ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

‘इपीडब्ल्यू’मधील पेचप्रसंग: एक ‘लहान आवाज’

इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीनं ५१ वर्षं पूर्ण केली आहेत. गेल्या वर्षभरात या साप्ताहिकामध्ये अनेक उलथापालथी आणि सक्तीचे बदल झाले. इपीडब्ल्यूबद्दल- खासकरून गेल्या महिन्यातील घडामोडींबाबत आणि भवितव्याबद्दल- अनेक प्रश्न सार्वजनिक संभाषितामध्ये उपस्थित करण्यात आले. इपीडब्ल्यूच्या भूतकाळाबाबत आणि भविष्यकाळाबाबत विचार करायची ही उचित वेळ आहे. यासाठी व्यापक ‘इपीडब्ल्यू समुदाया’चा सहभाग आणि संवाद गरजेचा आहे.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

बर्नार्ड डी-मेलो यांनी या काल्पनिक संभाषणामध्ये काही चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

इपीडब्ल्यू आणि इपीडब्ल्यू समुदाय यांच्यातील जवळकीमुळं हे साप्ताहिक इतका प्रवास करू शकलं आहे. जेम्स कॅमेरूनच्या ‘टायटॅनिक’ या असामान्य चित्रपटातील पात्रांवरून ‘इपीडब्ल्यू’ व ‘इपीडब्ल्यू समुदाय’ या दोघांना आपण रोझ व जॅक असं संबोधूया.

गडगंज पैसा कमावलेला वाग्दत्त वर काल आणि उच्चभ्रू समाजाचा अहंकार घेऊन वावरणारी आई रुथ यांच्या मनाप्रमाणे जगायची सक्ती झाल्यानं कंटाळलेली रोझ जहाजाच्या टोकावरून उडी मारायच्या बेतात असते. “नको, असं नको करूस”, जॅक मधेच बोलतो. त्याला दूर व्हायला सांगत रोझ म्हणते: “मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते तू मला सांगायला नकोय. गेले पंधरा महिने मी एवढ्या त्रासात होते तेव्हा तू कुठं होतास? जा इथून.”

जॅक: “मी गुंतलेलो आहे. माझ्याकडं पर्याय नाहीये. उलट तू कठड्यावरून मागं येशील आणि मला या ताणातून सोडवशील असं वाटत होतं. असू दे, चल. चल मला तुझा हात दे. तुला उडी मारायची नाहीये ना.”

जॅक रोझचा हात धरून तिला डेकवर आणतो.

रोझ: “मी वाया गेलेली आहे असं तुला बहुधा वाटत असेल”.

जॅक: “अजिबातच नाही. उलट, तुला काहीच मार्ग उरला नाहीये, असं तुला कशामुळं वाटलं, याचा मी विचार करतोय.”

रोझ: “गेल्या वर्षी जानेवारीपासून मी काय सहन करतेय ते तुला माहीतच नाहीये. खरं आणि खोटं, नैतिक आणि अनैतिक यांच्यात फरक करण्याचीही क्षमता माझ्यात नाहीये, असं वाटण्यासारखी परिस्थिती आली होती. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. मला असे आरोप सहन होत नाहीत, तुला माहीतेय ना. त्यानंतर एका बड्या कंपनीकडून मला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर.. जॅक, माझी प्रतिष्ठाच शंकेच्या भोवऱ्यात सापडली.”

जॅक: “हे सगळं निश्चितच अस्वस्थ करणारं आहे. जानेवारी २०१६पासून तुझ्या दोन संपादकांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं. रोझ, माझ्या माहितीतली तू सर्वांत विलक्षण स्त्री आहेस. आता तू सावरल्याशिवाय मी मागं फिरू शकत नाही. रोझ, तू कशात तरी अडकल्येस. तू यातून बाहेर पडली नाहीस, तर कदाचित तू मरशील. तशी तू कणखर आहेस, त्यामुळं कदाचित लगेच मरणार नाहीस, पण रोझ... तुझ्यातली ती आग.. मला आवडणारी तुझ्यातली ती आग विझून जाईल...”

