्त शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी बोल्शेविकांची केली, याचसोबत सर्व युद्धग्रस्त देशांमधील श्रमिकांनी भांडवलशाहीविरोधातील लढ्यात ऐक्य दाखवावं असं आवाहनही त्यांनी केलं, यांमुळे कामगारांच्या आणि सैनिकांच्या वाढत्या लोकचळवळीचं नेतृत्वस्थान निष्ठावान बोल्शेविक क्रांतिकारी बुद्धिजीवींना मिळालं.
१९१७ सालच्या हिवाळ्यामध्ये बोल्शेविक आणि ‘डावे समाजवादी क्रांतिकारी’ यांना अनेक सोव्हिएतांमध्ये बहुमत मिळालं. लोकांमधील वाढत्या जहाल विचारांमुळं क्रांतिकारी उठावाचं नेतृत्व निर्णायक क्षणी बोल्शेविक पक्षानं केलं. विंटर पॅलेसवर बंडखोरांनी मिळवलेला ताबा हा तो क्षण होता. सत्ताधारी वर्गांना सत्ता चालवता येणार नाही आणि सर्वसामान्य लोक त्यांची सत्ता सहन करणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या अखिल रशियायी सोव्हिएत परिषदेमध्ये ‘सर्व सत्ता सोव्हिएतांकडं’ हे आश्वासन पूर्ण करण्यासाठीची पावलं उचलण्यात आली. कसणाऱ्यांना जमीन देणाऱ्या परिवर्तनकारी जमीनसुधारणा अंमलात आणण्यात आल्या, त्यामुळं जमीन ही आता क्रयवस्तू उरली नव्हती.
अर्थात, रशियातील क्रांती हे सहज मिळालेलं यश नव्हतं. फेब्रुवारी क्रांतीविरोधात जनरल कोर्निलोव्हनी ऑगस्ट २०१७मध्ये केलेल्या प्रतिक्रांतिकारी कारवायांनंतर पुढंही सेनाधिकाऱ्यांनी सैनिकी-हुकूमशाही क्लृप्त्या करून क्रांती अपयशी व्हावी यासाठी प्रयत्न केले. परंतु सैन्य विखुरल्यामुळं प्रतिक्रांतीच्या या कारवाया निष्प्रभ ठरल्या आणि नंतर मोठ्या संख्येनं सैनिक क्रांतिकारी दलांमध्ये सामील झाले. क्रांतिकारी ‘रेड आर्मी’विरोधात प्रतिक्रांतिकारी शक्तींच्या ‘व्हाइट आर्मी’नं सुरू केलेल्या यादवी युद्धात आधी उल्लेख केलेल्या महासत्ता प्रतिक्रांतीला खतपाणी घालत होत्या. ‘रशियात हस्तक्षेप करू नका’ असा संदेश देणाऱ्या काही चळवळी युरोपातील कामगार वर्गाच्या पक्षांनी सुरू केल्या, त्यामुळं पश्चिमेतील महासत्तांना ‘व्हाइट आर्मी’ला शेवटपर्यंत आधार देणं शक्य झालं नाही. आपल्याच देशात सोव्हिएत निर्माण होतील, अशी भीती या सत्तांच्या मनात निर्माण झाली आणि आपण आधीच रशियात पाठवलेल्या सैनिकांमध्येही बंड होण्याची शक्यता त्यांच्या भयग्रस्ततेत भर घालणारी ठरली.
क्रांतीमध्ये अटीतटीची परिस्थिती निर्माण झाल्यावर ‘आमच्यासोबत नाहीत ते आमच्याविरोधात आहेत’ असं तीव्र धृवीकरण आपोआपच होतं. दुर्दैवानं ‘उदारमतवादी’- समाजवादी पक्ष प्रतिक्रांतिकारी कंपूमध्ये सामील झाले. ऑगस्ट २०१७मध्ये कोर्निलोव्हच्या अपयशी बंडाला कॅडेट पक्षानं पाठिंबा दिल्यावर काय झालं, या वस्तुस्थितीमधून उदारमतवादी समाजवाद्यांनी काही धडा घेतला नसावा.
त्यानंतर जर्मनीसोबतच्या ब्रेस्ट-लितोवस्क कराराला विरोध करत ‘डाव्या समाजवादी क्रांतिकारकां’नी मार्च १९१८मध्ये बोल्शेविकांसोबतची आघाडी मोडली. हा खऱ्या अर्थानं क्रांतीला बसलेला एक मोठा धक्का होता. यातून जुलै १९१८मध्ये पुन्हा यादवी युद्ध सुरू झालं. क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात- १९१७च्या अखेरीला व १९१८च्या सुरुवातीला- झालेल्या यादवी युद्धापेक्षा ही दुसरी यादवी ‘विध्वंसक, रक्तरंजित होती. यातले दावेही अधिक मोठे होते. अवर्णनीय अनागोंदीमध्ये अडकलेल्या देशातील सत्ता कुणाच्या हातात जाईल, हे या लढाईतून ठरणार होतं. दोन बाजूंमध्ये कोणताही समेट होण्याची शक्यता नव्हती: हा मरणांतिक संघर्ष होता.’ यादवी युद्ध संपुष्टात आलं तेव्हाच्या ‘आर्थिक, लोकशाही, राजकीय व सांस्कृतिक निर्देशांकां’चा विचार केला, तर क्रांतिकारी सत्ताधाऱ्यांना ‘पन्नास वर्षांच्या थकबाकी’सोबत आरंभ करायचा होता, ‘१९१४-२१ या काळातील घडामोडींमुळं रशियातील जनता दुर्देशेच्या गर्तेत गेली होती आणि त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली होती’, असं इतिहासकार मोशे लेविन यांनी नोंदवलं आहे (द सोव्हिएत सेन्च्युरी, २००५, पान २९६).
