पश्चिम बंगालमधील सांप्रदायिक भेगा
पश्चिम बंगालमधील नुकताच उडालेला सांप्रदायिक भडका हा या प्रदेशातील हिंदू-मुस्लीम शत्रुभावाच्या इतिहासातून आलेला आहे.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
पश्चिम बंगालमधील बशीरहाट उपविभागाचा भाग असलेल्या बदुरिया इथं अलीकडं सांप्रदायिक हिंसाचाराचा भडका उडाला. राज्यातील वाढत्या सांप्रदायिक धृवीकरणाचे संकेत यातून मिळत आहेत. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाढत्या आकांक्षांचाही संदर्भ हिंदू-मुस्लीम शत्रुभावाला आहे. या प्रदेशातील सांप्रदायिकतेच्या इतिहासाच्या संदर्भात अलीकडच्या घडामोडींकं पाहिलं तर मतदारांमधील विशिष्ट घटक भाजपकडं का वळतो आहे ते स्पष्ट होतं. हिंदू सांप्रदायिक तिरस्काराच्या लाटेचा ‘संसर्ग’ पश्चिम बंगालला नव्यानं झालेला नसून पूर्वीपासूनच या प्रदेशात तीव्र सामाजिक तणावाची बीजं टिकून राहिलेली आहेत, त्यांना अलीकडच्या राजकीय प्रक्रियांनी पृष्ठभागावर आणलं आहे, इतकंच.
सतरा वर्षांच्या एका शाळकरी मुलानं फेसबुकवर लिहिलेल्या नोंदीमध्ये प्रेषित मोहम्मद आणि काबा यांच्याबाबत कथितरित्या अपमानजनक उल्लेख असल्याच्या कारणावरून बशीरहाटमध्ये हिंसाचाराची ठिणगी पडली. हे निमित्त होऊन मुस्लीम जमाव रस्त्यावर उतरून नासधूस करू लागला आणि ‘अपराधी’ व्यक्तीला त्यांच्याकडं सोपवावं अथवा फाशी द्यावं अशी मागणी या जमावानं केली. हिंदूंनी याला प्रत्युत्तर दिलं आणि पुढील काही दिवस हिंसाचार सुरू होता. भाजपशी संबंधित लोकांनी बनावट बातम्या पसरवल्यामुळं सांप्रदायिक आगीमध्ये आणखी तेल ओतलं गेलं, अशाही वार्ता प्रसिद्ध झाल्या होत्या. आग भडकावण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करतं आहे. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असी भाजपची मागणी आहे. या सार्वजनिक चिखलफेकीमुळं बंगालच्या सामाजिक व्यवस्थेमध्येच असलेल्या खोल भेगा लपणार नाहीत. भाजपच्या अलीकडच्या मोहिमांनी या भेगा आणखीच रुंदावल्या आहेत.