रोझ: “जॅक, माझ्यावरून एवढा गहजब माजवू नकोस. अपयशांतून मी जे काही शिकलेच तीच माझी शिल्लक आहे रे. सचिन चौधरींपासून ते सी. राममनोहर रेड्डींपर्यंत अनेक संपादकांनी आणि लेखकांनी मला जे काही शिकवलं ते मी बहुतेकसं टिकवून ठेवलंय आणि माझ्या मर्यादाही मला चांगल्या माहीत आहेत. माझ्या संपादकांच्या आणि लेखकांच्या मदतीनं मी ‘ज्ञानाचा वटवृक्ष’ बनलेय. पण सर्वाधिक वाहून घेतलेले आणि सर्वाधिक काळ माझे संपादक राहिलेले कृष्ण राज यांच्याचसारखं मला स्वतःकडं लक्ष वेधून घ्यायला आवडत नाही.”

जॅक: “शोधपत्रकारितेकडं वळण्याचा निर्णय तुला चांगला वाटला होता का?”

रोझ: “मला त्या कल्पनेविषयी उत्सुकता वाटली होती. १८७०-१९०० या काळात अमेरिकेत भांडवलाच्या एककेंद्रीकरणामुळं भयानक विषमता निर्माण झाली, त्यापाठोपाठ शतकाच्या उंबरठ्यावर तिथं उद्भवलेल्या परिस्थतीविषयी मी वाचलेलं इथं आठवतं. भीषण विषमतेला सरकारनं दडपलं आणि प्रचंड खाजगी लाभासाठी कायदाबाह्य पद्धती वापरल्या. अशा प्रकारे पैसा  वाढवत नेलेल्यांना ‘रॉबर बॅरन’ असं म्हटलं जातं. त्यांच्या या गैरवर्तणुकीमुळंच कुलंगड्या बाहेर काढणाऱ्या पत्रकारितेचा उगम झाला. हे कुलंगड्यास्फोटक पत्रकार सतत आजूबाजूच्या घडामोडींकडं लक्ष ठेवून असत आणि आपले निष्कर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोचवत. उद्योगविश्वातील बनाव आणि राजकीय भ्रष्टाचार यांच्यातील संगनमत या सगळ्याच्या केंद्रस्थानी होतं, आणि कुलंगड्यास्फोटक पत्रकारितेचं मुख्य लक्षही यावरच होतं. आपण प्रकाशात आणत असलेल्या सामाजिक गैरप्रकारांवर उपाय करण्याचं काम जागृत जनता करेल, असा विश्वास कुलंगड्यास्फोटक पत्रकारांना वाटत होता. १९९०पासून भारतातही अशा प्रकारचे ‘रॉबर बॅरन’ आणि शक्तिशाली, भ्रष्ट राजकारणी यांच्यातील जाळं पसरू लागलं. साहजिकपणेच कुलंगड्यास्फोटक पत्रकारिताही इथं उदयाला आली. यातली अचूक आणि विश्वासार्ह वार्तांकनं प्रकाशित करून जनतेपर्यंत पोचवण्याबाबत मलाही उत्सुकता वाटली.”

जॅक: “पण, रोझ, यात काहीतरी अपुरं वाटतंय. आणि तुझ्या ‘गाभ्याशी असलेल्या क्षमते’पासून तू दूर जात होतीस.”