मग क्रांतीचं काय झालं? यामध्ये गरीब शेतकरी, सैनिक (हेही गणवेशांमधले शेतकरीच होते), आणि कामगार सहभागी झाले होते. पण गणवेशातील व बिनगणवेशाच्या शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहाता क्रांतिकारी दलांमध्ये मुख्यत्वे गरीब शेतकऱ्यांचा समावेश होता. औद्योगिक कामगारांच्या समुदायामध्येही अनेक जण अर्ध वेळ कामगार आणि अर्ध वेळ शेतकरी अशाच प्रकारचे होते. त्यामुळं ही क्रांती मुख्यत्वे ‘सर्वसामान्यां’ची होती (द सोव्हिएत सेन्च्युरी, पान २८९). परंतु या घडामोडींचं नेतृत्व करणाऱ्या क्रांतिकारी बुद्धिजीवींच्या मांडणीमधील भविष्यकालीन समाज ‘समाजवादी’ धारणेचा होता. मुख्यत्वे लेनिन यांनी सप्टेंबर १९१७मध्ये प्रकाशित झालेल्या स्टेट अँड रिव्होल्यूशन या पुस्तकामध्ये अशा स्वरूपाची मांडणी केली. जवळपास निम-‘अराज्यवादी’ समाजवादी स्वरूपाच्या या संहितेनं क्रांतीच्या दीर्घकालीन ध्येयांची रूपरेषा पुरवली.
लेनिनवादाची एकतर अचिकित्सक भक्ती केली जाते किंवा त्याचा पूर्णपणे धिक्कार केला जातो. परंतु, पॉल ली ब्लांक यांचा लेनिन अँड द रिव्होल्यूशनरी पार्टी (१९८९) आणि लेविन यांचा द सोव्हिएत सेन्च्युरी असे काही ग्रंथ या संदर्भात अपवाद म्हणून सांगता येतील. भांडवलशाही उलथवून टाकण्यासाठी कष्टकरी वर्गाची जाणीवजागृती करणं, हे क्रांतिकारी पक्षाचं आवश्यक अंग आहे, याचा विसर न पडू देता लेनिनच्या मांडणीमध्ये विशिष्ट परिस्थितीमधील पक्षाच्या विशिष्ट अंगांचा विचार करण्यात आला. त्यामुळं पक्षाविषयीची त्याची मांडणी १९०२-०४ (‘व्हॉट इज टू बी डन?’ लिहिलं गेलं तो काळ), १९०५-०६, १९०८-१२, १९१४-१७ आणि १९१८-२१ या काळामध्ये बदलत गेलेली दिसते. परंतु, १९१८-२१ या काळातील लेनिनच्या मांडणीमधील गंभीर संदिग्धता व अंतर्विरोध नोंदवण्याची गरज आहे. या काळात हुकूमशाही व उच्चभ्रू-श्रेणिबद्धतेचे ‘पर्याय’वादी (कष्टकरी जनतेला आदेश देणारा पक्ष आणि पक्षांतर्गत लोकशाहीपेक्षा केंद्रीयतेला प्राधान्य) घटक समाजात रुजताना दिसत होते. त्या विरोधात कठोर उपायात्मक कृतीची गरज होती, परंतु तशी कृती झाली नाही. लेविन यांनी लेनिन्स लास्ट स्ट्रगल (१९६८) आणि द सोव्हिएत सेन्च्युरी या ग्रंथांमध्ये विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भातील (आवश्यक अंगांच्या मर्यादेत) लेनिनवादाची विशिष्ट अंगं अधोरेखित केली आहेत.
‘वास्तविक उद्दिष्टांच्या दिशेनं बदल घडवताना दीर्घकालीन समाजवादी दृष्टिकोन व आदर्श यांचं संरक्षण करण्यासाठी कल्पितादर्शवादी नसलेला मार्ग’ शोधण्यासाठी लेनिन ‘तीव्रते’नं प्रयत्नशील झाले होते. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या गरजांकडं अतीव लक्ष दिलं जाणार होतं आणि ‘हुकूमशाही व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या’ केल्या जाणार होत्या. स्टालिनला पक्षाच्या उच्च नेतृत्वफळीतून बाजूला करणं, ही यातील एक दुरुस्ती होती. विशिष्ट ऐतिहासिक बदलत्या परिस्थितीनुसार ‘केवळ निदानामध्ये बदल होऊन पुरत नाही, तर व्यूहरचना आणि मुख्य ध्येयांमध्येही बदल करावे लागतात’. लेनिनवाद-बोल्शेविकवाद आणि ‘हिंसाचाराला प्राधान्य देणारी एकाधिकारशाही’ मानणारा स्टालिनवाद यांच्यातील संघर्षात स्टालिनवादाचा विजय झाला आणि त्यानं सर्व विरोधकांना नष्ट करून टाकलं (द सोव्हिएत सेन्च्युरी, पान २९९, ३००, २९८, ३०१). हुकूमशाही, उच्चभ्रू, श्रेणिबद्ध, व ‘पर्याय’वादी प्रवृत्ती यांसारखे विकार टाळायचे असतील, तर लेनिनवाद्यांनी ‘रशियन क्रांती शतकमहोत्सवी विशेषांका’तील दिलीप सिमन व मार्सल व्हॅन देर लिन्देन यांच्यासारख्या लेखकांनी केलेली बोल्शेविकवाद व लेनिनवादाची समाजवादी चिकित्सा समजून घ्यायला हवी.