ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

मधुमेह: मुका मारेकरी

शरीर कमकुवत करणारा मधुमेह गरीबांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आहे.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

मुख्यत्वे श्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा मधुमेहाचा आजार आता भारतातील गरीबांमध्येही पसरू लागला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) या संस्थेनं केलेल्या एका मोठ्या अभ्यासप्रकल्पातून हा अस्वस्थ करणारा निष्कर्ष समोर आला आहे. मधुमेह (डायबेटिस मेल्लिटस) हा जीवनशैलीतून उत्पन्न झालेला आजार आहे, असं काही वर्षांपूर्वीपर्यंत मानलं जात होता. त्याचा परिणाम मुख्यत्वे समाजातील सामाजिक-आर्थिक उच्च स्तरातील घटकांना होत असल्याचंही मानलं जात होतं. आशियातील मोठ्या पट्ट्यात आढळणारा हा ‘साथीचा रोग’, चरबीयुक्त आणि साखरयुक्त अन्न जास्त प्रमाणात खाणाऱ्यांना, जास्त वजन असलेल्यांना आणि बैठे काम करणाऱ्यांना लक्ष्य करतो, अशी समजूत होती. परंतु, विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमधील शहरी गरीबांनाही मधुमेहाची लागण अधिकाधिक प्रमाणात होत असल्याचं अलीकडच्या काही अभ्यासांमधून निदर्शनास आलं आहे. जगाची मधुमेह राजधानी म्हणून ओळखला जाणारा भारतही याच मार्गानं जातो आहे. आयसीएमआरनं केलेला सर्वांत मोठा राष्ट्रीय अभ्यास आणि आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय यांना असं आढळलं आहे की, आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत राज्यांमधील शहरी भागांमध्ये उच्च स्तरातील लोकांपेक्षा कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तरातील लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे. परंतु, सर्व राज्यांचा विचार केला, तर ग्रामीण भागातील उच्च सामाजिक-आर्थिक स्तरातील लोकांमध्ये मधुमेह आढळतो. म्हणजे, आत्तापर्यंत या आजाराची लागण न झालेले किंवा कमी प्रमाणात लागण झालेले शहरी गरीब रहिवासी आणि ग्रामीण भागातील सुस्थितीमधले रहिवासी यांच्याभोवती मधुमेहाचा विळखा घट्ट होतो आहे, असा निष्कर्ष यातून निघतो.

हा केवळ चिंतेचा विषय नाही, तर ही धोक्याची घंटा आहे. मधुमेह हा ‘हाय मेन्टेनन्स’ प्रकारचा आजार आहे, म्हणजे देखभाल करण्यात हेळसांड झाली तर हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांना गंभीर इजा पोचू शकते, शिवाय गँगरिन होण्याचा धोकाही असतो. आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खालावलेली आहे आणि आरोग्यसेवेसाठी गरीबांनाही पैसे मोजावे लागतात, या पार्श्वभूमीवर सदर निष्कर्ष तातडीच्या कृतीसाठीचे इशारा मानायला हवेत. आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, सर्व १५ राज्यांमध्ये मिळून मधुमेहाचा आढळ ७.३ टक्के होता, आणि त्याचे प्रमाण ४.३ टक्क्यांपासून (बिहार) ते १०.० टक्क्यांपर्यंत (पंजाब) राज्यागणिक निरनिराळे आहे. या अभ्यासासाठी नमुना म्हणून साठ हजार व्यक्तींची माहिती जमवण्यात आली. देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागांमध्ये राहात असल्यामुळं मधुमेहाची लागण झालेल्यांच्या टक्केवारीत थोडी वाढ झाली, तरी सातत्यपूर्ण वैद्यकीय सहाय्याची गरज असलेल्या पण खराब आरोग्य सेवा उपलब्ध होणाऱ्या लोकांची संख्या मोठी भरते.

चंडीगढ, महाराष्ट्र व तामीळनाडू यांच्यासारख्या सात संपन्न राज्यांत शहरी भागांमधील कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तरातील लोकांमध्ये मधुमेहाचा प्रसार जास्त असल्याचं आढळलं. शहरी भागांमधील आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या घटकांमध्ये या आजाराबद्दल अधिक जागरूकता आहे आणि देखभालीसाठी जास्त खर्च करण्याची क्षमताही त्यांच्यात आहे, हे यातून स्पष्ट होतं.