रोझ: “नाही, जॅक. व्यवस्थापन क्षेत्रातली भाषा नको वापरूया. माझ्या संपादकीय मंडळानं यावर पूर्वीच- बोफोर्स घोटाळ्यावेळी विचारविमर्श केला होता. शोधपत्रकारितेसाठी तथ्यांच्या अचूकपणावर ठोस भर द्यावा लागतो. ‘चौथा स्तंभ’ मानला जाणाऱ्या पत्रकारितेचा मानबिंदू बनायचं असेल तर अशा पत्रकारितेसाठी सार्वजनिक प्रश्नांसंदर्भात सखोल संशोधन गरजेचं ठरतं. त्यामुळं, या कसबी पद्धतीसाठी कुशल, अनुभवी पत्रकार आणि पुरेसे स्त्रोतही असावे लागतात. आणि आजच्या नव-उदारमतवादी रचनेमध्ये सर्वाधिक श्रीमंत व सत्ताधारी व्यक्ती व उद्योगकंपन्या यांच्या गैरप्रकारांचा पुरावा उघड केला तरी सगळीकडं थंड शांतताच कायम राहू शकते, व्यावसायिक माध्यमं अशा प्रकरणांचं काहीच वार्तांकन न करता कामकाज सुरू ठेवू शकतात. पत्रकारितेचं स्वातंत्र्य हा इथला चिंतेचा मुद्दा नसून, गुलामीची वृत्ती चिंताकारक आहे. विश्वासार्ह शोधपत्रकारितेमुळं माझ्या मालकांचा साहजिकपणेच बड्या पैसेवाल्यांशी आणि सत्ताधारी राजकीय धेंडांशी संघर्ष होणार होता. पण इथं हेही लक्षात ठेवायला हवं की, ‘शोधपत्रकारिता’ म्हणून पुढं येणारं वार्तांकन अनेकदा सरकारच्या वा कंपन्यांच्या आतल्या गोटातून बाहेर आलेली माहिती केवळ प्रसिद्ध करण्यापुरतंच मर्यादित राहातं. यामध्ये संबंधित स्त्रोतांकडून वार्ताहराला माहिती सहजी पुरवली जाते. तथ्यांसंबंधी गोंधळ दिसून आल्यास सत्याचा शोध वार्ताहरानं घ्यायला हवा, परंतु क्वचितच काही जण इतके कष्ट घेतात. आम्हाला शोधपत्रकारितेसाठी निधीही मिळवता आला. ‘ना-नफा औद्योगिक संकुला’तून हा निधी येत होता. अशा प्रकारच्या निधीबद्दलही काही बोलणं गरजेचं आहे. इतर विख्यात, उदारमतवादी बिगरसरकारी संस्थांप्रमाणे मलाही उदारमतवादी, उच्चउत्पन्न स्त्रोतांकडून अंशतः देणग्यांच्या रूपात निधी मिळत आलेला आहे. माझ्यात रुजलेला परिवर्तनवादी विचार अशा निधीपुरवठ्यामुळं अखेरीस विरून जाईल की काय, अशी शंकाही वाटत राहाते. शेवटी मलाही अशा व्यवस्थेच्या कह्यात घेतलं जाईल, अशी चिंताही वाटते.”

जॅक: “रोझ, भारतातल्या नागरी स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांच्या संघटना मोठ्या प्रमाणात स्वतंत्र शोधाचं काम करत असतात, भारतीय राज्यसंस्थेकडून पद्धतशीररित्या मानवाधिकारांचा भंग होतो तेव्हा ‘सखोल संशोधना’चं काम या संस्था करतात, विशेषतः राज्यसंस्थेच्या अत्याचाराबाबत आणि प्रस्थापित कायदायंत्रणेलाही न्याय देता येत नाही अशा प्रकरणांमध्ये या संस्थांचं काम महत्त्वाचं ठरतं. भारतीय राज्यसंस्थेच्या कायदाबाह्य वर्तणुकीविरोधात मत आणि विवेक जागृत करण्यासाठी हे शोधकार्य उपयुक्त ठरतं. उदाहरणार्थ, पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज् यांनी ‘हू आल द गिल्टी?’ असा संयुक्त अहवाल प्रसिद्ध केला होता. नोव्हेंबर १९८४मध्ये शीख समुदायातील सदस्यांविरोधात राज्यसंस्थेच्या संगनमतानं झालेल्या हल्ल्यांसंदर्भात अचूक शोधकार्य करून हा अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्याचा मसुदा तुझ्या अंकात प्रसिद्धही झाला होता. अशा धीट व स्पष्टवक्त्या स्फोटक वार्तापत्रांना तू जागा देत राहाशील अशी आशा मला वाटते. मोठ्या प्रमाणात तथ्यसंकलन आणि तर्कशुद्ध युक्तिवाद असलेला ‘हू आर द गिल्टी?’ हा अहवाल म्हणजे शोधपत्रकारितेचा एक उत्तम नमुना होता.”

रोझ: “होय जॅक, आपण नक्कीच हे सुरू ठेवू. सरकारी धोरणांचे परिणाम उच्चभ्रू अल्पसंख्यांवर आणि बड्या औद्योगिक हितसंबंधांवर कसे झाले, यापेक्षा बहुसंख्य भारतीय लोकांवर या धोरणांचे परिणाम कसे झाले यावरून माझ्या लेखकांनी या धोरणांचं मूल्यमापन केलं. परंतु, या नवउदारमतवादी काळामधील विविध समस्या- आरोग्यविमा नसणं, पुरेसा निवारा उपलब्ध न होणं, वाईट शाळांमध्ये मुलांना शिकावं लागणं, दारिद्र्याचा सततचा धोका, इत्यादी- समजून घेण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांचे अभ्यासू लेखही आपल्याला गरजेचे आहेत. पिळवणूक करणाऱ्या व दडपशाहीच्या सामाजिक संबंधांमधून हे बिकट प्रसंग निर्माण होत असतात.”

जॅक: “रोझ, आपण या साप्ताहिकाच्या पत्रकारितेच्या अंगाविषयी बोलतोय, पण उरलेला अर्धा अकादमिक लेखनाचा भागही तितकाच महत्त्वाचा आहे, असं नाही वाटत?”

रोझ: “होय, ते कोणत्याही संपादकासाठी एक आव्हानच आहे. शोधपत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या संपादकालाही हे आव्हान पेलावं लागेलच. किंबहुना, एखादा अकादमिक अर्थशास्त्रज्ञ संपादक असेल, तरी इतिहास, समाजशास्त्र किंवा राज्यशास्त्र यासंबंधीच्या गरजा तो पूर्ण करू शकेलच असं नाही. आपल्या मर्यादांची जाणीव असलेल्या संपादकानं सामाजिक विज्ञानांच्या प्रत्येक व्यापक विद्याशाखांसाठी संपादकीय सल्लांगारांवर अवलंबून राहण्याचा मार्ग असतो. पण संपादकानं या प्रत्येक सल्लागाराशी भावनिक आणि बौद्धिक संबंध निर्माण केले तरच तेही साप्ताहिकाच्या अकादमिक बाजूची गुणवत्ता टिकवण्यासाठी सहाय्य करतात. त्यामुळं संपादकानं सातत्यानं तरुण, प्रज्ञावान- विशेषतः भारतीय अकादमिक विश्वाच्या ‘मागास’ ठिकाणांमधील- अभ्यासकांना ओळखून त्यांची जोपासना करायला हवी आणि त्यांचं काही सर्वोत्तम काम या साप्ताहिकासाठी मिळावं असा प्रयत्न करायला हवा.”

जॅक: “रोझ, तुझ्या पुढच्या संपादकाच्या बाबतीत तुझ्या कोणत्या आशा-अपेक्षा आहेत?”