शहरांमध्ये ‘जंक फूड’ प्रकारात मोडणारे अन्नपदार्थ किफायतशीर किंमतीला सहज उपलब्ध होतात, त्यामुळं कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तरांमधील व्यक्तींच्या आहारातही जास्त चरबीयुक्त पदार्थ येत असावेत, अशी शक्यता पोषणतज्ज्ञ व्यक्त करतात. परंतु इतरही काही घटक विचारात घ्यायला हवेत. शहरांमधील अनेक गरीब लोकांना पोषणदृष्ट्या समतोल आहार घेणं परवडू शकत नाही. त्यामुळं ‘जंक फूड’ खाणं ही त्यांची निवड नसते वा जिभेचे चोचले पुरवण्याचाही प्रकार नसतो, तर किफायतशीर दरातील अन्नाच्या अनुपलब्धतेमुळं हे लोक या पदार्थांकडं वळतात. त्याचप्रमाणे, शहरी रहिवाश्यांची उच्च उत्पन्न पातळी, शारीरिकदृष्ट्या कमी श्रमाचे व्यवसाय आणि यांत्रिक वाहतुकीची व घरगुती उपकरणांची वाढती उपलब्धता यांमुळंही शहरी भागांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळत असावा, असं या अभ्यासात म्हटलं आहे. कामासाठी दूर अंतराचा प्रवास करण्याचा दबाव आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याची गरज, हे घटकही शहरांमध्ये आपल्या निवडस्वातंत्र्यावर अवलंबून राहिलेले नाहीत. या घटकांमुळं तणाव वाढतो. मधुमेहाच्या अनेक कारणांमध्ये हा तणावही समाविष्ट आहे.

इतर भूभागांमधील लोकसंख्येपेक्षा दक्षिण आशियाई रहिवाश्यांमध्ये दुसऱ्या प्रवर्गातील मधुमेहाची लागण खूप तरुण वयामध्ये होताना दिसते, त्यामुळं आरोग्यसेवांवर ताण येतो. इतर वांशिक गटांपेक्षा भारतीय लोकांची मधुमेहपूर्व टप्प्यात वेगानं नकारात्मक प्रगती होते. शिवाय मधुमेहाचा प्रसार वेगानं होत असलेल्या इतर देशांप्रमाणे भारतातही ताजतवानं होण्यासाठी शारीरिक हालचाली करण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, सर्व घटकांमधील महिलांमध्ये तर हे प्रमाण आणखीच कमी आहे- ही एक सर्वज्ञात वस्तुस्थितीही या अभ्यासात नोंदवण्यात आली आहे.

आधीच्या काही छोट्या पातळीवरच्या अभ्यासांमध्येही आढळलेल्या व सारांशरूपात नोंदवलेल्या गेलेल्या बाबींना आकडेवारीचा आधार देण्याचं काम सदर अभ्यासाद्वारे करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, कर्करोग, मधुमेह, हृदविकार यांचं नियंत्रण व प्रतिबंध करण्यासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम २०१० सालापासून लागू झालेला आहे. परंतु, या संदर्भात लघुकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे तातडीचे हस्तक्षेप गरजेचे आहेत, हे आयसीएमआरच्या अभ्यासातून निष्पन्नास येतं. याबाबतीत समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन मिळण्याकरिता सरकार, बिगरसरकारी संस्था, वैद्यकीय समुदाय आणि मधुमेहींनी एकत्र कार्यरत व्हायला हवं. पोषक अन्नाची उपलब्धतता आणि शारीरिक ताजेतवानेपणाच्या हालचालींच्या सुविधा यांच्याबरोबरच मधुमेहासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण मोहीम आखण्याची गरज आहे. ‘फास्ट फूड’च्या वेष्टनावर आणि जाहिरातींवर नियम बसवण्यापलीकडं दीर्घकालीन धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत.

विकसनशील देशांमध्ये संसर्गजन्य रोग हे सर्वांत मोठ्या चिंतेचा विषय आहेत. परंतु, मधुमेहासारखे असंसर्गजन्य रोग भीतीदायक वेगानं पसरत आहेत (मधुमेहाला मुका मारेकरी असं योग्य संबोधन वापरलं जातं). इन्शुलिनचा शोध १९२१ साली लागण्यापूर्वी मधुमेहाचा आजार म्हणजे देहदंडाची शिक्षाच मानला जात होता. इन्शुलिनच्या शोधानंतरही काही दशकांपूर्वीपर्यंत हा आजार झाल्यावर जगण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होत असे. एकविसाव्या शतकात आपल्या समाजातील मोठ्या लोकसंख्येची जगण्याची शक्यता अर्ध्यावर आणायची नसेल, तर आपण तातडीनं आणि सामंजस्यानं कृती करायला हवी.

Updated On : 13th Nov, 2017

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top