रोझ: “ती व्यक्ती किमान उदारमतवादी असावी, पण उच्चभ्रू मताच्या तथाकथित डाव्या बाजूला ती असावी असा याचा अर्थ नाही. एक- विश्वासार्ह इतिहासाची जाणीव असलेला आणि भय वा पूर्वग्रह न बाळगता सत्याची कास धरणारा उदारमतवादी संपादक म्हणता येईल. ही व्यक्ती वैज्ञानिक पद्धतींच्या बाजूनं उभी राहणारी असावी आणि व्यापक जगाबद्दल प्रश्न विचारणारी व चिकित्सक वृत्तीची असावी. माझे संस्थापक संपादक सचिन चौधरी यांचा दाखला इथं डोळ्यांसमोर येतो. दोन- आपल्या कृतीचा सहकाऱ्यांच्या भवितव्यावर काय परिणाम होतो आहे याचा सारासार विचारही या संपादक व्यक्तीला करता यावा. मुळात या संपादकीय व्यक्तीनं इतर प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाचं मानावं... कृष्ण राज व रजनी एक्स देसाई यांनी निर्माण केलेली आणि सी. राममनोहर रेड्डी यांनी टिकवलेली माझ्यातली लोकशाही स्वरूपाची व तुलनेनं समतावादी कार्यसंस्कृती पुनर्स्थापित करण्याची क्षमता या संपादकामध्ये असावी. दीर्घकालीन परिप्रेक्ष्यातून विचार करता, मी अधिक मोठी संस्था बनले आहे, अधिक असमान व उतरंडीवर आधारित बनले आहे, असे बदल झाले असले तरी राममनोहर यांनी कार्यसंस्कृतीमधील लोकशाही टिकवून ठेवली होती. हुकूमशाही वृत्तीचा आणि आत्ममग्न माणूसच ही कार्यसंस्कृती नष्ट करू शकतो. तीन- ‘इपीडब्ल्यू’मधली ‘इकॉनॉमिक’/अर्थशास्त्रीय बाजू राजकीय व समाजशास्त्रीय मुद्द्यांसमोर झाकोळली गेल्यासारखं दिसतंय. हा समतोल पुन्हा आणावा लागेल, त्यासाठी अपारंपरिक अर्थशास्त्रज्ञ संपादक म्हणून येणं गरजेचं आहे. आणि, ‘ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका’ या पुस्तकाचे विख्यात उरुग्वीयन लेखक एड्युअर्डो गॅलिआनो यांनी एकदा म्हटलं होतं तसं: ‘प्रामाणिकपणे लिहिणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बोलत असलेल्या शब्दांवरून एकमेकांना ओळखत असतो. मी बोलतो ते शब्द म्हणजेच मी. मी माझे शब्द तुम्हाला देत असेन, तर मी स्वतःलाच तुम्हाला देत असतो.’”

जॅक: “रोझ, रोझ. किती छान! तू सावरायलाच हवंस. रोझ, तुला पुढची वाटचाल करायलाच हवी. आजच्या अंधारलेल्या काळात तू मरणार नाहीस, हे मला माहीतेय. तू मला जवळ बोलावसंस हीच माझ्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती. मी त्यासाठी तुझे आभा मानतो.”

रोझ: “जॅक, तो तर नुसता हिमनग होता- त्यासाठीची धोक्याची सूचना खरं तर आधीच दिली होती, पण त्याकडं दुर्लक्ष झालं. मला टिकवणारा ढाचा, माझी चौकट, इमला यांनाच हा हिमनग कोसळवू पाहात होता. संपादकीय चमू आणि तुझा पाठिंबा नसता तर मी उद्ध्वस्थच झाले असते. मी माझ्या चमूच्या अभिनंदनासाठी फुलं आणायला हवीत रे.”

जॅक: “होय, अर्थातच. पण माझ्यासाठीही एक गोष्ट कर. तू टिकून राहाशील, असं आश्वासन मला दे. काहीही झालं, कितीही निराशा दाटली तरी तू धीर सोडणार नाहीस, असं वचन दे.”

रोझ: “जॅक, मी कधीच जाणार नाही. तुलाही कधीच जाऊ देणार नाही. मी वचन देते.”

(टायटॅनिकच्या संहितेचा काही भाग मी वापरल्याचं इथं नमूद करतो आहे. पण या संदर्भातील अप्रत्यक्ष दुवे जास्त ताणू नयेत).

Updated On : 13th Nov, 2017

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top